सोशल मीडियावर एका बसचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. फोटोत विदेशातील चकाचक रस्त्यावर धावणारी एक बस आणि त्या बसवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोचं पोस्टर (Ambedkar on bus) बघायला मिळतंय. सोशल मीडियावर दावा करण्यात येतोय अमेरिकेतील कोलंबियामधील रस्त्यावर धावणारी ही सिटी बस असून बाबासाहेबांच्या सन्मानार्थ ही बस सुरु करण्यात आली आहे.
पडताळणी:
व्हायरल फोटोकडे बघताच तो फोटो एडिट करण्यात आलेला आहे, हे लक्षात यावं अशाप्रकारचं एडिटिंग आहे. त्यामुळे आम्ही फोटोची पडताळणी सुरु केली. व्हायरल फोटो गुगल रिव्हर्स इमेजच्या मदतीने शोधला असता आम्हाला विकिमिडीयावर हा फोटो मिळाला.
विकिमिडीयानुसार हा फोटो इंग्लडमधील बाथ या शहरातील सिटी बसचा आहे. हा फोटो २८ जुलै २००८ रोजी एड्रियन पिंगस्टोन यांनी घेतलेला आहे.
व्हायरल फोटो आणि मूळ फोटो यांची तुलना केली असता बहुतेक गोष्टी सारख्याच असल्याचे आपल्या लक्षात येईल. फक्त दोन्ही फोटोतील बसवरील फोटो बदललेला आहे. मूळ फोटोतील बसवरील फोटो एडिट करून त्याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो (Ambedkar on bus) लावण्यात आला आहे.
व्हायरल फोटोतील बसवर बाबासाहेबांचा जो फोटो आहे, तो देखील शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. सदर फोटो आम्हाला आउटलुकच्या फोटो गॅलरीत बघायला मिळाला. फोटोच्या कॅप्शननुसार बाबासाहेबांसोबत त्यांच्या पत्नी सविता दिसताहेत.
आपल्यापैकी बहुतेक वाचकांना कल्पना असेलच की बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठातून शिक्षण घेतले होते. ‘वेटिंग फॉर ए वीजा’ हे बाबासाहेबांचं आत्मचरित्रपर लिखाणाचं पुस्तक आज देखील कोलंबिया विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर बाबासाहेबांचा अमेरिकेतील कोलंबियाच्या सिटी बसवरील म्हणून व्हायरल फोटो एडिटेड आहे.
मूळ फोटो देखील अमेरिकेतील नसून इंग्लडमधील एका सिटी बसवरील फोटो एडिट करून त्यावर बाबासाहेबांचा फोटो सेट करण्यात आला आहे.
हे ही वाचा- अमेरिकेने केला भारताचा गौरव? महात्मा बसवेश्वरांचा फोटो १०० डॉलरच्या नोटेवर?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]