Press "Enter" to skip to content

बंगळुरूमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यावर फिरताना दिसली मगर? वाचा सत्य!

गेल्या रविवारपासून भारताची ‘सिलिकॉन सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूमध्ये मुसळधार पावसाने थैमान (bangalore flood) घातले आहे. शहरात पावसाचा गेल्या 90 वर्षांचा विक्रम मोडला गेला आहे.

Advertisement

शहरातील रहिवासी भागातील अनेक घरे पावसाच्या पाण्यात बुडाली आहेत. स्टार्टअप कंपन्यांच्या सीईओपासून ते जनसामान्यांना ट्रॅक्टर ट्रॉलीच्या माध्यमातून त्यांच्या घरातून सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याचे व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होताहेत.

आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक मगर रहिवासी भागातील पाण्याने भरलेल्या रस्त्यावरून फिरताना बघायला मिळतेय. दावा केला जातोय की हा व्हिडीओ बंगळुरूमधील आहे.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता आम्हाला 17 ऑगस्ट 2022 रोजीच्या एका ट्विटमध्ये सध्याचा व्हायरल व्हिडीओ बघायला मिळाला. ट्विटच्या कॅप्शनमध्ये हा व्हिडीओ मध्य प्रदेशातील शिवपुरी कॉलनीमधील असल्याचे सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे अधिक शोध घेतला असता ‘इंडिया डॉट कॉम’च्या वेबसाईटवर 14 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध बातमी बघायला मिळाली. बातमीनुसार मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पाऊस सुरु असतानाच एक मगर देखील शिवपुरी येथील रहिवासी भागात घुसली होती. मात्र, तासाभराच्या बचावकार्यानंतर मगरीला पकडण्यात आले.

वन विभागाचे पोलिस अधिकारी अजय भार्गव यांनी सांगितले की, जुन्या बसस्थानकाजवळील एका कॉलनीत मगर आढळून आली होती. या घटनेची माहिती मिळताच माधव राष्ट्रीय उद्यानातून बचाव पथकांना पाचारण करण्यात आले. सुमारे आठ फूट लांबीच्या या मगरीला तासाभराच्या प्रयत्नानंतर पकडण्यात आले आणि नंतर सांख्यसागर तलावात सोडण्यात आले.

पडताळणी दरम्यान आम्हाला ‘झी मध्य प्रदेश छत्तीसगड’च्या यूट्यूब चॅनेलवर देखील व्हायरल व्हिडीओ बघायला मिळाला. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये हा व्हिडीओ शिवपुरी येथीलच असल्याचे सांगण्यात आले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील रस्त्यावरून फिरणाऱ्या मगरीचा व्हायरल व्हिडीओ बंगळुरूमधील नसून मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील आहे.

हेही वाचा-५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा