नुकताच माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा वाढदिवस पार पडला. वाढदिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मनमोहन सिंह यांना शुभेच्छा दिल्या. राहुल गांधींच्या या शुभेच्छा संदेशाच्या प्रत्यूत्तरात ट्विटर युजरकडून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. या व्हिडीओच्या आधारे दावा करण्यात आला की सोनिया गांधींसाठी मनमोहन सिंह यांना दुसऱ्या खुर्चीवर बसायला सांगून त्यांचा अपमान (manmohan changing sit for sonia) केला गेला होता.
एका बैठकीतील ११ सेकंदाची ही व्हिडीओ क्लिप आहे. यामध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह एका खुर्चीवर बसलेले दिसताहेत. त्यांच्या मागे सोनिया गांधी उभ्या आहेत. त्यानंतर दोन अधिकाऱ्यांकडून मनमोहन सिंह यांना दुसऱ्या खुर्चीवर बसायला सांगण्यात येतंय. मनमोहन सिंह दुसऱ्या खुर्चीवर जाऊन बसतात आणि ते पूर्वी बसलेल्या खुर्चीवर सोनिया गांधी जाऊन बसतात असा हा व्हिडीओ आहे.
अशा प्रकारे सोनिया गांधींसाठी प्रथमच पंतप्रधानांना त्यांच्या खुर्चीवरून दुसऱ्या खुर्चीवर जायला सांगण्यात आलं, यावरूनच आपल्याला अंदाज येईल की १० वर्षांच्या शासनकाळात सरकारवर सोनिया गांधींची काय पकड असेल असं ट्विटर युजरने आपल्या ट्विटच्या कॅप्शनमध्ये म्हंटलंय.
पडताळणी:
पडताळणीसाठी आम्ही सर्वप्रथम व्हिडीओच्या किफ्रेम्स घेऊन त्या गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या.
आम्हाला ‘इंडिया टीव्ही’ या न्यूज चॅनेलच्या युट्यूब चॅनेलवर ‘किस्सा कुर्सी का’ नावाचा रिपोर्ट सापडला. या रिपोर्टनुसार ही घटना २०११ सालची युपीएच्या बैठकी दरम्यानची असून खुर्च्यांमधील अदलाबदलीच्या किस्स्याची सविस्तर माहिती या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.
इंडिया टीव्हीच्या रिपोर्टनुसार युपीएच्या बैठकीसाठी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह आणि युपीए अध्यक्षा सोनिया गांधी पंतप्रधानांच्या ‘७ रेसकोर्स’ या निवासस्थानी जमले होते.
बैठकीसाठी जमल्यानंतर मनमोहन सिंह आणि सोनिया गांधी हे एकमेकांच्या खुर्च्यांवर (manmohan changing sit for sonia) जाऊन बसले. परंतु दोघांच्या खुर्च्यामध्ये अदलाबदल झाल्याचे पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था बघणाऱ्या एसपीजी अधिकाऱ्यांच्या लक्षात आले.
पंतप्रधान आणि युपीए अध्यक्षांच्या खुर्चीमध्ये आदलाबदल झाल्याचे लक्षात आल्यानंतर एसपीजी अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम सोनिया गांधींना पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या खुर्चीवरून उठण्यास सांगितले आणि त्यानंतर मनमोहन सिंह यांना देखील त्यांची खुर्ची दुसरी असल्याचे सांगत त्यावर विराजमान होण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर दोघे परत आपापल्या खुर्च्यांवर स्थानापन्न झाले.
एसपीजी प्रोटोकॉलनुसार सुरक्षेच्या कारणांमुळे कुणीही पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसू शकत नाही. परंतु त्या प्रसंगी सोनिया गांधी चुकून पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसल्याने एसपीजी अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करून सोनिया गांधींना पंतप्रधानांच्या खुर्चीवरून उठवावे लागले.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर शेअर केला जात असलेला व्हिडीओ दिशाभूल करणारा आहे.
व्हिडीओ संदर्भात केल्या जात असलेल्या दाव्याप्रमाणे सोनिया गांधी यांच्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना त्यांच्या खुर्चीवरून उठविण्यात आले नव्हते, तर दोघांच्या खुर्च्यांमध्ये अदलाबदली झाल्याने एसपीजी प्रोटोकॉलनुसार मनमोहन सिंह आणि सोनिया गांधी यांना आपापल्या जागेवर स्थानापन्न होण्यास सांगण्यात आले होते.
हे ही वाचा– डॉ. मनमोहन सिंह यांनी २६ सरकारी कंपन्या विकल्याचे सांगणाऱ्या पोस्ट दिशाभूल करणाऱ्या!
[…] […]