Press "Enter" to skip to content

डॉ. चित्तरंजन भावे यांना बेड साठी १० तास ताटकळत बसावं लागल्याच्या बातम्या खोट्या !

“मुंबई मॉडेल चा नवीन फायदा तज्ज्ञ डॉक्टर चित्तरंजन भावे यांचा मुंबईत कोरोनाने मृत्यू. तब्बल १० तास नाही मिळाला बेड.”

Advertisement

‘ चित्तरंजन भावे एक नामांकित डॉक्टर पण सरकारी अनागोंदी आणि ढिसाळपणा, पोकळ दावे यामुळे १० तास बेड मिळाला नाही आणि त्यांना जीव गमवावा लागला.’

या अशा ट्वीटसह मुंबई मॉडेल, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र  सरकार, प्रशासन यांना डॉक्टर चित्तरंजन भावे यांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

tweet for Dr. Bhave 1
Credit: Twitter
tweet for Dr. Bhave 2
Credit: Twitter
tweet for Dr. Bhave 3
Credit: Twitter

हे सर्व ट्विट्स व्हायरल होण्यामागे कारण आहेत ‘महाराष्ट्र टाईम्स’, ‘न्युज१८ लोकमत’, ‘लोकमत’ यांसारख्या नामांकित माध्यमांतून आलेल्या बातम्या.

या माध्यमांतून आलेल्या सर्व बातम्या काय सांगत आहेत वाचा थोडक्यात:

‘डॉक्टर चित्तरंजन भावे हे कान-नाक-घसा तज्ज्ञ होते. रहेजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी एका अत्यवस्थ कोरोना रुग्णावर तातडीची शस्त्रक्रिया केली होती. यानंतर डॉक्टर भावे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने ते स्वतः गाडी चालवत रहेजा हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी आले. पण बेड मिळवण्यासाठी त्यांना १० तास ताटकळत राहावं लागलं होतं. ते पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांच्या मुलीला आणि पत्नीला क्वारंटाईन व्हावं लागलंय.’

Dr Bhave news Maharashtra times
Credit: Facebook
Dr bhave news News18 Lokmat
Credit: Twitter
Dr bhave news lokmat
Credit: Google

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने या बातमीची पडताळणी करताना सर्वात आधी ‘डॉ. चित्तरंजन भावे’ हे कीवर्ड टाकून गुगल सर्च केलं. त्यात विविध न्यूज पेपर्स आणि चॅनल्सच्या लिंक्स मिळाल्या. यांत महाराष्ट्र टाईम्स, लोकमत आणि न्यूज१८ लोकमत वगळता इतर कुठल्याही ठिकाणी ‘डॉ. भावे यांना बेड मिळण्यासाठी १० तास ताटकळत बसावं लागलं’ असं लिहिलेलं सापडलं नाही.

एकाच बातमीच्या एवढ्या मोठ्या मुद्द्यावर माध्यमांमध्येच एवढा विरोधाभास कसा? या शंकेने आम्ही अजूनच जोरदार पडताळणीला सुरुवात केली.

सोशल मीडियात इतर कुठे यावर कुणी काही बोललं आहे का हे तपासून पाहिलं. त्यावेळी ट्विटरवर ‘अनघा आचार्य’ नावाच्या ट्विटर हँडलवर या प्रकरणाविषयी  काही वेगळी माहिती मिळाली.

अनघा आचार्य यांनी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, सायबर क्राईम, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई या सर्वाना टॅग करत एक ट्वीट केलंय. या ट्वीटमध्ये त्यांनी काही पुरावे जोडत काही माध्यमांनी चुकीची बातमी दिल्याबद्दल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.

tweet for Dr. Bhave by Anagha Acharya
Credit: Twitter

 पुरावे म्हणून त्यांनी ‘न्यूज १८ लोकमत’ची बातमी आणि एक पत्र जोडलं आहे.

काय आहे या पत्रात ?

ते पत्र आहे मुंबईतील वरिष्ठ नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. संजय गाला यांचे. या पत्रात त्यांनी अतिशय विस्तृतपणे घटनाक्रम सांगितलाय. मार्गदर्शक, पेशाबांधव आणि ज्येष्ठ बंधू असा उल्लेख करत डॉ. चित्तरंजन भावे यांना कोरोनाची लागण केव्हा आणि कशी झाली इथपासून ते त्यांचे निधन होईपर्यंत त्यांच्या प्रकृतीत होणारे बदल या सगळ्याविषयी त्यांनी लिहिलंय.

letter of Dr. Sanjay Gala
 • १८ मे रोजी त्यांनी कोरोना चाचणी केली
 • १९ मे रोजी रिपोर्ट आला आणि ते स्वतःहून जाऊन स्वतः काम करत असलेल्या रहेजा हॉस्पिटल मध्येच उपचारांसाठी दाखल झाले.
 • २३ तारखेपर्यंत त्यांच्यावर उपचार चालूच होते परंतु त्यांची तब्येत खालावतच चालली होती म्हणून त्यांना आय.सी.यु. मध्ये भरती केलं आणि हाय प्रेशर ऑक्सिजन पुरवला गेला.
 • २६ तारखेला नळी आत टाकून ऑक्सिजन पुरवला जाऊ लागला.
 • २९ तारखेला डायलिसीस करावं लागलं. ३१ तारखेला म्हणजेच रविवारी परत त्यांचं डायलिसीस करावं लागलं.
 • सोमवारी १ जूनला मध्यरात्री २.४५ ला त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात ते गेले.

या सर्व बारकाव्यांत कुठेही बेड मिळण्यासाठी डॉ. भावे यांना १० तास ताटकळत बसावं लागल्याचं त्यांनी सांगितलेलं नाही.

ही सर्व माहिती मिळाल्या नंतर आम्ही जेव्हा त्या बातम्यांच्या लिंक्स मिळवण्यासाठी गेलो तेव्हा असं लक्षात आलं की या तिन्ही माध्यमांनी त्या बातम्या त्यांच्या वेबसाईट वरून काढून टाकल्या आहेत.

Error text on Maharashtra times website
Credit: Maharashtra Times

सर्च करताना आम्हाला काही बातम्यांमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे या प्रकरणी खुलासा आल्याचं दिसलं. विशेष म्हणजे यात स्वतः ‘न्यूज १८ लोकमत’ने आपली पहिली बातमी डिलीट करून आय.एम.ए. चा खुलासा असणारी नवी बातमी केल्याचं पहायला मिळालं. काय आहे बातमीत वाचा:

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितलं, “61 वर्षांचे डॉ. चित्तरंजन भावे यांना मधुमेह होता. हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली होती, स्टेंट बसवलेले होते. तरी ते कोरोना रुग्णांवर उपचार करत होते. शस्त्रक्रियेदरम्यान त्यांना कोरोना आजाराचा संसर्ग झाला. मुंबईतील रहेजा रुग्णालयात मानद शल्यक्रिया तज्ज्ञ म्हणून काम करत होते.  त्यांनी त्याच रुग्णालयात दाखल होण्यासाठी रुग्णालयाला फोन केला. मात्र रुग्णालयात जागा नसल्याने ते घरीच थांबले. प्रसारमाध्यमांवर बातम्या पसरल्या की त्यांना 10 तास रुग्णालयात जागा मिळाली नाही. तर वस्तुस्थिती तशी नाही.  जेव्हा रुग्णालयात जागा रिकामी झाल्याचं त्यांना कळलं तेव्हा ते स्वत: रुग्णालयात गेले”

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हाती आलेल्या डॉ. संजय गाला यांच्या पत्रात डॉ. चित्तरंजन भावे यांना १० तास ताटकळत बसावं लागल्याचा कुठेही उल्लेख नाही. या पत्राच्या किंवा डॉ. गाला आणि डॉ. चित्तरंजन भावे यांच्या जवळीकीची शहानिशा करण्यापेक्षा व्हायरल दाव्यांना बातम्या गायब होण्यानेच मोठे उत्तर मिळाले आहे.

…आणि इंडियन मेडिकल असोसिएशन च्या खुलाश्याने तर या सगळ्या बातम्या फेक असल्याचं शिक्कामोर्तबच झालंय. खुलासा असणाऱ्या बातम्या सायंकाळी साधारण ६-७ वाजता समोर आल्या, इतर माध्यमांनी बातम्या मागेही घेतल्या पण एबीपी माझाच्या रात्री १० च्या बातमीपत्रातही तीच बेड उपलब्ध न झाल्याची बातमी चालवली जात होती.

ABP Majha news about Dr. Bhave
Credit: Youtube

‘मटा’, ‘लोकमत’, ‘न्यूज १८ लोकमत’ आणि एबीपी माझा यांनी दिलेल्या बातम्यांमधील डॉ. चित्तरंजन भावे यांना बेडसाठी १० तास ताटकळत बसावं लागलं, हे दावे धाधांत खोटे आणि निराधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचा:

काय सांगताय? भोपाळमध्ये खरंच ‘होमिओपॅथी’ औषधांनी कोरोना रुग्ण ठणठणीत बरे झाले ?

More from कोरोनाMore posts in कोरोना »
More from राजकारणMore posts in राजकारण »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

  Leave a Reply

  Your email address will not be published.

  × न्यूज अपडेट्स मिळवा