कुठल्याशा बाबाचा एक व्हिडीओ आणि आंध्रप्रदेशमधील रंगा व्यंकटेश राव यांची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होतेय. यामध्ये नाकात लिंबाच्या रसाचे थेंब टाकून कोरोना जातो (lemon drop corona cure) असा छातीठोक दावा करण्यात आलाय.
काय आहेत व्हायरल दावे?
१. ‘अब कोई महामारी से नही मरेगा,बस यह बीडीओ उसके पास होनी चाहिये,**दो बूंद जिंदगी की,**यह रामबाण उपाय है लाखो पर आजमाया हुआ।**आपको अपने परिवार समाज और देश के प्रति थोड़ी भी करुणा हो तो इसे एक बार अवश्य भेज दीजिये,*चैनल सब्सक्राइब मत करिए लेकिन यह वीडियो अवश्य भेज दीजिये क्योकि यह इस आपदा में मानव जाति की जिंदगी का सवाल है।जय श्रीराम’ या कॅप्शनसह एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय.
या विषयी ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक गणेश औटी यांनी पडताळणीची विनंती केली आहे.
२. संपूर्ण जगभर थैमान घातलेला कोव्हीड१९ आता फक्त एक रुपयात घरगुती पद्धतीने बरा होऊ शकतो असा दावा आंध्र प्रदेशातील रंगा व्यंकटेश्वर राव यांनी केलाय. हा दावा खोटा निघाल्यास पाच लाख रुपये बक्षीस देण्याचीही राव यांची तयारी आहे. त्यांनी यापूर्वी केलेल्या निस्वार्थी सेवेबद्दल राव यांना राष्ट्रपती पदक देखील मिळालेले आहे. असे त्या व्हायरल पोस्टमध्ये सांगण्यात आलेय.
सदर स्क्रीनशॉट व्हॉट्सऍपवर व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक राजेंद्र काळे, यशवंत पाटील, अजीव पाटील आणि सलीम गवंडी यांनी निदर्शनास आणून दिले.
याच मजकुराची बातमी पारनेर दर्शन आणि लोकशा या वेबसाईटवर देखील करण्यात आली आहे .
पडताळणी:
संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोविड -१९ च्या संसर्गामुळे कोलमडून पडली आहे. कोरोनावरील उपचार, औषधांचा-संरक्षक किटचा खर्च, लॉकडाऊनमुळे ठप्प झालेले व्यवहार यामुळे सगळ्याच देशातील अर्थव्यवस्था मोडकळीस आलीय.
अशातच केवळ १ रुपयात घरगुती उपचारांनी कोरोना बरा होत असल्याचा दावा करणाऱ्या पोस्ट व्हायरल होणे स्वाभाविक आहे. म्हणूनच सत्यता जाणून घेण्यासाठी ‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणीस सुरुवात केली.
लिंबाच्या रसाचा कोरोनावर परिणाम होऊ शकतो?
व्हायरल दाव्यात राव यांनी लिंबाचा वापर करत असल्याचे सांगितले आहे. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असल्याने रोजच्या जीवनात त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
रंगा व्यंकटेश्वर राव यांनी केलेल्या दाव्याला पडताळून पाहण्यासाठी आम्ही काही की वर्डसने गूगल सर्च केलं. तेव्हा अमेरिकेतील ‘नॅशनल अकॅडमिक्स ऑफ सायन्सेस इंजिनीअरिंग मेडिसिन’ आणि ‘मॅकमास्टर ऑप्टीमल एजिंग पोर्टल’ या दोन संस्थांचे लिंबाच्या रसासंदर्भातील रिपोर्ट्स मिळाले.
१. मॅकमास्टर ऑप्टीमल एजिंग पोर्टल–
रिपोर्टनुसार व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असणाऱ्या लिंबाने अथवा व्हिटॅमिन सीने साधारण सर्दी पडस्याचा कालावधी कमी होऊ शकतो. अथवा त्याची तीव्रता कमी होऊ शकते मात्र लिंबाच्या रसाने श्वसन मार्गाद्वारे विषाणू नष्ट होत असल्याच्या दाव्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाहीये.
२. नॅशनल अकॅडमिक्स ऑफ सायन्सेस इंजिनीअरिंग मेडिसिन–
लिंबाच्या रसासारख्या अॅसिडिक पदार्थांचे सेवन केल्याने कोरोना व्हायरसच्या संसर्गावर कोणताही परिणाम होत नाही. व्हायरस जेव्हा आपल्या शरीरातील पेशींमध्ये प्रवेश करतो तेव्हा स्वत: च्या प्रती शरीरात बनवतात आणि त्याद्वारे शरीरात व्हायरल इन्फेक्शन पसरते. नंतर त्या प्रती नवीन पेशींमध्ये प्रवेश करतात आणि प्रक्रियेची पुनरावृत्ती करतात. लिंबाचा रस आपल्या शरीरातील व्हायरस नष्ट करणार नाही किंवा व्हायरस कॉपी करण्याची प्रक्रिया देखील थांबवणार नाही.
व्हायरल व्हिडीओतील बाबाचा दावा अवैज्ञानिक:
युट्युबवर या बाबाने सदर दाव्याचा व्हिडीओ अपलोड केला होता. तेथूनच तो सोशल मीडियात व्हायरल झाला. जेव्हा युट्युबच्या लक्षात हा दावा अवैज्ञानिक आणि लोकांची दिशाभूल करणारा आहे असे लक्षात आले तेव्हा त्यांनी ‘नियमभंग’ झाला म्हणत तो व्हिडीओ काढून टाकलाय.
‘प्रेस इन्फोर्मेशन ब्युरो’ने दिलाय फेकचा शिक्का:
माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या PIBने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सदर दावा फेक असल्याचे सांगितले आहे.
कोण आहेत रंगा व्यंकटेश्वर राव?
व्हायरल पोस्ट ज्यांच्या नावाने फिरत आहे ते राव रंगा व्यंकटेश राव कोण? जाणून घेण्यासाठी आम्ही गूगल सर्च केले असता इतर कोणत्याही वेबसाईटवर आम्हाला त्यांच्याविषयीची माहिती मिळाली नाही. राव यांची फेसबूक प्रोफाइल मात्र मिळाली.
प्रोफाइलनुसार राव हे आंध्र प्रदेशातील निदादावोल येथील रहिवासी आहेत. निदादावोल लायन्स क्लबचे ते २०१८-२०१९ दरम्यान अध्यक्ष होते. राव यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याचे पुरावे मात्र आम्हाला कोठेही मिळाले नाहीत. खुद्द राव यांच्या प्रोफाईलवर देखील याचा उल्लेख नाहीये.
राव यांची फेसबूक प्रोफाइल चाळली असता, व्हायरल झालेल्या दाव्याप्रमाणेच (lemon drop corona cure) आणखी काही दावे त्यांनी केले आहेत. ज्यात त्यांनी प्राणी आणि माणसांना कोरोना व्हायरस पासून बचाव कसा करायचा हे सांगितलेय.
रंगा व्यंकटेशर राव यांचा घुमजाव:
हैद्राबादमधून चालवल्या जाणाऱ्या न्यूजमीटर या पोर्टलने रंगा राव यांच्याशी थेट संपर्क साधून या दाव्याविषयी चौकशी केली. त्यावेळी रंगा यांनी थेट हात वर करत ‘हा उपाय कोव्हीड१९ रुग्णांसाठी नाहीये, मी त्यांना हा उपाय करावा असा सल्लाही कधी देणार नाही” असे सांगितले.
त्यांचे स्वतःचे नाक ब्लॉक झाले होते तेव्हा त्यांनी हा उपाय करून पाहिला. त्यांना आराम मिळाला हे त्यांनी लायन्स क्लबच्या बैठकीत सांगितले. यावरून पुढे त्याच लोकांनी या पद्धतीचा प्रसार केला असे त्यांनी न्यूजमीटरला सांगितले.
लिंबाचा रस नाकात घशात टाकणे धोक्याचे:
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे आपल्या सर्वांगीण आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असते. परंतु, थेट नाकात किंवा घशात लिंबू पिळणे हे त्रासदायक ठरू शकते. त्यातील आम्लघटकाने नाक घसा चूरचुरू शकतात. घसा खवखवणे चालू झाले तर शेजाऱ्यालाच काय स्वतःलाही कोरोना संसर्गाची भीती जाणवू लागेल. त्यामुळे असे अघोरी प्रयोग न करण्यातच शहाणपण आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी‘ने केलेल्या पडताळणीत लिंबाचा रस कोरोनावर रामबाण इलाज असल्याचे सांगणारे व्हायरल दावे (lemon drop corona cure) खोटे असल्याचे निष्पन्न झाले. नाकपुड्यामध्ये लिंबाच्या रसाचा एक थेंब टाकल्यास नाक, घसा व फुफ्फुसामध्ये पडलेला विषाणू- कफ स्वरूपात तोंडातून बाहेर येत असल्याचा दावा निराधार आणि अशास्त्रीय आहे.
सुरक्षित अंतर, हॅण्ड वॉश-सॅनिटायझरचा आणि मास्कचा योग्य वापर याच साध्यासरळ उपायांनी आपण कोरोना व्हायरसचा धोका टाळू शकतो.
हेही वाचा: कोरोना साथीला बनावट म्हणणारे डॉ. विश्वरूप आणि हर्षद रुपवतेंचा लेख किती विश्वासपात्र?
[…] हेही वाचा: लिंबाच्या रसाचे थेंब नाकात टाकल्याने… […]
[…] हे ही वाचा: लिंबाच्या रसाचे थेंब नाकात टाकल्याने… […]