केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली-हरियाणा बॉर्डरवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनांचा तिढा सुटता सुटत नाहीये. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याच्या स्टॉलचे काही फोटोज शेअर केले जाताहेत. दावा करण्यात येतोय की बेंगळुरूच्या शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या स्वतःच्या सुपर मार्केटचे (supermarket runs by farmers) हे फोटोज आहेत.
सोशल मीडियावर कथितरित्या शेतकऱ्यांच्या सुपर मार्केटचं कौतुक केलं जातंय आणि इतरांनाही त्यापासून धडा घ्यायला सांगितलं जातंय.
फेसबुकवर देखील अनेक युजर्सकडून कॉपीपेस्ट दाव्यासह हेच फोटोज शेअर केले जाताहेत.
पडताळणी:
सर्वप्रथम आम्ही फोटो नेमका कुठला आहे, हे बघण्यासाठी रिव्हर्स सर्चच्या मदतीने हा फोटो शोधला. आम्हाला नीरज त्यागी यांनी २० नोव्हेंबर रोजी केलेलं एक ट्विट मिळालं. त्या ट्विटनुसार हे फोटोज ‘हुमूस’ या स्टार्ट-अपचे असल्याचं समजलं.
या माहितीच्या आधारे आम्ही गुगल सर्च केलं त्यावेळी हुमूस ही बंगळुरू येथून चालविली जाणारी सुपर मार्केट कंपनी असल्याचं समजलं. ‘इंडिया टुडे’च्या वेबसाईटवर प्रसिद्ध रिपोर्टनुसार मंजुनाथ टी. एन. आणि शिल्पा गोपाला यांनी कंपनी २०१९ साली कंपनीची स्थापना केली आहे. कंपनीचे संस्थापक मंजुनाथ यांनी देखील सोशल मीडियावरील दावा चुकीचा असल्याचं सांगितलं आहे.
हुमूसच्या वेबसाईटवरील ‘आमच्याविषयी’ सेक्शनमधील माहितीनुसार कंपनी थेट शेतकऱ्यांकडून फळे आणि भाजीपाला विकत घेते आणि तो रास्त भावात ग्राहकांना पुरवते. शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी काम करत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आलाय.
शेतकरी थेट सुपर मार्केटमध्येच जाऊन आपला शेतमाल विकू शकतात. त्यामुळे त्यांच्या मालाला चांगला भाव मिळू शकतो असाही कंपनीचा दावा आहे. शेतमालाच्या पुरवठा साखळीमधील मध्यस्थाची भूमिका संपवून थेट शेतकऱ्यांनाच त्यांच्या शेतमालाचा अधिक भाव देणे, हा कंपनीचा उद्देश्य असल्याचं देखील कंपनीकडून सांगण्यात येतं.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर शेतकऱ्यांनी स्वतः बनवलेल्या सुपर मार्केटचा (supermarket runs by farmers) म्हणून शेअर केला जात असलेले फोटोज हे बंगळुरू मधील एका सुपरमार्केट कंपनीचे आहेत.
बंगळुरूमधील ही कंपनी फळे आणि भाजीपाला यांसारख्या कृषी उत्पादनाची थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करते आणि ते किफायतशीर भावात ग्राहकांना विकते.
हे ही वाचा- शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून अंबानींच्या नातवाला बघायला गेले पंतप्रधान मोदी?
Be First to Comment