बिहार निवडणुकीत एआयएमआयएमचे नेते ओवेसी आणि भाजप नेते अमित शहा यांची सिक्रेट डील (amit shah owaisi secret deal) झाली होती असा दावा करणारे पत्र आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल वाचून दाखवत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय.
फेसबुकवर देखील मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ व्हायरल होतोय.
पडताळणी:
व्हायरल व्हिडीओच्या की-फ्रेम्स आम्ही रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिल्या तेव्हा १८ जुलै २०१६ रोजी अपलोड करण्यात आलेल्या युट्युब व्हिडीओचा संदर्भ मिळाला.
विशाल दादलानी यांच्या शोमध्ये बोलताना अरविंद केजरीवाल यांनी अमित शहांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या यतीन ओझा यांचे पत्र वाचून दाखवले होते. अमित शहा आणि अकबरुद्दीन ओवेसी यांची १५ सप्टेंबर २०१५ रोजी पहाटे ३ वाजता अमित शहांच्या घरी गुप्त बैठक (amit shah owaisi secret deal) पार पडली होती असे त्यात म्हंटले आहे.
हा व्हिडीओ आताच्या बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर व्हायरल झालाय परंतु वस्तुतः ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२० च्या तीन दिवसांत झालेल्या निवडणुकांचा ५ वर्षे जुन्या व्हिडिओशी संबंध लावणे अतार्किक आहे.
या व्हिडीओविषयी सर्च केले असता हा बिहारच्या २०१५ साली झालेल्या निवडणुकांच्या संदर्भात प्रसिद्ध झाला होता. यातील दावे निराधार असल्याचे सांगत अकबरुद्दीन ओवेसी यांनी फेटाळून लावले. तसेच अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करू असेही सांगितले होते. परंतु केजरीवाल यांनी ओझांच्या पत्राचा आधार घेत ही माहिती दिल्याने थेट त्यांच्याविरोधात कारवाई होणे शक्य झाले नाही. या संबंधी त्यावेळी बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये अकबरुद्दीन ओवेसी आणि अमित शहा यांच्यात बिहार निवडणुकांसंबंधी झालेल्या गुप्त बैठकीबद्दल यतीन ओझा यांच्या पत्राचा आधार घेत माहिती देणाऱ्या अरविंद केजरीवाल यांचा व्हायरल व्हिडीओ आता २०२० साली झालेल्या निवडणुकांशी संबंधित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सादर व्हिडीओ २०१६ सालचा आहे.
हेही वाचा: अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधण्यासाठी भाजप नेत्याने दिल्लीचे म्हणत वापरले पंजाबचे फोटो!
Be First to Comment