Press "Enter" to skip to content

किडनी कांडातील आरोपी डॉ. देवेंद्र शर्माच्या अटकेचा कोरोनाशी काहीही संबंध नाही!

कोरोना व्हायरस आणि त्यासंदर्भातील अफवा किंवा फसवे दावे हे आता जवळपास रोजचंच झालंय. रोजचं कोरोनाच्या संदर्भाने काहीतरी नवीन दावे फिरत असतात. सध्या सोशल मीडियात न्यूजपेपरच्या बातमीचं कटिंग खूप व्हायरल होतंय.

Advertisement

काय आहे या कटिंगमध्ये?

‘किडनी कांड में शामिल डॉ. देवेंद्र शर्मा गिरफ्तार, सौ से ज्यादा की हत्याऐं’ अशी हेडलाईन असणारं हे न्यूज कटिंग आहे. कटिंग सोबत दावा केला जातोय की निरोगी व्यक्तीला कोरोना पेशंट असल्याचं सांगून १२५ लोकांची किडनी काढून हत्या करणारा डॉ. देवेंद्र शर्मा (dr. devendra sharma kidney kand) अटक. कुठल्याही निरोगी माणसाचा जर कोरोनामुळे मृत्यू झाला तर डॉक्टरकडून तुम्हाला सोपविण्यात येणाऱ्या मृतदेहाची तपासणी नक्की करा.

devendra sharma kidney kand
Source: Whatsapp

फेसबुकवर देखील याच बातमीची कटिंग आणि सोबत अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचा फोटो व्हायरल होतोय. या पोस्टमध्ये देखील १२५ कोरोना रुग्णांच्या किडन्या काढून त्यांची हत्या करणाऱ्या डॉ. देवेंद्र शर्माला (dr. devendra sharma kidney kand) अटक करण्यात आल्याचा तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पेशंटचा मृतदेहाची तपासणी करण्याचा दावा अगदी जशास तसा कायम आहे.

स्वस्थ आदमी को कोरोना पेशेंट बता कर अब तक 125 लोगो का किडनी निकाल कर हत्या करने वाला डॉ देवेन्द्र शर्मा गिरफ्तारऐसे ना…

Posted by Lovedeep Grewal on Sunday, 2 August 2020

अर्काइव्ह पोस्ट

लव्हदीप ग्रेवाल या युजरने टाकलेली ही फेसबुक पोस्ट तब्बल १८०० वेळा शेअर झालीय. सदर पोस्ट व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक जेकब डिकुह, भाग्यश्री चव्हाण आणि दिग्विजय पाटील आणि विनोद भालेराव यांनी वेगवेगळ्या माध्यमांतून व्हायरल स्क्रिनशॉटच्या सत्यतेबद्दल विचारणा केली.

पडताळणी:

बातमीची सत्यता तपासण्यासाठी आम्ही काही किवर्डससह गुगल सर्च केलं. त्यावेळी आम्हाला डॉ. देवेंद्र शर्माच्या अटकेच्या अनेक बातम्या सापडल्या.
‘लाईव्ह हिंदुस्थान’मध्ये ३० जुलै रोजी प्रकाशित बातमीनुसार दिल्ली पोलिसांनी अलिगढचा निवासी असणाऱ्या डॉ. देवेंद्र शर्मा उर्फ डॉ. डेथ याला खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे.

३० जुलै रोजीच ‘प्रभात खबर डिजिटल’वर प्रकाशित बातमीमध्ये डॉ. देवेंद्र शर्मा विषयी बरीच माहिती वाचायला मिळते. त्यानुसार डॉ. देवेंद्र शर्मावर २००२ ते २००४ या काळात दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमध्ये १०० पेक्षा अधिक टॅक्सी चालकांची हत्या केल्याचा आरोप आहे. त्याने बिहारमधील सिवान येथून बीएएमएसची डिग्री घेतली होती.

देवेंद्र शर्माचा किडनी कांडात (dr. devendra sharma kidney kand) समावेश होता. त्याच्यावर १९९४-२००४ या काळात साधारणतः १२५ लोकांच्या किडन्यांचे बेकायदेशीर प्रत्यारोपण, खोटी गॅस एजन्सी चालवणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत. देवेंद्र शर्माला २००४ साली १२५ लोकांच्या किडन्यांचे बेकायदेशीर प्रत्यारोपण केल्याप्रकरणी अटक देखील झाली होती.

dr devendra sharma kidney kand news screenshot
Source: Prabhatkhabar

टाईम्स ऑफ न्युजच्या बातमीनुसार, देवेंद्र शर्मा १६ वर्ष जयपूर जेलमध्ये होता. त्याला २८ जानेवारी २०२० रोजी पॅरोलवर सोडण्यात आले होते. मात्र २० फेब्रुवारी रोजी पॅरोलचा कालावधी संपल्यानंतर तो पळून गेला होता. आता जुलै २०२० मध्ये दिल्ली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की सीरिअल किलर डॉ. देवेंद्र शर्माने १९९४ ते २००४च्या दरम्यान किडनी कांड केलेय. त्यासाठी त्याने आतापर्यंत १६ वर्ष शिक्षा भोगलीय. आता तो पॅरोलवर असताना फरार झाला आणि परत पकडला गेला म्हणून पुन्हा चर्चेत आलाय.

त्यामुळे त्याचा कोरोनाशी किंवा कोरोना पेशंटच्या शरीरातील पेशंटच्या किडनी काढण्याशी काहीही संबंध नाही. सोशल मीडियावर व्हायरल दावे फेक आहेत.

कोरोना काळात पेशंटच्या शरीरातील अवयव काढून घेतले जात असल्याचे दावे यापूर्वी देखील करण्यात आले होते. त्याची ‘चेकपोस्ट मराठी’ने केलेली पडताळणी आपण ‘येथे‘ वाचू शकता.

तुम्हाला देखील एखाद्या दाव्याच्या खरेपणाविषयी काहीएक शंका असेल तर आमच्या ९१७२०११४८० या अधिकृत क्रमांकावर पडताळणीसाठी पाठवू शकता. आम्ही तुम्हाला खरं -खोटं सांगू.

हेही वाचा: ‘मुंबईत कोरोनाच्या नावावर अवयव तस्करीचा घोटाळा’ सांगण्यासाठी शेअर केले जाताहेत लखनऊचे फोटोज !

More from कोरोनाMore posts in कोरोना »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा