Press "Enter" to skip to content

उद्धव ठाकरे यांची संपत्ती मोजताना मिडियाची आकडेमोड चुकली

वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी उद्धव ठाकरे यांची संपत्ती सांगताना वेगवेगळे आकडे छापले आहेत. त्यातील तीन वृत्तपत्रांचा वेगवेगळे आकडे दाखवणारा फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दैनिक सकाळ, लोकसत्ता, लोकमत, महाराष्ट्र टाईम्स यांनी सूत्रांच्या हवाल्याने उद्धव ठाकरे यांची संपत्ती १२५ कोटी असल्याचे सांगितले.

काही वृत्तपत्रांच्या वेब आवृत्तीच्या आणि छापील आवृत्तीच्या आकड्यांमध्ये सुद्धा फरक दिसला. तीच अवस्था वृत्त वाहिन्यांची. झी २४तास ने सुरुवातीला अंदाजे संपत्ती १२५ कोटी अशी बातमी चालवली. त्यानंतर जेव्हा प्रतिज्ञापत्र हाती आलं तेव्हा १४३ कोटी अशी बातमी चालवली आणि आपल्या वेबसाईटवरील बातमीत मुख्यमंत्र्यांची संपत्ती १४३ कोटी २० लाख ७४ हजार ७६३ रुपये असल्याचं सांगण्यात आलंय.

एबीपी माझाने १४३ कोटी २७ लाख एवढी संपत्ती असल्याचं सांगितल. टीव्ही नाईनने सूत्रांच्या हवाल्याने ठाकरे यांची १२५ कोटी रुपये संपत्ती असल्याचं सांगितलं. सरकारनामा या वेब पोर्टलने तर थेट ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १८३ कोटींचे धनी’ असं हेडलाईनमध्ये सांगून टाकलं.

पडताळणी:

उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या आमदारकीसाठी उमेदवारी अर्ज भरला तेव्हा आपली संपत्ती जाहीर केली होती. त्याच अनुषंगाने बातम्या देताना मिडियाने त्यांची संपत्ती सांगताना ही अशी आकडेवारी सांगितली. ज्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्राचा दाखला देत या बातम्या जनतेसमोर आल्या तेच प्रतिज्ञापत्र आम्ही निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून मिळवलं.

या प्रतिज्ञापत्रानुसार उद्धव ठाकरे यांनी रोख रक्कम, बँकेतील खात्यात जमा असलेली रक्कम, इतर पॉलिसीज पोस्ट खाते यात साठवलेली रक्कम, सोनं आणि इतर अशी एकूण २४,१४,९९,५९३ रुपये जंगम मालमत्ता असल्याचं सांगितलं आहे. तेच त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर ३६,१६,४३,४५५ रुपये जंगम मालमत्ता असल्याचं नमूद केलं आहे.

शेतजमीन, जागा आणि ईमारत यांसारख्या स्थावर मालमत्तेची आजच्या भावानुसार उद्धव ठाकरे यांच्या नावावर ५२,४४,५७,९८४ रुपये आणि पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर २८,९२,५९,३३६ रुपये एवढी संपत्ती आहे. त्याचप्रमाणे हिंदू अविभक्त कुटुंब म्हणजेच वडिलोपार्जित मिळालेली आणि ज्यावर बायको आणि मुलीचाही हक्क असतो अशा संपत्तीची रक्कम आहे १,५८,१४,३९५ रुपये.

स्वतः उद्धव ठाकरे, त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि हिंदू अविभक्त कुटुंबाची अशी सर्व स्थावर जंगम मालमत्ता एकत्र केली तर आकडा येतो १४३ कोटी २६ लाख ७४ हजार सातशे एकोण सत्तर रुपये.

वस्तुस्थिती:

स्वतः उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे आणि हिंदू अविभक्त कुटुंबाची अशी एकूण स्थावर जंगम मालमत्ता १४३ कोटी २६ लाख ७४ हजार सातशे एकोण सत्तर रुपये असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे. त्यामुळे सूत्रांच्या हवाल्याने किंवा प्रतिज्ञापत्र हाती येऊनही १२५ कोटी, १८४ कोटी आकडे सांगणाऱ्या बातम्या चुकीच्या आहेत.

ज्यांनी केवळ १४३ कोटी एवढी रक्कम सांगितली आहे त्यांनीही पुढचे २६ लाख ७४ हजार ७६९ रुपये हिशोबातून सोडून दिले असंच म्हणावं लागेल. आणि ज्या बातमीत हिशोब जवळपास बरोबर होता त्या झी २४ तासच्या लिखित बातमीत ही रक्कम उद्धव ठाकरे यांचं ‘उत्पन्न’ आहे असं सांगितलं. हे उत्पन्न नसून एकूण संपत्ती आहे.

केवळ एबीपी माझाने १४३ कोटी २७ लाख असं सांगून खऱ्या आकड्याची राउंड फिगर सांगितल्याचं दिसत आहे जे वस्तुस्थितीच्या बरचसं जवळ जाणारं आहे. इतर चुकीच्या बातम्यांना आम्ही ‘चेकपोस्ट’वर जायबंदी करत आहोत.

हे ही वाचा- ‘कॉंग्रेसचे नेते एक महिन्याचे वेतन पीएम केअरला देणार’ -‘सरकारनामा’ची बातमी दिशाभूल करणारी

More from राजकारणMore posts in राजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा