शिवसेना विरुद्ध कंगना (shiv sena vs kangana) राणावत हा वाद थांबता थांबायला तयार नाही. कंगना राणावत यांच्याकडून रोजच नवनवीन वादग्रस्त वक्तव्य केली जाताहेत.
१६ सप्टेंबर रोजी ‘टाईम्स नाऊ’ या न्यूज चॅनेलच्या नविका कुमार यांच्याशी बोलताना कंगना यांनी सांगितलं की बांद्रा येथे मतदानाला गेल्यानंतर, आपणास शिवसेनेला मतदान करण्यासाठी भाग पाडण्यात आलं. भाजपची शिवसेनेशी युती असल्याने आपणास नाईलाजास्तव शिवसेनेला मत द्यावं लागलं.
टाईम्स नाऊच्या अँकर नविका कुमार यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात कंगना म्हणतात, “मी बांद्रयात मतदानासाठी गेले होते. मी नेहमीच भाजप समर्थक राहिलेली आहे. मतदान यंत्रासमोर जाऊन मी भाजपचं बटन शोधत होते, तर मला सांगण्यात आलं की शिवसेनेचं बटन दाब म्हणून. मी म्हंटलं मला भाजपला मतदान करायचं असताना मी शिवसेनेचं बटन का दाबू ? पण भाजप-शिवसेना युती असल्याने दुसरा पर्यायच उपलब्ध नव्हता. त्यामुळे मला नाईलाजास्तव शिवसेनेला मतदान करावं लागलं. मी शिवसेनेला मतदान केलं आणि आता मला अशा प्रकारची वागणूक (shiv sena vs kangana) मिळतेय.
पडताळणी:
कंगना राणावतच्या या दाव्यासंबंधीची तथ्यात्मक चूक लक्षात आणून दिली ती ‘इंडिया टूडे’चे उपसंपादक आणि महाराष्ट्राच्या सत्तासंग्रामावर ‘36 डेज’ नावाचं पुस्तक लिहिणाऱ्या कमलेश सुतार यांनी.
कमलेश सुतार यांनी ट्विटच्या माध्यमातून कंगना राणावत यांचा खोटेपणा उघडकीस आणला. त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली माहिती सादर केली. या माहितीनुसार कंगनाचे मतदान आहे वांद्रे पश्चिम या मतदारसंघात आणि लोकसभा तसेच विधानसभा या दोन्ही निवडणुकांच्या वेळी या मतदारसंघात भाजपचाच उमेदवार होता.
विधानसभेच्या वेळी भाजपचे आशिष शेलार हे या मतदारसंघातून युतीचे उमेदवार होते, तर लोकसभेची निवडणूक पूनम महाजन यांनी भाजपच्या तिकिटावर लढवली आणि जिंकली देखील.
म्हणजे जिथे शिवसेनेचा उमेदवारच नव्हता, अशा ठिकाणी कंगनाने शिवसेनेला मतदान कसे केले, हे समजायला मार्ग नाही. पण हा खोटेपणा उघडकीस आल्यानंतर देखील कंगना मात्र आपली चूक मान्य करायला तयार नव्हत्या. उलट त्यांनी कमलेश यांनाच खोटे ठरविण्याचा प्रयत्न केला आणि कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली.
सुतार यांच्या ट्विटच्या उत्तरात आपण विधानसभेविषयी नव्हे, तर लोकसभा निवडणुकीविषयी बोलत होतो असं स्पष्टीकरण देखील कंगनाकडून देण्यात आलं. मात्र कंगना लोकसभेच्या निवडणुकीविषयी जरी बोलत असतील, तरी त्यांचा दावा चुकीचाच असल्याचं सुतार यांनी सप्रमाण सिद्ध केलं.
विशेष म्हणजे वांद्रे पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवलेले भाजपचे उमेदवार आशिष शेलार देखील कमलेश सुतार यांच्या समर्थानात उतरले आणि सुतार यांनी पत्रकार म्हणून निभावलेल्या जबाबदारीत काहीही चूक नसल्याचे शेलार यांनी ट्विट करून स्पष्ट केले.
कंगना यांना इतरही कुठल्या वेगवेगळ्या परिस्थितीत नाईलाजास्तव शिवसेनेला मतदान करावं लागलं असण्याची शक्यता आहे का, याची देखील पडताळणी ‘आज तक’कडून वेगवेगळ्या निवडणुकांमधील उमेदवारीच्या आधारे करण्यात आली. पण कुठेही कंगना राणावत यांना नाईलाजास्तव शिवसेनेला मतदान करावं लागलं (shiv sena vs kangana) असल्याचा काहीही पुरावा मिळाला नाही.
दरम्यान खोटेपणा उघडा पडल्यावर चहूबाजूंनी टीका व्हायला लागल्यानंतर मात्र कंगनाने कमलेश सुतार यांना ट्विटरवर ब्लॉक करून आपल्या दाव्याचे समर्थन करणाऱ्या ट्विट्ससह इतरही ट्विटस डिलीट केले.
वस्तुस्थिती:
कंगना राणावत यांना नाईलाजास्तव शिवसेनेला मतदान करावं लागलं, हा जो दावा त्यांनी राष्ट्रीय न्यूज चॅनेलवर केलाय, त्यात काहीही तथ्य नाही. कंगना यांनी सरळसरळ खोटा दावा केला आहे, हे स्पष्ट झाले आहे.
आपला खोटेपणा उघडकीस आल्यानंतर देखील त्याविषयी माफी किंवा दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी कंगना यांनी हा खोटेपणा उघडकीस आणणाऱ्या पत्रकाराला धमकावण्याचा प्रयत्न केला आणि नंतर प्रकरण अधिकच अंगलट येत असल्याचं लक्षात आल्यानंतर धमकीचे ट्विट्स डिलीट देखील केले.
हे ही वाचा- शिवसेनेवरचा राग व्यक्त करण्यासाठी कंगनाने घेतला ‘फेकन्यूज’चा आधार!
Be First to Comment