Press "Enter" to skip to content

शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून अंबानींच्या नातवाला बघायला गेले पंतप्रधान मोदी?

स्वतःच्या न्याय हक्कांसाठी शेतकरी कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर आंदोलन करतोय, परंतु त्याकडे लक्ष न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकत्याच जन्माला आलेल्या मुकेश अंबानींच्या नातवाला बघायला थेट हॉस्पिटलमध्ये (Modi visiting Ambani’s grandson) गेल्याचे दावे करणारा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होतोय.

Advertisement

फोटो सोबतचा व्हायरल मजकूर:

‘अंबानीचा घरगडी

18-18 तास काम करणारे मोदी साहेब एवढ्या व्यस्त कार्यक्रमातून 5 स्टार हॉस्पिटलमध्ये अंबानी साहेबांचा नातू जन्मला त्या नातवाला भेटायला गेले.किती ग्रेट माणूस ना..!

शेती प्रधान देशाचा शेतकरी एवढ्या कडाक्याच्या थंडीत गेली 17 दिवसांपासून न्याय हक्कासाठी आंदोलन करत बसला आहे,त्याच्याशी बोलायला मात्र वेळ नाही सेठला.’

शेतकरी संघर्ष संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष नाना बच्चाव यांनी फेसबुकवर सदर पोस्ट शेअर केली आहे.

अंबानीचा घरगडी18-18 तास काम करणारे मोदी साहेब एवढ्या व्यस्त कार्यक्रमातून 5 स्टार हॉस्पिटलमध्ये अंबानी साहेबांचा नातू…

Posted by Nana Bachhav on Sunday, 13 December 2020

या पद्धतीच्या अनेक पोस्ट्स फेसबुकवर पहायला मिळतील. सर्वांचा मजकूर एकसारखाच आहे. ज्या ज्या लोकांना कमेंट्समध्ये या फोटोचे सत्य सांगितले गेले त्यांनी आपल्या पोस्ट मधील मजकुरात सर्वात शेवटी टीप देऊन ‘हा फोटो प्रतीकात्मक आहे’ असे स्पष्टीकरण दिले परंतु पोस्ट्स डिलीट केल्या नाहीत. मोदींनी हॉस्पिटलमध्ये जाऊन अंबानींच्या नातवाची भेट घेतल्याच्या (Modi visiting Ambani’s grandson) दाव्यावर मात्र ते कायम आहेत.

FB posts claiming modi went to meet ambani grand child
Source: Facebook

व्हॉट्सऍपवर देखील या फेसबुक पोस्ट्सचे स्क्रिनशॉट व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सुर्यकांत कांबळे यांनी निदर्शनास आणून दिले आणि पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

सदर व्हायरल पोस्ट्समध्ये वापरलेल्या फोटोमधील आणि आताची नरेंद्र मोदी यांच्या दाढीची स्टाईल खूप वेगळी आहे. सध्या त्यांनी मोठी दाढी ठेवलीय हे आपण विविध माध्यमांवर पाहिले असेलच. दुसरी बाब म्हणजे आता कोरोना संक्रमणाच्या काळात हॉस्पिटलमध्ये सर्व लोक बिनामास्क एवढ्या जवळ जवळ अंतरावर उभे आहेत हे जरा न पटणारे आहे. म्हणूनच ‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यांची पडताळणी करण्याची सुरुवात केली.

व्हायरल फोटो आम्ही रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिला तेव्हा आम्ही ‘इंडिया टुडे’च्या २५ ऑक्टोबर २०१४ रोजीची बातमी मिळाली. या बातमीनुसार शनिवारी २५ ऑक्टोबर २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिलायन्स फाउंडेशनच्या हॉस्पिटलचे उद्घाटन झाले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी, महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव, नीता अंबानी आणि मुकेश अंबानी उपस्थित होते. त्याच वेळचा हॉस्पिटलमध्ये काढलेला हा फोटो आहे.

India Today news screenshot
Source: India Today

गुरुवारी १० डिसेंबर २०२० रोजी मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश आणि त्याची पत्नी श्लोका यांना मुलगा झाला. ही बातमी सर्वत्र पसरली. म्हणजेच व्हायरल फोटोमध्ये आणि अंबानींच्या नातवाच्या जन्मात तब्बल ६ वर्षाचे अंतर आहे. त्या दोन्ही बाबींचा एकमेकाशी काहीही संबंध नाही.

वस्तुस्थिती:

मुकेश अंबानी यांनी नातवाला घेतलेला फोटो चांगलाच व्हायरल झाला. याचाच आधार घेऊन अनेकांनी मोदी-अंबानी हितसंबंधांवर खिल्ली उडवणारे मिम्स शेअर केले. परंतु अनेकांनी सदर व्हायरल फोटोचा वापर करून खोट्या बातम्या पसरवल्या. व्हायरल पोस्ट्समध्ये वापरलेला फोटो २०१४ सालचा आहे. त्याचा आताच्या कुठल्याही घटनेशी संबंध नाही त्यामुळे सोशल मीडियातला व्हायरल दावा फेक आहे.

हे ही वाचा: नीता अंबानींनी कंगनाला नवीन स्टुडिओच्या बांधकामासाठी २०० कोटी देण्याची घोषणा केलीये?

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा