Press "Enter" to skip to content

दहशतवाद्यांचा ‘इंटर स्कूल्स’ व्हॉट्सऍप ग्रुपशी संबंध असल्याचं सांगत पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिलाय?

‘महाराष्ट्र पोलिस… सूचना… इंटर स्कूल्स (Inter Schools) नावाच्या व्हॉट्सऍप ग्रुपने जर तुम्हाला ग्रुप जॉईन करण्यास सांगितले तर करू नका. हा ग्रुप इसीस (ISIS) संघटनेशी संबंधित आहे. तुम्ही जॉईन केले तर पुन्हा बाहेर पडता येणार नाही. तेव्हा प्लीज जागरूक व्हा. नातेवाईक, मुलांना हा मेसेज पाठवा म्हणजे ते काळजी घेतील. नक्की शेयर करा.’

Advertisement

या अशा वाक्यांसोबत महाराष्ट्र पोलिसांचा आणि ATS चा लोगो टाकून एक ईमेज तयार केलेली आहे आणि ती व्हॉट्सऍपच्या वेगवेगळ्या ग्रुप्स मध्ये शेअर होत आहे.

fake viral msg saying ISIS is having whatsapp group named interschools
Source: Whatsapp

पडताळणी:

ही इमेज अशाच एका ग्रुपवर फॉरवर्ड झाल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’च्या निदर्शनास आले आणि पडताळणीस सुरुवात झाली.

सर्वात आधी आम्ही जेव्हा त्यातील मजकूर वाचला तेव्हाच शंका आली की, जर हा सतर्कतेचा इशारा पोलिस खात्याद्वारे दिला गेला असेल तर तो इतर मुख्य माध्यमांमध्ये बातमीच्या स्वरुपात का नाही समोर आला? दुसरं म्हणजे त्यातील मजकुराची भाषा आणि आर्जवे करण्याची पद्धत ही पोलिस खात्याची अधिकृत भाषा नसल्याचं दर्शवत होती.

तरीही आम्ही गुगलवर काही कीवर्ड्सवापरून सर्च केलं आणि ‘डेक्कन क्रोनिकल’ची २० ऑगस्ट २०१७ची बातमी आम्हाला सापडली. ही बातमी बंगळूरूमधून दिली गेली होती. यामध्ये सांगितल्या प्रमाणे हे असे सतर्कतेचा इशारा दिल्याचे मेसेज तेव्हासुद्धा व्हायरल होत होते. त्यावर ‘डेक्कन क्रोनिकल’ने बंगळूरु पोलिसांशी संलग्न असणाऱ्या सायबर क्राईम डिव्हिजनमधील एक्स्पर्ट्सोबत बातचीत केली होती.

‘हा मेसेज पूर्णतः अतार्किक आहे. एखादी दहशतवादी संघटना अशा कुणाही लोकांना त्यांच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर का सामिल करून घेईल? याने त्यांना असा काय फायदा होईल? कुणीतरी लोकांच्यात घबराट निर्माण व्हावी म्हणून फिरवलेला हा निव्वळ फेक मेसेज आहे. लोकांनी अशा मेसेजेसवर अजिबात विश्वास ठेऊ नये आणि उगाच फॉरवर्ड सुद्धा करू नयेत.’ असं सायबर क्राईमचे अधिकारी म्हणाले.

बातमीत सांगितल्याप्रमाणे हा असा मेसेज २०१७च्या सुरुवातीपासून व्हायरल होतोय. अशाच प्रकारचा दावा करत ‘Firdaus we ascend’ नावाचा व्हॉट्सऍप ग्रुप जॉईन करा म्हणणारेसुद्धा काही मेसेज व्हायरल झाले होते असाही बातमीत उल्लेख आहे.

आणखी सखोल सर्च केल्यावर आम्हाला हे असे दावे करणारे मेसेज विदेशांत सुद्धा व्हायरल झाल्याचे समजले.

fake viral msg saying ISIS is having whatsapp group named interschools english version
Source: Snopes.com

कॅलीफोर्नीयाच्या ‘स्नोप्स डॉट कॉम’ या वेबसाईटने ५ जून २०१७ रोजी आपल्या बातमीत या दाव्यांना फेक म्हणत निकालात काढलेलं आहे.

वस्तुस्थिती:

‘इंटर स्कूल्स’ (Inter Schools) नावाच्या व्हॉट्सऍप ग्रुपला जॉईन होऊ नका, त्याचा ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंध आहे म्हणणारा दावा हा आताचा ताजा नसून २०१७ पासून सर्वत्र फिरतोय. सायबर क्राईमच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा अतार्किक आणि फेक दावा आहे.

असे बरेच दावे ISISच्या नावाखाली व्हायरल होत असतात. शहानिशा केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवणे किंवा फॉरवर्ड करणे चुकीचे आहे. अशा व्हायरल मेसेज, पोस्ट बद्दल आपल्याला शंका असेल तर ‘चेकपोस्ट मराठी’च्या ‘9172011480’ या अधिकृत व्हॉट्सऍप क्रमांकावर पडताळणीसाठी पाठवू शकता.

हेही वाचा: व्हॉट्सऍपने ISIS तुमच्या ‘डीपी’चा गैरवापर करत असल्याचा इशारा दिलाय?

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा