Press "Enter" to skip to content

‘राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच झाला कोरोना’ म्हणत ‘सकाळ’ने दिली फेक बातमी!

मराठीतील प्रमुख वृत्तपत्र ‘सकाळ’ने ‘राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच झाला कोरोना, अनेक मंत्र्यांच्या आले होते संपर्कात”

Advertisement
या हेडलाईनसह झारखंडचे मुख्यमंत्री ‘हेमंत सोरेन’ यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी दिलीये.  

‘सोरेन यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांनी स्वतःला होम क्वारंटाइन करून घेतले आहे. सोरेन यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे’ असं ‘सकाळ’च्या बातमीत म्हंटलय.  

News screen shot of Sakal saying Hemant Soren is corona positive
Source: Sakal

‘राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच झाला कोरोना, अनेक मंत्र्यांच्या आले होते संपर्कात’ हेडलाईनसह ही बातमी देण्यात आलीये. हेडलाईनच्या शेवटच्या टप्प्यात ‘अनेक मंत्र्यांच्या आले होते संपर्कात’ या ओळीसह सोरेन यांच्यामुळे इतर मंत्र्यांना कोरोनाची लागण होण्याच्या संभावित धोक्याकडे वाचकांचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने या बातमीची पडताळणी केली. सकाळची बातमी ही ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेची बातमी आहे. म्हणून मग आम्ही ‘पीटीआय’ची मूळ बातमी शोधण्याचा प्रयत्न केला.

‘पीटीआय’च्या वेबसाईटवर आम्हाला मूळ बातमी सापडली. ‘पीटीआय’ने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी स्वतःला रांची येथील निवासस्थानी  क्वारंटाइन करून घेतलं असल्याचं सांगितलंय.

सोरेन यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, ज्यांनी काही दिवसांपूर्वी सोरेन यांची भेट घेतली होती.

मुख्यमंत्री सोरेन काही दिवसांपूर्वी पेयजल आणि स्वच्छता मंत्री मिथिलेश ठाकूर यांच्या संपर्कात आले होते. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, असं  ‘पीटीआय’ची बातमी सांगते. बातमीत कुठेही मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना कोरोनाची लागण झाल्याने ते होम क्वारंटाइन झालेत असं म्हंटलेलं नाही. 

PTI news telling truth that soren is not corona positive
Source: PTI

‘सकाळ’ने बातमीत हेमंत सोरेन यांच्या ट्विटचा देखील संदर्भ दिलेला असल्याने आम्ही सोरेन यांच्या ट्वीटर अकाऊंटला भेट देऊन खात्री करायचं ठरवलं. सोरेन यांच्या ट्वीटर अकाऊंटवर सोरेन यांचा जनतेशी संवाद साधतानाचा व्हिडीओ मिळाला.

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये हेमंत सोरेन लिहितात,

“मित्रांनो, तुम्हाला कल्पना आहेच की माझे मंत्रिमंडळातील सहकारी आणि झामूमोच्या (झारखंड मुक्ती मोर्चा) आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्याशी माझी भेट झाली होती. 

त्यामुळे ‘खबरदारी’ म्हणून काही दिवसांसाठी मी क्वारंटाइन असेन. काही दिवस मी आपल्याला भेटू शकणार नाही”

हेमंत सोरेन यांनी आपल्या ट्वीटच्या कॅप्शनमध्ये ‘एहतिहात’ के तौर पर’ असा शब्द वापरलाय. ‘एहतिहात’ या शब्दाचा अर्थ ‘खबरदारी’ किंवा ‘सावधानी’ असा होतो. म्हणजेच मुख्यमंत्री सोरेन यांनी देखील आपण केवळ खबरदारी म्हणून होम क्वारंटाइन झालो असल्याचं सांगितलंय.

याशिवाय आम्ही इतर माध्यमांच्या देखील याविषयीच्या बातम्या तपासल्या. जवळपास सगळीकडेच हेमंत सोरेन होम क्वारंटाइन झाल्याचीच बातमी आहे. सोरेन यांना कोरोनाची लागण झाल्याची कुठलीही बातमी आम्हाला सापडली  नाही.

वस्तुस्थिती:

‘राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच झाला कोरोना, अनेक मंत्र्यांच्या आले होते संपर्कात” या अशा हेडलाईनने महाराष्ट्रातील वाचकांची दिशाभूल होतेच आहे परंतु याव्यतिरिक्त आतील बातमी सुद्धा चुकीचीआहे. ‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की ‘सकाळ’ने दिलेली  झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी फेक आहे.  

हेमंत सोरेन यांना कोरोनाची लागण झालेली नसून ते एका ‘कोरोना पॉझिटिव्ह’ आमदाराच्या संपर्कात आल्याने केवळ खबरदारी म्हणून रांची येथील निवासस्थानी क्वारंटाइन झाले आहेत.  

हे ही वाचा- भूतानने भारताचं पाणी अडवलं सांगणाऱ्या बातम्या चुकीच्या!

More from कोरोनाMore posts in कोरोना »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा