कोरोना महामारीचे संकट देशासाठी, जगासाठी चहूबाजूने त्रासदायक ठरत असताना माध्यमांनी मनोबल वाढवणाऱ्या बातम्या द्यायच्या सोडून ‘नरो वा कुंजरो वा’ म्हणत N95 मास्क बाबत बातम्यांच्या हेडलाईन केल्या आणि जनतेची दिशाभूल केलीय.
दैनिक लोकमतने ‘N95 मास्क वापरत असाल तर सावधान’ अशा हेडलाईनने बातमी केलीय. तसेच व्हिडीओ न्यूजला मोठ्या जाडसर फॉन्टमध्ये थंबनेल लाऊन वाचकांना/दर्शकांना खेचण्याचा प्रयत्न आहे.
हेच न्यूज १८ लोकमतने सुद्धा केलंय. ‘N95 मास्कचा वापर करत असाल तर सावधान! सरकारने दिला न वापरण्याचा इशारा!’ या हेडलाईनच्या बातमीला फेसबुक पेजवर पोस्ट करताना कॅप्शन मध्ये लिहिलंय ‘जर तुम्ही कोरोनापासून वाचण्यासाठी N95 मास्कचा वापर करत असाल तर ही बातमी वाचाच’
पोलीसनामाने तर ”कोरोना’चा प्रसार रोखण्यात N-95 मास्क ‘अयशस्वी’, केंद्र सरकारनं राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना ‘तात्काळ’ कळवलं’ अशी हेडलाईन लावलीय. आणि मजकूर सुद्धा हेच सांगतोय की केंद्र सरकारने N95 मास्क वापरू नका म्हणून सांगितलेय.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने N95 मास्क संबंधी केंद्र सरकारचं काय नेमकं वक्तव्य आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला.
ANI या वृत्तसंस्थेने यासंबंधी ट्विट करून बातमी दिलीय. यात काय लिहिलंय वाचा:
‘आरोग्य मंत्रालयाच्या महासंचालकांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना असे लिहिले आहे की, “कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांसाठी व्हॉल्व असणाऱ्या रेस्पिरेटर N95 मास्कचा वापर हानिकारक आहे. कारण यामुळे विषाणूचा प्रादुर्भाव होण्यापासून रोखू शकत नाही.”
ट्विटसोबत ANIने महासंचालक प्रो. (डॉ) राजीव गर्ग यांचे पत्र सुद्धा जोडले आहे. यातही स्पष्टपणे हेच सांगितले आहे की व्हॉल्व असणाऱ्या N95 मास्कचा पासून धोका आहे. कारण या व्हॉल्वद्वारे जी हवा आपण बाहेर सोडतोय त्यातून कोरोना बाधित व्यक्तीचे विषाणू त्या हवेसोबत बाहेर जाऊ शकतात.
हे समजून घेण्याआधी आपल्याला मास्क लावणे का महत्वाचे आहे ते समजून घ्यावे लागेल. जसे WHOने कोरोना विषाणू हवेतून येऊ शकतो असे सांगितले आहे त्याचा मुख्य स्रोत केवळ आपल्या लाळेचे, थुंकीचे कण आहेत. हे बोलताना, शिंकताना, खोकताना इतरत्र जातात. प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरले तर इतरांचा आपल्याकडे आणि आपण जर बाधित असू तर आपला इतरांकडे व्हायरस जाण्याची शक्यता बरीच कमी होते.
परंतू हे असे व्हॉल्व असणारे मास्क वापरले तर बाहेरचा व्हायरस आत येणार नाही परंतु ते वापरणारी व्यक्ती बाधित असेल तर त्या व्हॉल्वमधून बाहेर पडणारा त्या व्यक्तीचा वायू व्हायरस घेऊन बाहेर येण्याची शक्यता आहे. म्हणूनच ही देवाणघेवाण थांबवायची असेल तर प्रत्येकाने मास्क वापरणे गरजेचे आहे आणि व्हॉल्व असणारे मास्क लावणे थांबवले पाहिजे.
अमेरिकेची फूड अँड ड्रग ऍडमिनीस्ट्रेशन (FDA) ने याबाबत काही मार्गदर्शक सूचना सुद्धा दिल्या आहेत. यात त्यांनी N95 हे मास्क सामान्य नागरिकांनी वापरू नये ते केवळ मेडिकल स्टाफने वापरायला हवं असं सांगितलं आहे.
अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) या संस्थेने (घरगुती कापडी) मास्कच्या वापराबद्दल काही सूचना दिलेल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे:
सामान्य नागरिकांसाठी सूचना:
- घरातील सदस्यांव्यतिरिक्त बाहेरच्यांशी बोलताना, बाहेर जाताना वयाच्या २ वर्षांपासून पुढील सर्वांनी मास्क वापरावे.
- ज्यांची लक्षणे दिसत नाहीत त्यांच्याद्वारे सुद्धा कोरोना विषाणूचा फैलाव होऊ शकतो त्यामुळे बाहेर जाताना मास्क वापरायलाच हवे.
कोव्हीड१९ असणाऱ्यांसाठी किंवा शंका असणाऱ्यांसाठी:
आपली टेस्ट पॉझिटिव्ह आली असेल किंवा आपल्यात तशी लक्षणे आहेत असे वाटत असेल तर बाहेर जाऊ नका, लोकांत मिसळू नका किंबहुना घरातील ईतर सदस्यांपासून आणि पाळीव प्राण्यांपासून सुद्धा दूर रहा. घरातील इतरांशी गरजेपुरते बोलताना मास्क वापरा.
रुग्णांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींसाठी:
दवाखान्याव्यतिरिक्त घरगुती काळजी घेणाऱ्या व्यक्तींनी रुग्णाचा शक्यतो थेट संपर्क टाळावा. काही देताना, घेताना, बोलताना मास्क असावा. सातत्याने हात धुणे गरजेचे आहे. हात न धुता डोळ्यांना, नाकाला, तोंडाला हात लावणे टाळा. सातत्याने घरातील जागा फिनाईल किंवा तत्सम गोष्टींनी पुसूनघ्यावा.
मास्क कुणी वापरू नये?
- दोन वर्षांखालील लहान मुलांनी
- श्वासासंबंधी आजार असणारे, श्वास घ्यायला त्रास होणारे
- कुणाच्या मदतीशिवाय तोंडावरील मास्क काढू न शकणारे
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी‘च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की केंद्राने सरसकट N95 मास्क वापरू नका असे सांगितलेले नाही. केवळ व्हॉल्व असणारे मास्क वापरणे बंद करावे अशा सूचना दिल्या आहेत.
दैनिक लोकमात आणि न्यूज १८ लोकमत दोन्हींच्या बातम्यांमध्ये व्हॉल्व असणारे N95 मास्क धोक्याचे आहेत असे सांगितले आहे परंतु हेडलाईन चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे. परंतु पोलीसनामाने संपूर्ण बातमीत व्हॉल्वचा कुठेही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे ती हेडलाईनसह संपूर्ण बातमीच चुकीची आहे.
मुळात जर आपण स्वच्छ सुती कापड घड्या घालून नाक आणि तोंड व्यवस्थित झाकेल असे बांधले तरीही ते पुरेसे आहे, सामान्य नागरिकांनी N95 मास्क वापरण्याची गरज नाहीये.
हेही वाचा: सॅनिटायझरच्या वारंवार वापराने कॅन्सरचा धोका आहे का ?
Be First to Comment