देश सध्या कोळसा संकटाला (Coal Crisis) तोंड देत आहे. 59 पॉवर प्लांट्समध्ये केवळ 4 दिवसांपुरताच कोळशाचा साठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर माजी पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी एक व्हिडीओ ट्विट केलाय. व्हिडिओमध्ये कोळसा घेऊन जात असलेली ट्रेन दिसतेय. व्हिडिओच्या आधारे प्रकाश जावडेकरांनी दावा केलाय की सरकार 4 इंजिनच्या 4 किलोमीटर लांबीच्या ट्रेनद्वारे कोळसा पुरवठा करत आहे.
जावडेकरांनी ट्विट केलेला हा व्हिडीओ 2000 पेक्षा अधिक युजर्सकडून रिट्विट करण्यात आलाय.
याच व्हिडिओच्या आधारे ‘आज तक’ने बातमी प्रसिद्ध केली आहे.
प्रकाश जावडेकरांनी ट्विट केलेला व्हिडीओ यापूर्वी IRTS असोसिएशनने 6 जानेवारी 2021 रोजी म्हणजेच साधारणतः ९ महिन्यांपूर्वी ट्विट केला होता. IRTS असोसिएशनच्या अधिकृत अकाउंटवर हा व्हिडीओ आज देखील उपलब्ध आहे.
व्हिडिओच्या कॅप्शननुसार वासुकी या ट्रेनने चार मालगाड्यांमध्ये 16 हजार टन कोळश्यासह कोरबा ते भिलाई दरम्यानचा 280 किमीचा प्रवास पूर्ण केला होता. ट्रेनमध्ये कोळसा भरलेले चार रेक होते, त्यामाध्यमातून वेगवेगळ्या पॉवर प्लांट्समध्ये कोळश्याचा पुरवठा करण्यात आला होता.
जावडेकरांच्या ट्विटमध्ये देखील सदर व्हिडिओ IRTS असोसिएशनचा असल्याचे बघायला मिळतेय.
रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देखील हाच व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. या ट्विटमध्ये कोळशाची वाहतूक करत असलेली ही ट्रेन ‘सुपर शेषनाग’ असल्याचे सांगण्यात आले होते.
IRTS असोसिएशन आणि रेल्वे मंत्रालयाच्या ट्विटवरून ६ जानेवारी २०२१ रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ हे स्पष्ट करतो की देशातील कोळश्याचे संकट सोडविण्यासाठी केंद्र सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात असल्याच्या दाव्यासाठी माजी पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकरांनी ट्विट केलेला व्हिडीओ सध्याचा नसून जवळपास ९ महिन्यांपूर्वीचा आहे.
हेही वाचा- ‘प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजने’ अंतर्गत देशातील युवकांना मिळणार ४००० रुपये?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या ‘9172011480‘ या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment