Press "Enter" to skip to content

भारतीय सैन्याच्या ‘मुस्लिम रेजिमेंट’ने पाकिस्तानविरुद्धचे युद्ध लढायला नकार दिला होता?

सोशल मीडियावर दावा केला जातोय की ‘मुस्लिम रेजिमेंट’ने (muslim regiment) १९६५ सालचे पाकिस्तानविरुद्धचे युद्ध लढायला नकार दिला होता. त्यानंतर ही रेजिमेंट बरखास्त करण्यात आली होती.

Advertisement

अर्काइव्ह

अशाच प्रकारचा दावा करणारे एक ग्राफिक देखील व्हायरल होतेय.

Source: Facebook

पडताळणी:

आपल्यापैकी बहुतेकांनी भारतीय सैन्याच्या गोरखा, महार, शीख, राजपूत, बिहार यांसारख्या विविध रेजिमेंटविषयी ऐकलेलंच असेल, पण आतापर्यंत मुस्लिम रेजिमेंटचा (muslim regiment in india) उल्लेख कधीच कुठे झालेला नाही. ना कुठल्या युद्धाच्या संदर्भाने, ना सध्या व्हायरल होत असलेल्या दाव्याच्या संदर्भाने. साहजिकच या ‘मुस्लिम रेजिमेंट’ प्रकरणाविषयी उत्सुकता निर्माण होऊन आम्ही पडताळणीस सुरुवात केली.

पडताळणी दरम्यान आम्हाला ‘बीबीसी हिंदी’चा एक रिपोर्ट मिळाला. या रिपोर्टनुसार आजघडीला भारतीय सैन्यामध्ये १२ लाखांपेक्षा अधिक सक्रिय आणि जवळपास १० लाख राखीव सैनिक आहेत आणि ३० पेक्षा अधिक रेजिमेंट आहेत.

मेजर जनरल (रिटायर्ड) शशी अस्थाना यांनी ‘बीबीसी’शी बोलताना दिलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या रेजिमेंटचा इतिहास वेगवेगळा राहिलेला आहे. मद्रास रेजिमेंट २०० वर्षांपेक्षा अधिक जूनी आहे, तर कुमाऊँ रेजिमेंटने दोन्हीही जागतिक महायुद्धं लढली आहेत. मात्र भारतीय सैन्यामध्ये कधीच ‘मुस्लिम रेजिमेंट’ नावाची कुठली रेजिमेंट अस्तित्वातच नव्हती.

आम्हाला ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वेबसाईटवर लेफ्टनंट जनरल (रिटायर्ड) सय्यद अता हसनैन यांचा देखील एक लेख मिळाला. ‘The ‘missing’ muslim regiment: Without comprehensive rebuttal, Pakistani propaganda dupes the gullible across the board’ शीर्षकाखाली प्रकाशित लेखात सय्यद अता हसनैन यांनी देखील ‘मुस्लिम रेजिमेंट’ म्हणजे निव्वळ अफवा असल्याचं म्हटलंय.

सय्यद अता हसनैन यांच्या लेखानुसार ‘मुस्लिम रेजिमेंट’ (muslim regiment) हा पाकिस्तानच्या इंटर सर्विसेज पब्लिक रिलेशन्सच्या (ISPR) प्रोपोगांडा अर्थात दुष्प्रचाराचा भाग आहे. याद्वारे अफवा पसरवली गेली की १९६५ सालापर्यंत भारतीय सैन्यात ‘मुस्लिम रेजिमेंट’ अस्तित्वात होती आणि या रेजिमेंटने १९६५ सालचे युद्ध लढायला नकार दिल्याने ही रेजिमेंट बरखास्त करण्यात आली.

आम्हाला ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्याच वेबसाईटवरील १५ ऑक्टोबर २०२० रोजीचा रिपोर्ट मिळाला. या रिपोर्टनुसार सुमारे 120 माजी लष्करी अधिकाऱ्यांनी कथित ‘मुस्लिम रेजिमेंट’च्या संदर्भाने राष्ट्रपतींना एक पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी अस्तित्वातच नसलेल्या ‘मुस्लिम रेजिमेंट’ बद्दल सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या फेक न्यूजवर कारवाईची मागणी केली होती.

TOI news Veterans write to Prez, seek action against fake news on social media
Source: Times of India

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की भारतीय सैन्यामध्ये कधीही ‘मुस्लिम रेजिमेंट’ अस्तित्वातच नव्हती. त्यामुळे जी रेजिमेंट अस्तित्वातच नव्हती, तिने पाकिस्तानविरुद्धचे युद्ध लढण्यास नकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

रिटायर्ड सैन्य अधिकाऱ्यानुसार हा पाकिस्तानी दुष्प्रचाराचा भाग आहे. मात्र सध्या या अफवा पसरविणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीयांचाच सहभाग आहे. याचाच अर्थ अशा प्रकारच्या अफवा पसरविणारी मंडळी एका अर्थाने पाकिस्तानी दुष्प्रचाराचा अजेंडा पुढे नेण्यात मदतच करत आहेत.

हे ही वाचा- ‘इस्लामिक स्टडीज’ विषयामुळे युपीएससीत यशस्वी मुस्लिम उमेदवारांची संख्या वाढलीये?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा