सोशल मीडियावर ‘लोकसत्ता’ (Loksatta) दैनिकाच्या बातमीचा एक स्क्रिनशॉट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या स्क्रिनशॉटनुसार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी ‘इंधन दरवाढीला पर्याय म्हणून देशातील सर्व रस्ते उताराचे बनवणार’ अशी घोषणा केली असल्याचा दावा केला जातोय.
सोशल मीडिया युजर्स मोठ्या प्रमाणात हा स्क्रिनशॉट शेअर करताहेत. अनेक नेटकऱ्यांकडून या विधानावरून गडकरींना ट्रोल केले जात आहे.
पडताळणी:
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी अशा प्रकारची घोषणा केली असती, तर ती राष्ट्रीय स्तरावरील बातमी ठरली असती. मात्र सगळीकडे केवळ ‘लोकसत्ता’च्या (Loksatta) बातमीचा स्क्रिनशॉट तेवढा व्हायरल होतोय. मूळ बातमीची लिंक कुठेच दिसत नाही. इतर कुठल्या वृत्तपत्राने किंवा वृत्तवाहिनीने देखील याविषयीची काही बातमी दिलेली नाही.
सर्वप्रथम तर आम्ही ‘लोकसत्ता’च्या बातमीचा स्क्रिनशॉट म्हणून व्हायरल होत असलेली बातमी शोधायचा प्रयत्न केला. मात्र आम्हाला गुगलवर या बातमीची लिंक मिळाली नाही. त्यानंतर आम्ही ‘लोकसत्ता’च्या वेबसाईटवर देखील संबंधित बातमी शोधायचा प्रयत्न केला. परंतु तिथे देखील आमच्या हाती निराशाच पडली.
आम्ही नितीन गडकरींच्या सोशल मीडिया हँडल्सवर जाऊन त्यांनी अशा प्रकारचे काही विधान केले आहे का हे शोधायचा प्रयत्न केला. मात्र या ठिकाणी देखील आम्हाला अशा प्रकारची कुठलीही घोषणा करण्यात आल्याचे आढळून आले नाही.
त्यानंतर ‘लोकसत्ता’च्या ट्विटर हँडलला भेट दिली असता आम्हाला या हँडलवरून करण्यात आलेलं ट्विट मिळालं. यात ‘लोकसत्ता’ने अशा प्रकारची कुठलीही बातमी प्रसिद्ध केली नसल्याचं सांगण्यात आलं आहे. संबंधित इमेज खोडसाळपणे समाज माध्यमात पसरविण्यात येतं असल्याचं लोकसत्ताने म्हंटलंय.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ‘इंधन दरवाढीला पर्याय म्हणून देशातील सर्व रस्ते उताराचे बनवणार’ असल्याची घोषणा केलेली नाही.
‘लोकसत्ता’ने अशा प्रकारची कुठलीही बातमी प्रकाशित केलेली नाही. सोशल मीडियावरील व्हायरल स्क्रिनशॉट हा खोडसाळपणा असल्याचं ‘लोकसत्ता’कडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे.
हे ही वाचा- पंतप्रधान मोदींनी एकाच दिवसात वेगवेगळ्या नेत्यांसोबतच्या भेटीत चार वेळा कपडे बदलले?
[…] हे ही वाचा- नितीन गडकरींनी ‘इंधन दरवाढीला पर्याय… […]