Press "Enter" to skip to content

मोराला राष्ट्रध्वजामध्ये गुंडाळून अंतिम संस्कार करण्याचा ‘प्रोटोकॉल’ आहे का?

राष्ट्रीय पक्षी असल्याने मोरावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा प्रोटोकॉल आहे का? हे प्रश्न पुन्हा नव्याने अनेकांना पडू लागले आहेत. निमित्त आहे एका घटनेचं.

Advertisement

नाशिक जिल्हयातील वडनेर-भैरव-पिंपळगाव बसवंत हद्दीतील शासकीय रोप वाटिकेतील एका इलेक्ट्रीक खांबावरील विद्युत तारांचा शॉक लागून एक मोर जखमी अवस्थेत आढळला. त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केल्यानंतर वनाधिकाऱ्यांनी अंत्यसंस्कार करण्यापूर्वी तिरंग्यात गुंडाळले होते.

ही बाब चर्चेचा विषय बनल्याचं ‘नाशकात राष्ट्रीय पक्षी मोरावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार’ या हेडिंगखाली ABP माझाने दिलेल्या बातमीत आपण वाचू शकता.

ABP Majha news about peacock cremation
Source: ABP Majha

याच पद्धतीने मोराला तिरंग्यात गुंडाळून अंत्यसंस्कार केल्याचे व्हिडीओज काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते.

‘ मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे, म्हणून जेव्हा तो मरतो तेव्हा त्याला राष्ट्रध्वजामध्ये गुंडाळून त्याचे अंतिम संस्कार केले जातात. हे खूप कमी लोकांना माहीत आहे.’ या कॅप्शनसह ते व्हिडीओ व्हायर होत होते.

अनेक फेसबुक युझर्सने आपल्या वैयक्तिक वॉलवर, ग्रुप्स मध्ये, पेजेसवर हा व्हिडीओ शेअर केला होता.

anant kale FB post
credit: facebook
marathi 1 number batmya facebook post
credit: facebook

पडताळणी:

मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी असल्याचं आपण शाळेपासून शिकत आलोय त्यामुळे त्यात शंका घ्यायचं कारण नाहीच. परंतु मोराच्या मृत्यूनंतर त्याला तिरंग्यात गुंडाळले जात असल्याचे कदाचित सर्वजण पहिल्यांदाच ऐकत असावेत. हा असा काही प्रोटोकॉल आहे का खरेच? याची शहानिशा करण्यासाठी ‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणी सुरु केली.

गुगलवर ‘peacock tricolor cremation’ असे काही कीवर्ड्स टाकून पाहिले तर आमच्यासमोर २०१८ च्या काही बातम्या आल्या.

काय होत्या बातम्या?

दिल्ली हायकोर्टाच्या बाहेर गेट नंबर ५ जवळ एक मोर पहुडलेला दिसला. पोलिसांनी त्याला चांदणी चौकातील पक्षांच्या दवाखान्यात नेलं. तिथे मोर मृत असल्याचं सांगण्यात आलं.

मग दिल्ली पोलिसांनी मोर हा राष्ट्रीय पक्षी असल्याने त्याला योग्य तो सन्मान मिळावा म्हणून ‘प्रोटोकॉल’ असल्याचं कारण देत त्यास तिरंग्यात गुंडाळून नेलं. यावर बऱ्याच चर्चा झडल्या.

अनेक पर्यावरण प्रेमी, पक्षीप्रेमींनी आक्षेप घेतला. पक्षी मेल्यानंतर त्याचे पोस्टमॉर्टम व्हायला हवे, त्यास राज्य वन अधिकाऱ्यांनीच दफन करायला हवे असा कायदा असताना पोलिसांनी हा कारभार केलाच कसा असे सवाल उठले. त्या पोलिसांवर कारवाईची मागणी सुद्धा केली गेली.

या सर्व गोंधळात मोर तिरंग्यात गुंडाळायला हवा की नाही यावरसुद्धा चर्चा झडल्या. पोलिसांवर कारवाईची मागणी करणाऱ्यांनी ‘फ्लॅग कोड ऑफ इंडिया’चे दाखले दिल्याचं आमच्या वाचनात आलं.

शोधाशोध केल्यानंतर ‘मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स’च्या mca.gov.in या अधिकृत शासकीय वेबसाईटवर सर्व राज्यांसाठी दिलेली केंद्रीय गृहमंत्रालयाची मार्गदर्शक सूची आढळली. या सूचित ‘फ्लॅग कोड ऑफ इंडिया,२००२’ आणि ‘द प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर ऍक्ट, १९७१’ या दोन्हींचा समावेश केलेला आहे.

Code of conduct about indian national flag

या गाईडलाईन्समध्ये देशातील महत्वाच्या शासकीय पदांवर असणाऱ्या व्यक्ती तसेच राज्य, केंद्र, सैन्य, अर्धसैन्य दलातील व्यक्तींसाठीच तिरंग्याचा मान असल्याचा उल्लेख आहे.

‘टाईम्स नाऊ’च्या बातमीनुसार स्वतंत्र भारतात सर्वात पहिल्यांदा महात्मा गांधी यांना मृत्यूनंतर तिरंग्याचा मान दिला होता. त्यानंतर अपवादात्मक परिस्थितीत चित्रपट अभिनेत्री श्रीदेवी यांनाही हा मान दिला गेलाय.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत ‘फ्लॅग कोड ऑफ इंडिया,२००२’ आणि ‘द प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर ऍक्ट, १९७१’ यांच्या अभ्यासातून हे स्पष्ट झालं की देशातील महत्वाच्या शासकीय पदांवर असणाऱ्या व्यक्ती तसेच राज्य, केंद्र, सैन्य, अर्धसैन्य दलातील व्यक्तींसाठीच मृत्यनंतर तिरंग्याचा मान देण्याचे नियम आहेत. या व्यतिरिक्त अधिकृतरीत्या केवळ महात्मा गांधी आणि श्रीदेवी यांनाच मरणोपरांत हा सन्मान मिळालाय.

५९ पानांच्या या नियमावलीत कुठेही ‘राष्ट्रीय पक्षी असल्याने मोराला तिरंग्यात लपेटले जावे’ असा नियम नाही. त्यामुळे ‘मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे, म्हणून जेव्हा तो मरतो तेव्हा त्याला राष्ट्रध्वजामध्ये गुंडाळून त्याचे अंतिम संस्कार केले जातात. हे खूप कमी लोकांना माहीत आहे.’ असं लिहिलेली पोस्ट फेक आहे.

त्याचप्रमाणे नाशकातील मोराचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे कृत्य कायद्याच्या चौकटीत न बसणारे आहे.

हेही वाचा:

हेही वाचा: शरीरातील ऑक्सिजन मोजण्याचा दावा करणारे ऍप्स कितपत विश्वासार्ह?

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा