कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशातील अनेक राज्यांमध्ये निर्बंध लादण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारकडून देखील या संदर्भाने दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत माजलेल्या हाहाकारामुळे अनेकांकडून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याची मागणी देखील केली गेलीये. अशातच सोशल मीडियावर गृह मंत्रालयाच्या आदेशाची एक प्रत व्हायरल होतेय. त्याआधारे 30 जून पर्यंत संपूर्ण भारतात लॉकडाऊन (lockdown till 30 june) लावला जाणार असल्याचा दावा केला जातोय.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक एड. मयूर गव्हाणे यांनी हाच आदेश आणि त्यासोबतचा मेसेज व्हाट्सअपवर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
आम्ही सर्वप्रथम गृह मंत्रालयाच्या आदेशाची व्हायरल प्रत व्यवस्थित बघितली. संबंधित आदेशाची प्रत केंद्रीय गृह मंत्रालयाचीच आहे. २७ मे रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देशातील कोरोना प्रतिबंधाचा संदर्भातील निर्देश जारी केले आहेत.
गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेले पूर्वीचेच दिशानिर्देश ३० जून २०२१ पर्यंत कायम ठेवण्यात येणार आहेत. परंतु त्यात कुठेही ३० जून पर्यंत संपूर्ण भारतात लॉकडाऊन (lockdown till 30 june) लावला जाणार असल्याचं म्हंटलेलं नाही.
देशातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहे, अशा निवडक जिल्ह्यांना स्थानिक पातळीवर परिस्थितीचा आढावा घेऊन कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र संपूर्ण देशात लॉकडाऊन लावण्याविषयी कुठलेही भाष्य करण्यात आलेले नाही.
केंद्र सरकार संपूर्ण देशात लॉकडाऊन लावण्याच्या दृष्टीने अनुकूल नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० एप्रिल २०२१ रोजी देशवासियांना संबोधित करताना याविषयीची सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे. राज्यांनी लॉकडाऊन शेवटचा पर्याय म्हणून वापरावा आणि सर्वांनी एकत्रीत येऊन काम करावे, असे आवाहन त्यावेळी पंतप्रधानांनी केले होते.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील ३० जून पर्यंत संपूर्ण भारतात लॉकडाऊन लावला जाणार असल्याचे व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत. सरकारकडून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लावला जाणार असल्याची घोषणा करण्यात आलेली नाही, तर पूर्वीचेच आहे ते निर्बंध ३० जून पर्यंत कायम ठेवले जाणार आहेत. नव्याने कुठलेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत.
हे ही वाचा- ‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल मेसेज फेक!
Be First to Comment