सोशल मीडियावर सध्या तीन तरुणींच्या फोटोचा स्क्रिनशॉट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. स्क्रिनशॉटमध्ये दिसणाऱ्या तरुणींच्या गळ्यात फुलांची माळ आणि हातात मिठाईचा बॉक्स आहे. दावा करण्यात येतोय की तिघी तरुणी बहिणी असून त्या एकाच वेळी आयएएस झाल्या आहेत. (three sisters ias in rajasthan)
तिघींची नावे कमला, गीता आणि ममता असून तिघींनी अनुक्रमे ३२, ६२ आणि १३२ वा रँक मिळवला असल्याचं देखील सांगण्यात येतंय. तिघी बहिणींनी मिळवलेल्या या यशाबद्दल तिघींवर कौतुकाचा वर्षाव केला जातोय.
अनेक फेसबुक युजर्स वेगवेगळ्या कॅप्शनसह हा स्क्रिनशॉट मोठ्या प्रमाणात शेअर करताहेत.
पडताळणी:
व्हायरल फोटोचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही हा फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला. त्यावेळी हाच फोटो २०१९ मध्ये देखील साधारणतः अशाच दाव्यांसह व्हायरल झाल्याची बाब लक्षात आली.
पडताळणी दरम्यान आम्हाला ‘नई दुनिया’च्या वेबसाईटवर दि. २४ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रकाशित बातमी मिळाली. बातमीनुसार फोटोत दिसणाऱ्या तिन्ही तरुणी एकमेकींच्या बहिणीच आहेत परंतु त्यांनी ‘आयएएस’ नाही तर राजस्थान प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत यश मिळवले होते.
राजस्थानची राजधानी जयपूर मधील ‘सारंग का बास’ या गावातील हे कुटुंब असून तिघी बहिणीचं नाव कमला चौधरी, ममता चौधरी आणि गीता चौधरी आहे. त्यांची आई मीरा देवी यांनी आपल्या दिवंगत पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलींना शिकवलं आणि तिघींनी देखील राज्याच्या प्रशासकीय सेवा परीक्षेत घवघवीत यश मिळवत आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.
विशेष म्हणजे तिघींनी युपीएससीची परीक्षा देखील दिली होती. मात्र काही गुण कमी पडल्यामुळे त्यांना या परीक्षेत यश न मिळाल्याची माहिती देखील या बातमीत वाचायला मिळते. शिवाय कमला, ममता आणि गीता यांचा रँक अनुक्रमे ३२, ६४ आणि १२८ असल्याचं देखील बातमीत स्पष्ट करण्यात आलं आहे.
गीता देवी यांना या तीन मुलींव्यतिरिक्त रामसिंह नावाचा मुलगा देखील असून बहिणींच्या शिक्षणात कुठलाही खंड पडू नये, म्हणून रामसिंह याने शाळा सोडली होती. परंतु आता रामसिंह देखील प्रशासकीय सेवा परीक्षांची तयारी करत असल्याची माहिती देखील वाचायला मिळते.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल फोटोसोबतचा दावा दिशाभूल करणारा आहे. व्हायरल फोटोतील तिघी तरुणी एकमेकींच्या बहिणीचं आहेत, परंतु त्यांनी ‘आयएएस’ नव्हे, तर ‘आरएएस’ परीक्षा उत्तीर्ण केली होती. (three sisters ias in rajasthan) शिवाय ही घटना आताची नसून साधारणतः ३ वर्षांपूर्वीची आहे.
हे ही वाचा- एकाच कुटुंबातले तिघे बहीण-भाऊ एकाच वेळी आयपीएस?
Be First to Comment