Press "Enter" to skip to content

आत्मदहनाच्या प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’शी जोडण्यासाठी दीपक चौरसियांकडून वाचकांची दिशाभूल!

उत्तर प्रदेश विधानभवनासमोर १३ ऑक्टोबर रोजी एका महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला आणि यातच संबंधित महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर सोशल मीडियावर लगेच या प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’शी (love jihad) जोडण्याचा प्रयत्न व्हायला लागला. टीव्ही अँकर दीपक चौरासिया यांनी तर महिलेला आत्मदहनासाठी फूस लावण्याच्या आरोपात पोलिसांनी आसिफ नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून आसिफ युवक काँग्रेसच्या नेत्याचा मुलगा असल्याचा दावा केला.

Advertisement

बातमी लिहीपर्यंत दीपक चौरासिया यांचं ट्विट जवळपास ३७०० युजर्सकडून रिट्विट करण्यात आलंय. 

अर्काइव्ह पोस्ट 

महिलेला त्रास देऊन धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडण्यात आलं आणि नंतर त्याच तणावातून महिलेने आत्मदाह केला, असा देखील दावा सोशल मीडियावर करण्यात येतोय.

पडताळणी :

आम्ही सर्वप्रथम हे नेमकं प्रकरण काय आहे, त्याचा शोध घेतला असता समजलं की प्रकरणातील ३५ वर्षीय महिलेचे काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील  महाराजगंज येथील अखिलेश तिवारी यांच्याशी लग्न झाले होते. मात्र नंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर महिलेने धर्मांतर करून आसिफ नावाच्या तरुणाशी लग्न केले.

लग्नानंतर आसिफ सौदी अरेबियाला निघून गेला आणि त्यानंतर आसिफच्या कुटुंबियांकडून संबंधित महिलेला त्रास देण्यात यायला लागल्याचे आरोप आसिफच्या कुटुंबियांवर आहेत. या छळाला कंटाळूनच महिलेने उत्तर प्रदेश विधानभवनासमोर स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये भरती केलं परंतु उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणी लखनऊ पोलिसांनी राजस्थानचे माजी राज्यपाल सुखदेव प्रसाद यांचे चिरंजीव आणि कॉंग्रेस नेते आलोक प्रसाद यांना अटक केली असून त्यांच्यावर  पीडितेला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा आरोप ठेवण्यात आल्याची माहिती एबीपी न्यूजच्या वेबसाईटवर प्रकाशित बातमीतून मिळाली.

दरम्यान हे ‘लव्ह-जिहाद’चं (love jihad) प्रकरण आहे किंवा नाही याविषयी आताच काही सांगता येणार नसल्याचं देखील एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं असल्याचं बातमीत म्हंटलं आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करताहेत. 

वस्तुस्थिती :

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की टीव्ही अँकर दीपक चौरासिया यांनी दावा केल्याप्रमाणे उत्तर प्रदेश विधान भवनासमोर आत्मदहन केलेल्या महिलेला त्यासाठी प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी आसिफ नामक व्यक्तीला अटक केलेली नाही. 

लखनऊ पोलिसांनी  काँग्रेस नेते आलोक प्रसाद यांना ताब्यात घेतलं आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत असून हे ‘लव्ह-जिहाद’चं प्रकरण आहे किंवा नाही, याविषयी आताच काही सांगता येणार नसल्याचं देखील पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे.   

हे ही वाचा- हिंदू धर्मियांची माथी भडकाविण्यासाठी पत्रकार दीपक चौरसियांनी वापरला पाच वर्षांपूर्वीच्या पेंटिंगचा संदर्भ!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा