Press "Enter" to skip to content

ऑक्सफर्डच्या कोरोना लसीला ५० टक्के यश आल्याचं सांगून ‘लोकमत’ने केली वाचकांची दिशाभूल !

‘ऑक्सफर्डच्या कोरोना लशीला आले ५० टक्के यश’

Advertisement
या हेडलाईनसह दि. २५ मे रोजी दैनिक ‘लोकमत’ने बातमी छापली आहे. कोरोना लस संशोधनातील यश सूचित करणारी ही सकारात्मक बातमी सहाजिकच सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात  व्हायरल व्हायला लागलीये.

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जेन्नर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. अॅड्रियन हिल यांनी लंडनमधून प्रकाशित होणाऱ्या ‘इंडिपेंडंट’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीच्या हवाल्याने ही बातमी छापत असल्याचं लोकमतनेच स्पष्ट केलेलं आहे.

‘आम्ही तयार करीत असलेल्या लसीच्या एक हजार मानवी स्वयंसेवकांवर चाचण्या घेतल्या जात आहेत. परंतु एकूणच ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाला खूपच उतरती कळा लागली असल्याने आमच्या चाचण्यांची यशस्वीता समाधानकारकपणे तपासता येण्याची शक्यता सध्या तरी ५० टक्के दिसते आहे. त्यामुळे ओसरत चाललेली साथ व वेळ यांच्याशी आम्हाला स्पर्धा करावी लागणार आहे.’ असं ‘लोकमत’ने आपल्या बातमीत म्हंटलय.

पडताळणी :

‘लोकमत’ची बातमी हाती लागल्यानंतर ‘चेकपोस्ट मराठी’ने या बातमीची पडताळणी सुरु केली. आमच्या पडताळणीत आम्हाला डॉ. अॅड्रियन हिल यांनी ‘द टेलिग्राफ’ या वृत्तपत्राला दिलेली मुलाखत सापडली.

‘द टेलिग्राफ’च्या बिल गार्डनर यांनी डॉ. अॅड्रियन हिल यांच्याशी संवाद साधला आहे. ‘ऑक्सफर्ड युनिवर्सिटीच्या कोरोना लस संशोधनातून काहीही हाती न लागण्याची ५० टक्के शक्यता’ अशा हेडलाईनखाली २३ मे रोजी ‘द टेलिग्राफ’च्या वेबसाईटवर ही मुलाखत प्रकाशित करण्यात आली आहे.

हेडलाईनमध्ये थोडासा बदल करून हीच मुलाखत ‘टेलिग्राफ’ने आपल्या छापील आवृत्तीत देखील प्रकाशित केली आहे.

या मुलाखतीत लसीच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलताना डॉ. अॅड्रियन हिल सांगतात की, “सप्टेंबरपर्यंत कोरोना लस मिळण्याची शक्यता ८० टक्के असल्याचं आम्ही  वर्षाच्या सुरुवातीला म्हंटलं होतं. पण सद्यस्थितीत अशी ५० टक्के शक्यता आहे की संशोधनाअंती आमच्या हाती काहीही लागणार नाही”

वस्तुस्थिती :

ऑक्सफर्ड विद्यापीठात डॉ. अॅड्रियन हिल यांच्या नेतृत्वाखालील टीम जानेवारीच्या सुरुवातीपासून कोरोना लसीसंदर्भात संशोधन करत आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लसीच्या मानवी शरीरावरील चाचण्यांची सुरुवात झाली होती. त्यामुळे अवघ्या जगाचे लक्ष ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधनाकडे लागले आहे. कोरोना लसीसंदर्भातील सर्वाधिक अपेक्षा याच संशोधनाकडून आहेत.

डॉ. अॅड्रियन हिल यांच्या या ताज्या मुलाखतीवरून तरी असंच दिसतंय की हे संशोधन ‘काहीही हाती न लागण्या’कडेच अधिक वाटचाल करू लागलंय. स्वतः  डॉ. अॅड्रियन हिल यांनीच वर्षाच्या सुरुवातीला सप्टेंबरपर्यंत लस मिळण्याची ८० टक्के शक्यतांची अपेक्षा आता ५० टक्क्यांवर आणली आहे. म्हणजेच ऑक्सफर्डच्या टीमला देखील जाणाऱ्या दिवसागणिक लस मिळण्याची शक्यता धूसर होताना दिसायला लागली आहे. मुलाखतीत त्यांनी तसं स्पष्ट बोलून दाखवलंय.

अशा परिस्थितीत ‘दै. लोकमत’ने डॉ. अॅड्रियन हिल यांचाच संदर्भ देऊन ‘ऑक्सफर्डच्या कोरोना लशीला आले ५० टक्के यश’ अशी सकारात्मक अर्थाची बातमी छापून वाचकांची दिशाभूल केल्याचे स्पष्ट होते.

‘लोकमत’च्या बातमीत दुसरी एक तांत्रिक चूक अशी की ‘लोकमत’ने ही बातमी ‘इंडिपेंडंट’ या इंग्रजी वृत्तपत्राच्या हवाल्याने छापलीये. ‘इंडिपेंडंट’ या लंडनमधून प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्राशी बोलताना डॉ. हिल म्हणाले..” असंच ‘लोकमत’ने आपल्या बातमीत म्हंटलय. परंतु डॉ. हिल यांनी ‘इंडिपेंडंट’ला मुलाखत दिलेलीच नाही.

“कोरोना व्हायरस: ऑक्सफर्ड लसीचे संशोधन यशस्वी ठरण्याची ‘फक्त ५० टक्के’ शक्यता” या हेडलाईनसह ‘इंडिपेंडंट’ने ही बातमी जरूर छापली आहे, परंतु ‘इंडिपेंडंट’ने देखील ही बातमी डॉ. अॅड्रियन हिल यांनी ‘द टेलिग्राफ’च्या बिल गार्डनर यांना दिलेल्या मुलाखतीच्या हवाल्यानेच छापली असल्याचे स्पष्ट केले आहे. यावरून ‘लोकमत’ने बातमीचे ‘सूत्र’ सांगताना देखील गफलत केली असल्याचे स्पष्ट होते.

हे ही वाचा- जगातील पहिली कोरोना लस चाचणी केलेल्या महिलेच्या मृत्यूची बातमी खोटी !

More from कोरोनाMore posts in कोरोना »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा