Press "Enter" to skip to content

चीन सीमेवरील आपल्या सैन्याने दिवाळीत चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलंय?

दिवाळी जसजशी जवळ यायला लागलीये तसं सोशल मीडियावर प्रतिवर्षी प्रमाणे चीनी मालावर बहिष्काराच्या (boycott chinese products) दाव्याच्या पोस्ट व्हायरल व्हायला लागल्या आहेत.

सध्या एका बॅनरचा फोटो व्हायरल होतोय. या फोटो मध्ये बॅनरवर भारतीय सैनिक दिसतोय आणि सोबत दावा केला गेलाय की ‘मी चीनला सीमा ओलांडू देणार नाही, तुम्ही दिवाळीमध्ये चीनच्या मालाची खरेदी करू नका’ या दाव्याच्या खाली #भारत_तिब्बत_सीमा_पुलिस_बल असा उल्लेख करत त्यांच्या नावाने हा दावा व्हायरल केला जातोय.

Advertisement

ट्विटर बायोमध्ये स्वतःची माहिती देताना लेखक, दिल्ली विद्यापिठाच्या कॉलेजमधील सहाय्यक प्राध्यापक आणि स्वदेशी जागरण मंचाचे सह-समन्वयक अश्वनी महाजन यांनी आपल्या व्हेरीफाईड अकाऊंटवरून हा फोटो ट्विट करताना चीनी मालावर बहिष्काराचे आवाहन केले आहे.

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

व्हायरल दाव्याच्या पडताळणीसाठी आम्ही गुगल सर्च केलं. परंतु मुख्य प्रवाहातील कुठल्याही माध्यमामध्ये आम्हाला भारत तिबेट सीमा पोलिसांनी दिवाळीमध्ये चिनी मालावर बहिष्काराचे आवाहन केल्याविषयीची कुठलीही बातमी मिळाली नाही.

आम्ही भारत तिबेट सीमा पोलिसांच्या (ITBP) अधिकृत वेबसाईटला देखील भेट दिली. परंतु या वेबसाईटवर तसेच त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देखील यासंदर्भात कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही किंवा चिनी मालावरील बहिष्काराचे (boycott chinese products) आवाहन करण्यात आलेले नाही.

त्यानंतर हा फोटो नेमका कुठला हे शोधण्यासाठी आम्ही फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला. आम्हाला आर.के. एजन्सीज नावाच्या फेसबुक पेजवर ५ ऑक्टोबर २०१७ रोजी हा फोटो अपलोड केला गेला असल्याचे आढळून आले. मूळ फोटोमध्ये आवाहन करणारी संस्था म्हणून ‘ स्वदेशी जागरण मंच, चित्तोडगढ’चा उल्लेख आहे.

दोन्ही फोटोंची तुलना केली असता स्पष्ट होते की स्वदेशी जागरण मंचाकडून चार वर्षांपूर्वी चीनी मालावरील बहिष्कारासाठी बनविण्यात आलेलं बॅनर एडिट करण्यात आलंय. त्यात ‘स्वदेशी जागरण मंच, चित्तोडगढ’च्या ठिकाणी भारत-तिबेट सीमा पोलीस फोर्सच्या नावाचा समावेश करण्यात आलाय.  

Debunking viral image claiming indian army asks to boycott china products checkpost marathi
Source: Twitter

पडताळणी दरम्यान आम्हाला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून यासंदर्भात जारी करण्यात आलेलं स्पष्टीकरण देखील मिळालं. यात सूचना प्रसारण मंत्रालयाकडून सोशल मीडियावरील व्हायरल दावा फेक असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील दावा फेक आहे. चीनी मालावरील बहिष्कारासंबंधीच्या दाव्याशी भारतीय सैन्याचा काहीही संबंध नाही.

भारतीय सैन्याच्या नावाने व्हायरल केलं जाणारं आवाहन मूलतः स्वदेशी जागरण मंचाकडून करण्यात आलंय. या आवाहनासंबंधीचा फोटो एडिट करून ते सैन्याच्या संदर्भाने शेअर केलं जातंय.

हे ही वाचा- बारकोडच्या आधारे चीनी वस्तू ओळखल्या जाऊ शकतात का ?

More from राजकारणMore posts in राजकारण »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा