आरआरबी आणि एनटीपीसी परीक्षांच्या निकालांमध्ये झालेल्या गोंधळामुळे गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची आंदोलने सुरु आहेत. या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागले आहे.
आता यासंदर्भात बिहारच्या पटना येथील शिक्षक खान सर (Khan Sir) यांची 33 सेकंदांची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होतेय. दावा केला जातोय की खान सर यांच्या चिथावणीमुळे विद्यार्थ्यांमध्ये हिंसा भडकली.
व्हिडिओमध्ये खान सर म्हणताहेत की सरकारने आभार मानायला हवेत की सध्या कोरोनाचा काळ आहे, म्हणून मुले रस्त्यावर आलेली नाहीत. पण परिस्थिती अशीच राहिली तर विद्यार्थी नक्कीच रस्त्यावर येऊन आंदोलन करतील आणि जर त्यांनी तसे केले नाही तर आम्ही त्यांना रस्त्यावर घेऊन येऊ. मग दिल्लीत जागा नाही पुरणार विद्यार्थ्यांसाठी.
अरुण पुदुर यांनी याच आंदोलनाच्या संदर्भाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय.
अनेकांकडून हा व्हिडीओ कोचिंग जिहादच्या दाव्यासह शेअर केला जातोय.
पडताळणी:
किवर्डसच्या आधारे यूट्यूबवर शोध घेतला असता आम्हाला ‘खान जीएस रिसर्च सेंटर’ या चॅनेलवर 31 ऑगस्ट 2020 रोजी अपलोड करण्यात आलेला संपूर्ण व्हिडीओ बघायला मिळाला. सध्या व्हायरल होत असलेली क्लिप याच व्हिडिओतील आहे. व्हिडिओमध्ये 13 मिनिटांनंतर आपण ही क्लिप बघू शकता.
व्हिडिओमध्ये खान सर SSC रेल्वेच्या धोरणांमुळे विद्यार्थी आणि शिक्षक दोघेही कशाप्रकारे त्रस्त आहेत, याविषयी बोलताहेत. SSC-रेल्वेमधील रिक्त पदांसाठी परीक्षा घेतली जात नसल्याबद्दल ते यंत्रणेवर टीका करताहेत.
खान सर म्हणताहेत की 2018, 2019 मध्ये निघालेल्या SSC रेल्वे भरतीच्या परीक्षांचा काहीही पत्ता नाही. परीक्षा कधी होणार हे कोणालाच माहीत नाही. पेपर फुटणे ही देखील मोठी समस्या आहे. यंत्रणेमधील अनेक समस्यांवर बोलताना ही परिस्थिती अशीच राहिली तर विद्यार्थी रस्त्यावर उतरतील असे त्यांनी म्हंटले होते.
आंदोलक विद्यार्थी नेमके रस्त्यावर का उतरले आहेत आणि या आंदोलनाला खान सर जबाबदार आहेत का याविषयी यूट्यूबर ध्रुव राठीने आपल्या विश्लेषणात्मक व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रकरणाविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय. व्हिडिओमध्ये खान सर SSC-रेल्वे परीक्षेच्या सावळ्या गोंधळाविषयी आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या नाराजीविषयी बोलताहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे व्हिडीओ सध्याचा नसून तो जवळपास दिड वर्षे जुना आहे.
हेही वाचा- मुंबईची ओळख म्हणून पोस्ट करण्यात आलेली बस ‘बेस्ट’ नाही, ती तर विदेशी!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment