सोशल मीडियावर एका जनसमुदायाचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. दिल्लीत केंद्र सरकारच्या तीन कृषी विधेयकांच्या विरोधात आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांचा (farmers delhi chalo protest) असल्याचा हा फोटो असल्याचा दावा केला जातोय.
ट्विटरवर ‘कडाक्याच्या थंडीत जगाचा पोशिंदा दिल्लीत ठाण मांडुन बसलाय… सरकारचा जाहिर निषेध!’ या कॅप्शनसह अनेक युजर्स हा फोटो पोस्ट करताहेत.
फेसबुकवर देखील हाच फोटो याच कॉपी पेस्ट दाव्यासह शेअर केला जातोय.
पडताळणी:
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये मुख्यतः पंजाबमधील शीख शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यानंतर शेजारच्या हरियाणामधून देखील अनेक शेतकरी दिल्लीत जमले आहेत.
या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असला आणि वेगवेगळ्या राज्यातील शेतकरी जरी आंदोलनात सहभागी झाले असले, तरी सर्वाधिक प्रमाणात शेतकरी हे पंजाबमधील शीख शेतकरीच आहेत, याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही.
दिल्ली आंदोलनाचा (farmers delhi chalo protest) म्हणून व्हायरल करण्यात येत असलेल्या फोटोत मात्र पारंपरिक शीख वेषभूषेतला पगडीधारी शीख शेतकरी दिसत नाही. त्यामुळे आम्ही हा फोटो नक्की दिल्ली आंदोलनातीलच आहे का हे शोधण्यासाठी गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला.
आम्हाला हा फोटो ‘द वायर’च्या वेबसाईटवर दि. २३ जून २०१८ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पी. साईनाथ यांच्या लेखात हाच फोटो आढळून आला. वायरच्या वेबसाईटवर फोटो क्रेडिट ‘पीपल्स अर्काइव्ह ऑफ रूरल इंडिया’ला देण्यात आलं आहे. आम्ही ‘पीपल्स अर्काइव्ह ऑफ रूरल इंडिया’च्या वेबसाईटला भेट दिली असता सध्या व्हायरल होत असलेला फोटो मुंबईतील आझाद मैदानात 12 मार्च रोजी जमलेल्या शेतकऱ्यांचा आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे गुगल किवर्ड सर्च केलं असता आम्हाला ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या वेबसाईटवर मार्च २०१८ मध्ये शेतकऱ्यांनी काढलेल्या लॉंग मार्चची बातमी वाचायला मिळाली. त्यानुसार आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई असा लॉंग मार्च काढला होता. हा मार्च मुंबईतील आझाद मैदानावर पोहचल्यानंतरचा हा फोटो आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत असलेला फोटो सध्या दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनातील नसून २०१८ सालच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या नाशिक ते मुंबई दरम्यानच्या लॉंग मार्चचा आहे.
हे ही वाचा– ‘भारत बंद’मध्ये भाजीपाल्याची नासधूस केल्याचे सांगत भाजप कार्यकर्ते फिरवताहेत जुना फोटो!
Be First to Comment