Press "Enter" to skip to content

TikTok ला ‘स्वदेशी’ पर्याय म्हणून तुफान चाललेलं Mitron ऍप मूळचं ‘पाकिस्तानी’!

“चीनचे आहे म्हणून ज्यांनी tiktok अनइनस्टॉल केले आणि Mitron घेतले. का तर म्हणे भारतीय आहे? तर त्यांच्यासाठी? Mitron ऍप पाकिस्तानी? मोठा गेम झाला रे”

Mitron वापरणाऱ्यांची खिल्ली उडवत प्रवीण जाधव या फेसबुक युझरने INC42 च्या बातमीचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे.

https://www.facebook.com/photo.php?fbid=4458595530824596&set=a.628935047124016&type=3&theater

‘TikTokला टक्कर देतंय भारतीय ‘Mitron App’; आतापर्यंत 50 लाखहून अधिक वेळा डाऊनलोड’ अशी २७ मे रोजी ‘झी २४ तास’ने बातमी दिली होती. यामध्ये आयआयटी रुडकीच्या शिवांक अग्रवाल या विद्यार्थ्याने हे ऍप तयार केलं असल्याचं सांगण्यात आलं होतं.

शिवांक अग्रवालने हे ऍप तयार केलं असल्याच्या बातम्या हिंदी, मराठी आणि  इंग्रजी या सर्वच भाषांमधल्या माध्यमांनी लावल्या होत्या. या सर्व बातम्यांचा एकच स्रोत होता. दीपक अबोट यांचं ट्विट.

Advertisement

पेटीएम कंपनीचे माजी उपाध्यक्ष आणि सध्याच्या फ्लॅट व्हाईट कॅपिटलचे को-फाउंडर असलेल्या दीपक अबोट यांनी ट्विटमध्ये Mitron ऍपचं आणि कमी काळात मिळालेल्या लोकप्रियतेचं कौतुक केलं होतं.

‘टिकटॉक’ के कंपटीशन में स्वदेशी ‘मित्रों’ ने मचाई धूम, लांच के पहले ही महीने में 50 लाख हुए डाउनलोड्स’ अशी ‘द प्रिंट’ने, ‘टिकटॉक से बड़ा ऐप बन गया स्वदेशी Mitron, 50 लाख से अधिक लोगों ने किया डाउनलोड’ अशी झी न्यूजने आणि इतरही अनेक माध्यमांतून Mitronच्या स्वदेशी असण्यावर फार जोर दिला होता.

म्हणूनच त्याच्या पाकिस्तान कनेक्शनची ‘चेकपोस्ट’वर पडताळणी करणे गरजेचे होते.

पडताळणी:

Tiktok ला स्वदेशी पर्याय मानल्या गेलेल्या Mitron ऍप बद्दल वेगवेगळ्या ठिकाणावरून बऱ्याच चर्चा झडल्या. या चर्चांना पूर्णविराम मिळावा म्हणून ‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणीला सुरुवात केली.

सर्वात आधी आम्ही प्रवीण जाधव यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये ज्या INC42च्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला होता, ती बातमी शोधली.

काय आहे ती बातमी?

५ जून २०२० रोजीच्या बातमीनुसार ‘प्रायव्हसी पॉलिसी’च्या अटी आणि शर्तींची पूर्तता न केल्याने गुगलने प्ले स्टोअर वरून Mitron ऍप उडवलं होतं. अटींची पूर्तता केली गेल्याने Mitron पुन्हा प्ले स्टोअरवर दाखल झालंय.

परंतु, प्रायव्हसी पॉलिसीज Mitronच्या टीमने स्वतः बसून बनवलेल्या नसून ऑनलाईन पॉलिसी जनरेटरने केवळ कंपनीचं नाव बदलून तयार केलेल्या आहेत.

शेवटी त्यात असंही सांगण्यात आलंय की, काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध बातम्यानुसार हे समोर आलंय की हे ऍप पाकिस्तानी सॉफ्टवेअर कंपनी Qboxus ने भारतीय डेव्हलपर्सला २६०० रुपयांत सोर्स कोड घेऊन सुपूर्द केलंय.

‘चेकपोस्ट मराठी’ने शहानिशा करण्यासाठी Qboxusच्या अधिकृत वेबसाईटवर या विषयी काही मिळतंय का ते शोधलं.

काय आहे हे Qboxus?

वेबसाईटच्या होमपेजवरच दर्शनी भागात लिहिलंय, ‘We are Qboxus – A team of passionate designers and Developers from Pakistan’

यातच Qboxus पाकिस्तानी असल्याचं स्पष्ट झालं.

Credit: Qboxus

होमपेजवरच स्क्रोल करून खाली गेल्यावर आमचा प्रोजेक्ट म्हणत Mitron ने पाच मिलियन युझर्सचा टप्पा पार केल्याचा आनंदही दिसला. त्यावर क्लिक केल्यावर दुसऱ्या वेबसाईटवर रीडायरेक्ट झालो.

Credit: Qboxus

तिथे आम्हाला टिक टिक नावाचं एक ऍप विक्रीला असल्याचं दिसलं. ज्याची किंमत आहे ३४ डॉलर्स म्हणजे आताच्या रुपयाच्या मुल्यानुसार 2,565.75 रुपये.

Credit: Qboxus

त्याच पेजवर खाली पुन्हा एकदा Mitron च्या ५ मिलियन डाऊनलोड झाल्याचं सेलिब्रेशन होतं. त्यापुढे खाली TikTik या व्हिडीओ क्रिएट आणि शेअर करता येणाऱ्या ऍप बद्दल माहिती असून तीच संकल्पना ठेऊन बनवलेल्या ऍप्सची लिस्ट सुद्धा आहे. या लिस्ट मधील सर्वात पहिलं नाव Mitron आहे.

Credit: Qboxus

Qboxus ने जरी हा दावा केला असला तरीही; ते म्हणत आहेत म्हणून Mitron त्यांचंच, यावर शिक्कामोर्तब होत नाही. यावर Mitron च्या मालकाचं काय म्हणनं आहे हे सुद्धा ऐकायला हवं.

काय म्हणतात Mitron चे मालक?

‘झी २४ तास’च्या बातमीनुसार आयआयटी रूडकीचा विद्यार्थी असलेल्या शिवांक अग्रवाल या विद्यार्थ्याने हे ऍप तयार केलंय.

आम्ही शिवांक अग्रवालला शोधायचा प्रयत्न केला, परंतु Mitronगुगलने काढलं, ते पाकिस्तानीच आहे किंवा ते tiktokला स्वदेशी पर्यायच कसा आहे या अशा प्रकारच्या बातम्या सोडल्या तर शिवांक अग्रवालची ओळख पटवणारी  कुठलीही माहिती आम्हाला मिळाली नाही.

दैनिक जागरणने आयआयटी रूडकीला संपर्क साधला तेव्हा त्यांनी संस्थेचा या ऍपसोबत काही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. जागरणने शिवांक अग्रवाल यांना संपर्क साधला असता याविषयी त्यांनी काहीही माहिती देण्यास मनाई केली असं त्याच बातमीत सांगितलंय.

अजून शोधाशोध केल्या नंतर ‘App back on Play Store, Mitron app founders claim they’ve nothing to do with Pak code’ अशी ‘इंडियन एक्स्प्रेस’ची बातमी आम्हाला मिळाली.

यामध्ये एक्स्प्रेसचा Mitronच्या संस्थापकांशी संपर्क झाल्याचं दिसतंय. बातमीनुसार शिवांक अग्रवाल आणि अनिश खंडेलवाल या दोघांनी संस्थापक या नात्याने स्पष्टीकरण दिलं आहे. त्यात त्यांनी पाकिस्तानी कंपनी Qboxusच्या दाव्यांना फेटाळून लावत Mitron साठीचा प्राथमिक प्रोटोटायपिंग कोड आम्ही ऑस्ट्रेलियन कंपनी ‘एनवाटो मार्केटप्लेस’ येथून घेतला असल्याचं सांगितलय.

हे ‘एनवाटो मार्केटप्लेस’ कुठेतरी वाचल्याचं आमच्या ध्यानात आलं. पुन्हा उलटतपासणी चालू झाली आणि सगळी गुत्थी उलगडली.

Qboxus चा आणि Envato Market चा संबंध:

आम्ही Qboxus च्या वेबसाईटवर पुन्हा गेलो. पुन्हा बारकाईने तपास केला आणि लक्षात आलं. जेव्हा अधिक माहिती साठी क्लिक केल्यावर वेबसाईट रीडायरेक्ट होऊन दुसऱ्या कुठल्या वेबपेजवर उघडते; ते वेबपेज ‘एन्वाटो मार्केट’शीच सलग्न आहे.

Credit: Qboxus

याचा अर्थ काय तर, Qboxusने ऍप तयार केलंय आणि Envato Market वर विकायला ठेवलंय.

वस्तुस्थिती:

टिकटॉकला स्वदेशी पर्याय, एक महिन्यात पाच मिलियन डाऊनलोड्स अशा वेगवेगळ्या वाक्यांनी ज्या Mitron ऍपची भलामण चालू होती. त्याविषयी अनेक दावे-प्रतिदावे बाजारात दिसत होते. या सर्व दाव्यांना ‘चेकपोस्ट मराठी’ने पूर्णविराम देत पडताळणी केली आणि वस्तुस्थिती समोर आली की Qboxus या पाकिस्तानी कंपनीने या mitronचं मूळ ऍप असलेलं ‘टिकटिक’ तयार केलं आणि Envato Market या साईटवर विकायला ठेवलं.

Mitronच्या संस्थापकांनी टिकटिकचा सोर्सकोड विकत घेतला. त्यावर टिकटिक ऐवजी mitron हे नाव टाकलं आणि थीम कलर बदलून री ब्रांडींग केली. टिकटॉक सारख्या प्रचंड लोकप्रिय ऍपला टक्कर देण्यासाठी त्यांनी ‘स्वदेशी’चा मुद्दा वापरला आणि आपला फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला.

एकुणात काय? तर टिकटॉकला ‘स्वदेशी’ पर्याय म्हणून तुफान चाललेल्या Mitronची मुळं पाकिस्तानीच आहेत हे पुराव्यानिशी सिद्ध झालंय.

हे ही वाचा

‘चीन स्वतःच ‘बॉयकॉट चायना’ लिहिलेल्या टोप्या बनवतोय’ सांगणारी व्हायरल पोस्ट फेक

More from राजकारणMore posts in राजकारण »
More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा