सोशल मिडीयावर सध्या एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोत भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी इ. आणि लोकपाल आंदोलनादरम्यानच्या ‘टीम अण्णा’चे सदस्य दिसताहेत.
सोशल मिडीयावर दावा करण्यात येतोय की हा फोटो २०१० सालातील, म्हणजेच लोकपालसाठीचे देशव्यापी आंदोलन सुरु होण्याच्या आधीचा आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘विकासाभिमुख’ संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या विरोधातील ‘टीम अण्णा’ आणि भाजप नेत्यांमधील गुप्त मिटिंग दरम्यानचा हा फोटो असल्याचं सांगण्यात येतंय.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सोशल मिडिया सह समन्वयक विनय कुमार डोकानिया यांनी ट्वीटरवर टाकलेला हा फोटो जवळपास ११०० युजर्सनी रिट्वीट केलाय.
तत्कालीन टीम अण्णाचे सदस्य आणि राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी यांनी फेसबुकवर यासंबंधी प्रतिक्रिया दिलीये. व्हायरल फोटोत ‘उजव्या बाजूची आपल्याकडून पहिली व्यक्ती म्हणजे मी आहे, असं मला सांगण्यात आलेलं आहे’ असं चौधरी यांनी लिहिलंय.
सोबतच ती व्यक्ती आपण नसून मनीष सिसोदिया असावेत, असं सांगत त्यांनी फोटोत आपण नसल्याचं स्पष्ट केलंय. शिवाय त्या फोटोशी फोटोशॉपच्या मदतीने छेडछाड करण्यात आली असल्याचं चौधरी सुचवू पाहताहेत. विश्वंभर चौधरी यांनी आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ वेगवेगळे तर्क देखील दिलेत. ते त्यांच्या मूळ फेसबुक पोस्टमध्ये वाचता येतील.
पडताळणी :
व्हायरल फोटोची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही गुगलवर वेगवेगळ्या कीवर्डसह शोध घेतला. आम्हाला ‘इंडिया टुडे’च्या वेबसाईटवरील ‘टीम अण्णा मीट्स टॉप बीजेपी लीडर्स’ या फोटो फिचरमध्ये हा फोटो सापडला. फोटोच्या क्रेडिट्सनुसार यशवंत नेगी यांनी हा फोटो घेतलेला आहे.
‘लोकपाल विधेयकावरील सर्वपक्षीय बैठकीपूर्वी सिव्हील सोसायटीच्या सदस्यांनी दिल्ली येथे वरिष्ठ भाजप नेत्यांची भेट घेतली’ असं या फोटोच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आलंय. इतर फोटोंच्या कॅप्शननुसार ही बैठक भाजपच्या मुख्यालयात पार पडली होती, हे देखील समजलं.
हाच फोटो आम्हाला ‘फर्स्ट पोस्ट’च्या १ जुलै २०११ रोजी प्रकाशित बातमीत देखील मिळाला.
त्यानंतर याच बैठकीचा ‘इंडिया टुडे’वरील रिपोर्ट देखील वाचायला मिळाला. हा रिपोर्ट देखील १ जुलै रोजीचाच आहे.
रिपोर्टनुसार ही बैठक जवळपास दीड तास चालली होती. बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी बैठकीनंतर दिली होती.
बैठकीत जनलोकपाल विधेयक आणि सरकारचं लोकपाल विधेयक यांच्या मसुद्यावर चर्चा झाली. सरकारी लोकपाल विधेयक संसदेत मांडण्यात आल्यानंतर भाजपच्या अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि लालकृष्ण अडवाणी यांसारख्या नेत्यांनी सक्षम विधेयकासाठी बाजू लाऊन धरण्याची विनंती करण्यात आली आणि त्यांनी ती मान्य केली. विधेयक कसं असायला हवं याविषयी आम्हाला भाजपकडून चांगलं मार्गदर्शन मिळालं असल्याचं देखील अण्णा हजारे यांनी त्यावेळी सांगितलं होतं.
बैठकीत अण्णा हजारे यांच्याबरोबर किरण बेदी आणि अरविंद केजरीवाल देखील सहभागी होते.
वस्तुस्थिती :
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मिडीयावर व्हायरल होणारा फोटो २०१० मधला नसून जुलै २०११ मधला आहे. शिवाय फोटो कुठल्याही गुप्त मिटिंगचा नाही.
फोटो अगदीच जशाच तसा आहे. फोटोशी फोटोशॉपच्या मदतीने कुठलीही छेडछाड करण्यात आलेली नाही. यशवंत नेगी यांनी हा फोटो घेतलेला आहे.
हे ही वाचा- अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबाचं जनसंघ, RSS कनेक्शन खरंय का?
Be First to Comment