Press "Enter" to skip to content

‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक!

नोबेल परितोषिक विजेते शास्त्रज्ञ ल्युक मोंटेनियर (luc montagnier) यांनी कोरोनाची (coronavirus) लस घेणारे लोक २ वर्षात मरतील असे भाकीत केल्याचा मेसेज आणि पेपरचे कात्रण सोशल मिडियात व्हायरल होत आहेत.

Source: Whatsapp

अर्काइव्ह लिंक

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक निसार अली, राजेंद्र काळे आणि चंद्रकांत कांबळे यांनी ‘लाईफ साईट न्यूज’च्या लिंकसोबत व्हॉट्सऍपवर देखील ते मेसेज खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि पडताळणीची विनंती केली.

Advertisement
All vaccinated people will die in 2 years whatsapp message
Source: Whatsapp

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने सर्वात आधी व्हायरल मेसेज व्यवस्थित वाचला, त्यानंतर त्यातच दिलेल्या बातमीची लिंक ओपन करून संपूर्ण बातमी वाचली. त्या बातमीतील मजकूर आणि व्हायरल मेसेजमधील मजकूर अजिबातच जुळणारा नाहीये. तरीही आम्ही त्या बातमीची मुळं शोधण्याचा प्रयत्न केला.

  • व्हायरल दाव्यातील बातमीचा आधार काय?

व्हायरल मेसेजसोबतच्या लिंकमधील बातमी ‘रेअर फाउंडेशन युएसए’ या स्वयंसेवी संस्थेने प्रकाशित केलेल्या लेखावर आधारित आहे. या लेखात ल्युक यांच्या मुलाखतीचा २ मिनिटाचा व्हिडीओ सुद्धा आहे. फ्रेंच भाषेत दिलेल्या मुलाखतीचा मूळ ११ मिनिटांचा व्हिडीओ प्लॅनेट ३६० या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

  • कोण आहेत ल्युक मोंटेनियर?

मोंटेनियर (luc montagnier) हे एक फ्रेंच व्हायरोलॉजिस्ट आहेत. २००८ साली एड्स रोगास कारणीभूत असणाऱ्या HIV या विषाणूचा शोध लावून वैद्यकीय क्षेत्रास आपले योगदान दिले म्हणून त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. खरेतर या शोधाचे श्रेय रोबर्ट गॅलो यांचेच असल्याचे वादग्रस्त दावे त्यावेळी प्रसिद्ध झाले होते.

मोंटेनियर यांनी नोबेलमुळे मिळालेल्या प्राप्त झालेल्या विश्वासार्हतेचा आधार घेत विविध अवैज्ञानिक, निराधार दावे केले असल्याचं काही वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. आजवर त्यांनी विविध प्रकारच्या लसीकरनांना केवळ विरोधच केल्याचा इतिहास आहे. ते ‘होमिओपॅथी‘चे समर्थक आहेत ज्यास आधुनिक विज्ञान थारा देत नाही.

  • लसीकरणाबाबत ल्युक मोंटेनियर काय म्हणाले?

मुलाखतीमध्ये मोंटेनियर यांनी लसीकरणास मोठी चूक असे संबोधले आहे.

“ही फार मोठी चूक आहे. वैज्ञानिक चूक, वैद्यकीय चूक आहे. इतिहासात नोंद होईल की लसीकरणामुळे व्हायरसची नवनवी रूपे तयार झाली. ‘चायना व्हायरस’च्या विरोधात लढण्यासाठी लशीने अँटीबॉडीज तयार होतायेत पण त्याने व्हायरस मरतोय की तो शरीरावर हल्ला करण्याचा नवा मार्ग शोधतोय?

कोरोनाची नवी रूपे (variants) लसीकरणाचे फलित आहे. आपण पाहू शकता की प्रत्येक देशाचा लसीकरणाचा आलेख जसा वाढेल तसे मृतांच्या संख्येचा आलेख वाढत आहे. मी अशा कोरोना रुग्णांवर संसोधन करत आहे, जे लस घेतल्यानंतर आजारी पडताहेत. लवकरच मी सिद्ध करून दाखवेल की लसीमुळे व्हायरसची नवी रूपे तयार होतायेत.”

ल्युक मोंटेनियर
  • मोंटेनियर यांच्या दाव्यात किती तथ्य?

‘लसीकरणाचा आलेख जसा वाढेल तसे मृतांच्या संख्येचा आलेख वाढत आहे’ असे त्यांनी म्हंटले आहे. आकडेवारीनुसार इस्राईल हा एकमेव देश आहे ज्याची लसीकरणाची टक्केवारी सर्वात जास्त आहे. ‘रॉयटर्स‘ने प्रसिद्ध केलेल्या इस्राईलच्या लसीकरण आणि मृतांची संख्या असणाऱ्या आलेखाची आम्ही तुलना करून पाहिली तेव्हा मोंटेनियर यांची थियरी तकलादू असल्याचे स्पष्ट झाले. मागच्या सात दिवसात १ लाख नागरिकांमागे केवळ १ कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

  • लस घेतलेल्या लोकांचा २ वर्षात मृत्यू होईल?

“It’s an enormous mistake, isn’t it? A scientific error as well as a medical error. It is an unacceptable mistake. The history books will show that because it is the vaccination that is creating the variants…” असे त्यांचे संपूर्ण वाक्य आहे. ते व्हायरसच्या नव्या रूपांना (variants) ला लसीकरण जबाबदार असल्याचे नमूद करत आहेत परंतु व्हायरल दाव्यातील मेसेजमध्ये ‘It’s an enormous mistake, isn’t it? A scientific error as well as a medical error. It is an unacceptable mistake.’ हे असे अर्धवटच वाक्य घेऊन लोकांची दिशाभूल केली गेलीय.

मुळात ‘लस घेतलेल्या लोकांचा २ वर्षात मृत्यू होईल’ असे वाक्य मोंटेनियर यांनी वापरलेच नाही. या वाक्यासह आंतरराष्ट्रीय विश्वात अनेक बातम्या झाल्या असत्या. अशी एकही बातमी अस्तित्वात नाही.

  • केंद्र सरकारनेही व्हायरल मेसेज फेक असल्याचे सांगितले आहे

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल दावा फेक असल्याचे निष्पन्न झाले. नोबेल विजेते ल्युक मोंटेनियर यांनी ‘कोरोनाची (coronavirus) लस घेतलेले लोक २ वर्षात मृत्यू पावतील’ अशा अर्थाचे दावे केले नाहीत. त्यांनी केवळ लसीकरण कोरोनाच्या नव्या रुपास कारणीभूत असल्याचे सांगितले आहे परंतु त्यासही सबळ पुरावा नाही.

हे ही वाचा: भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रसारास 5G टेस्टिंग जबाबदार आहे का?

More from कोरोनाMore posts in कोरोना »

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा