Press "Enter" to skip to content

‘महाराष्ट्रात ‘जय श्रीराम’चा घोष करणाऱ्यांवर कारवाई’ म्हणत भाजप कार्यकर्ते पेरतायेत अफवा!

सोशल मिडियावरून सध्या एक ग्राफिक व्हायरल करण्यात येतंय. हे ग्राफिक म्हणजे ‘बेस्ट हिंदी न्यूज’ या वेबपोर्टलच्या बातमीच्या हेडलाईनचा स्क्रिनशॉट आहे.   

ग्राफिक्सनुसार दावा करण्यात येतोय की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणाऱ्यांविरोधात कारवाई करणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष ताजिंदर सिंग तिवाना यांनी ट्वीटरवर हे ग्राफिक शेअर केलंय. शेअर करताना कॅप्शनमध्ये ते लिहितात,  

“मी बेंबीच्या देठापासून ‘जय श्रीराम’चा घोष करेन आणि कुठल्याच शक्तीला मला असं करण्यापासून रोखण्याचा अधिकार नाही.”

बातमी लिहीपर्यंत ५२८ युजर्सनी हे ट्वीट रिट्वीट केलंय.

सोशल मिडियावर #JaiShriRamAnilDeshmukh या ट्रेंडखाली अनेक ट्वीटर आणि फेसबुक युजर्स गृहमंत्री अनिल देशमुख यांना ‘जय श्रीराम’ची घोषणा देणं गुन्हा आहे का? असा सवाल करताहेत. अनिल देशमुखांना ‘श्रीराम विरोधी’ ‘हिंदूविरोधी’ ठरविण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.  

post on BJP group
Source: Facebook

पडताळणी :

सोशल मिडीयावर व्हायरल होत चाललेल्या या ग्राफिकबद्दल आणि नेमकं प्रकरण काय ते समजून घेण्यासाठी आम्ही ग्राफिकचा मूळ स्रोत असलेल्या बातमीच्या शोधात ‘बेस्ट हिंदी न्यूज’ या वेबसाईटला भेट दिली.

वेबसाईटवरच्या अनेक भाजपधार्जिण्या बातम्यांवरून ती वेबसाईट भाजपशी संबंधितांकडून चालविण्यात येत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर आम्ही वेबसाईट प्रसिद्ध बातमी शोधून ती व्यवस्थित वाचली.   

बातमीनुसार संबंधित प्रकरण हे पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी केलेलं एक ट्वीट आणि त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेलं उत्तर यांच्या संदर्भात आहे.

Credit : Best Hindi News

नेमकं प्रकरण काय ?

नेमकं प्रकरण काय हे समजून घेण्यासाठी आम्ही सर्वप्रथम साकेत गोखले यांच्या ट्वीटर हँडलला भेट दिली. त्यावेळी हे प्रकरण २४ जुलै रोजीचं असल्याचं समजलं.

साकेत गोखले यांनी नुकताच ट्वीटच्या माध्यमातून एक खळबळजनक खुलासा केला होता. साकेत गोखले यांच्या दाव्यानुसार महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील मुख्य निवडणूक आयोग अधिकाऱ्याकडून सोशल मीडिया प्रमोशनसाठी भाजप जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती.  

साकेत यांच्या ट्वीटची दखल घेऊन निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्या शेफाली शरण यांनी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयोग अधिकाऱ्यांकडून आरोपांप्रकऱणी सविस्तर अहवाल मागवला होता.

Credit : Prahar

दम्यान साकेत गोखले यांनी अलाहाबाद हायकोर्टात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या विरोधात याचिका दाखल केली होती. हाच मुद्दा त्यांनी ‘झी न्यूज’ या चॅनेलवर देखील मांडल्यानंतर भाजप आणि आरएसएस कार्यकर्त्यांकडून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं साकेत यांनी २४ रोजी सकाळी ११ वाजून ५२ मिनिटांनी ट्वीट करून सांगितलं होतं.

त्याच दिवशी संध्याकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी ट्वीटरवर एक व्हिडीओ शेअर केला.

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये साकेत लिहितात की आपल्या घराच्या बाहेर आरएसएसचे कार्यकर्ते जमले असून ते जय श्रीरामच्या घोषणा देताहेत. त्यांनी आपल्या आईला देखील  धमकी दिली आहे. साकेत यांनी ठाणे पोलीस आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना याप्रकरणी मदतीचं आवाहन केलं होतं.

साकेत यांच्या याच ट्वीटच्या प्रत्युत्तरात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक ट्वीट केलं. त्यात ते म्हणतात,

‘आम्ही या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली असून प्रकरणात तत्काळ चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तुम्हाला तत्काळ संरक्षण देण्यात येईल. ठाणे पोलिसांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत.’

यात स्पष्ट होतंय की गृहमंत्री अनिल देशमुख हे साकेत गोखले यांच्या घराबाहेर जाऊन त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर, कायदा हातात घेऊ पाहणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देताहेत. यात कुठेही ‘जय श्रीराम’च्या घोषणांचा संबंध नाही.  

वस्तुस्थिती :

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये कुठेही ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणाऱ्यांच्या विरोधात किंवा ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं म्हंटलेलं नाही.

भाजपशी संबंधित वेबसाईटवरील बातमीच्या आधारे महाराष्ट्र सरकार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सोशल मिडीयावर दुष्प्रचार करण्यात येत आहे.

हे ही वाचा- ‘ठाकरे’ सरकारला तानाशाही म्हणत फिरतेय समीत ठक्करच्या अटकेची फेक पोस्ट!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा