मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील व्यंगचित्र फॉरवर्ड केले म्हणून कांदिवली पूर्व येथील माजी निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसेनेच्या शाखाप्रमुख आणि अन्य कार्यकर्त्यांनी मारहाण
मदन शर्मा यांना झालेल्या मारहाण प्रकरणी ६ शिवसैनिकांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना जामीन देखील मंजूर झालेला आहे. अशातच सोशल मीडियावर मात्र दावा करण्यात येतोय की मदन शर्मा हे भारतीय नौदलात नव्हे तर मर्चंट नेव्ही (madan sharma merchant navy) अर्थात व्यापारी नौदलात कार्यरत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव मोहसीन शेख यांनी यासंदर्भात फेसबुक पोस्ट लिहून शर्मा हे व्यापारी नौदलात कार्यरत असल्याची माहिती मिळत असल्याचा दावा केलाय. सेनेला बदनाम करण्याचा विडा उचललेल्या मीडियाचा हा डाव असल्याचा त्यांचा आरोप आहे. देशाच्या संरक्षणमंत्र्याला इंडियन नेव्ही आणि मर्चंट नेव्ही मधला फरक कळत नसल्याचं देखील मोहसीन शेख सांगतात.
सोशल मीडियावरून इंडियन नेव्ही आणि मर्चंट नेव्ही मधील फरक न कळणाऱ्या संरक्षणमंत्र्यांचा राजीनामा देखील मागितला जाऊ लागलाय.
पडताळणी:
मदन शर्मा हे भारतीय नौदलात होते की व्यापारी नौदलात (madan sharma merchant navy) हे शोधण्यासाठी आम्ही पडताळणी सुरु केली असता आम्हाला ‘आज तक’च्या वेबसाईटवर एक बातमी वाचायला मिळाली.
‘मर्चेंट नेवी में नहीं, भारतीय नौसेना में थे मदन शर्मा, आईकार्ड से दिया जवाब’ या हेडलाईन खाली प्रकाशित बातमीत मदन शर्मा यांचं नौदलात कार्यरत असतानाचं ओळखपत्र देखील बघायला मिळालं.
ओळखपत्रानुसार नौदलात त्यांचा नोंदणी क्रमांक 201814-W होता आणि कार्ड क्रमांक MAH-01/013527 होता. ३१ ऑक्टोबर १९९० हा त्यांच्या नौदलातील सेवेचा शेवटचा दिवस असल्याची माहिती देखील या ओळखपत्रावरून मिळते.
मदन शर्मा यांचा मुलगा सनी शर्मा यांनी फॅक्ट चेकिंग वेबसाईट बूम लाइव्ह सोबत बोलताना दिलेल्या माहितीनुसार मदन शर्मा हे १९७४ ते १९९० या काळात भारतीय नौदलात कार्यरत होते. नौदलात ‘चीफ इलेक्ट्रिकल पॉवर’ ही त्यांची रँक होती.
सनी शर्मा यांनी मदन शर्मा यांच्या अंशदायी आरोग्य योजनेचे कार्ड देखील दाखवले ज्यात त्यांची रँक चीफ पेटी ऑफिसर असल्याचा उल्लेख आहे. भारतीय नौदलातून निवृत्तीनंतर मदन शर्मा व्यापारी नौदल अर्थात मर्चंट नेव्ही मध्ये रुजू झाल्याची माहिती देखील सनी शर्मा यांनी ‘बूम’शी बोलताना दिली.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की मदन शर्मा हे भारतीय नौदलात नव्हे, तर व्यापारी नौदलात असल्याचा जो दावा करण्यात येतोय तो फेक आहे.
मदन शर्मा हे १९७४ ते १९९० असे जवळपास १६ वर्षे भारतीय नौदलात कार्यरत होते. भारतीय नौदलातून निवृत्तीनंतर ते व्यापारी नौदलाच्या सेवेत होते.
हे ही वाचा- योगी आदित्यनाथ यांच्या ताफ्याच्या विरोधाचा तीन वर्षांपूर्वीचा व्हिडीओ सध्याचा म्हणून व्हायरल !
Be First to Comment