पक्षाघात, लकवा, अंगावरून वारं जाणे अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या पॅरलिसीस या आजारावर अवघ्या काही तासात पूर्णतः इलाज करणारी अत्याधुनिक मशीन (Paralysis cure machine) उपलब्ध असल्याचे मेसेज आणि पोस्ट्स सध्या व्हायरल होताहेत.
व्हायरल मेसेज:
‘के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये पक्षघात (प्यारालेसीस /लकवा )या आजारावर अँटोमॅटिक या मशीन द्वारे काही तासातच रुग्ण पूर्ववत बरा होतो, मेंदूच्या गाठी या मशीनच्या सहाय्याने एन्जोप्लाष्टी प्रमाणे काढुन टाकल्या जातात, तसेच भारतात प्रथम याच हॉस्पिटलमध्ये ही सुविधा उपलब्ध झाली आहे.
जगभरात काही ठराविक अशा मशीन आहेत, सदर मशीन हाताळण्यात डॉ. नितीनजी डांगे हे जगप्रसिद्ध आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सदर मशीनीचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.
माहीती सर्वाना कळवा फायदा होईल
FORWARDED AS RECEIVED..’
व्हॉट्सऍपवर व्हायरल होणारा हा मेसेज ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक शंकर साळवे यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर आम्ही जेव्हा शोधाशोध केली तेव्हा हे असे मेसेज/ पोस्ट्स २०१८ सालापासून व्हायरल होत असल्याचे समजले.
२०१८ सालची फेसबुक पोस्ट:
ट्विटरवर देखील असेच दावे व्हायरल होत असल्याचे आपण ‘येथे‘ पाहू शकता.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’च्या माध्यमातून पडताळणी करताना ऍडव्हान्स किवर्ड्सच्या सहाय्याने सर्च केले असता आम्हाला ‘मुंबई मिरर’ची ३ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रकाशित झालेली बातमी सापडली.
या बातमीनुसार, व्हॉट्सऍपवर व्हायरल होत असलेल्या मेसेजमुळे मुंबईतील परळच्या ‘के.इ.एम’ हॉस्पिटलमध्ये पॅरलिसीस झालेल्या रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.
बातमीनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेने के.इ.एम हॉस्पिटलसाठी ८.५ कोटी रुपये किमतीचे ‘Biplane digital subtraction angiography’ मशीन (Paralysis cure machine) विकत घेतले आहे. स्ट्रोक आल्यानंतर २४ तासांच्या आत जर या मशीनद्वारे इलाज केला तर रक्तवाहिन्यांमधील गाठी निघू शकतात. त्यामुळे पक्षाघाताचा रुग्ण बरा होण्यास मदत होते.
केवळ २४ तासाच्या आतच उपचार:
‘मुंबई मिरर’ने व्हायरल मेसेजमध्ये उल्लेख असलेल्या वरिष्ठ न्युरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही या व्हॉट्सऍप मेसेजमुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर इतर राज्यांतील, देशाबाहेरील अनेकांची दिशाभूल केली आणि जुन्या केसेस घेऊन ते हॉस्पिटलला गर्दी करू लागले असे सांगितले.
त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे स्ट्रोक आल्यापासून केवळ २४ तासाच्या आतच हा उपचार होऊ शकतो. या आधी अशा प्रकारच्या मशीन केवळ ६ तासांच्या अवधीतच फायदेशीर असत परंतु नव्या तंत्रज्ञानामुळे ती वेळ मर्यादा २४ तासांपर्यंत गेली आहे. पक्षाघात होऊन जास्त दिवस अथवा महिने झाले असतील तर या मशीनचा उपयोग नाही असे ते म्हणाले.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल मेसेज गेल्या दोन अडीच वर्षांपासून व्हायरल होत असल्याचे समोर आले. त्यात दिलेली माहिती अर्धवट आणि दिशाभूल करणारी आहे.
सदर अत्याधुनिक मशीन स्ट्रोकनंतर केवळ २४ तासाच्या आत उपचार करण्यासच मदतगार आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ही मशीन केवळ मुंबईतील परळच्या के.इ.एम हॉस्पिटलमध्ये आहे.
हेही वाचा: आक्षेपार्ह मेसेजसाठी ग्रुप ऍडमिन जबाबदार असल्याचा दावा करणारी जुनी फेक न्यूज व्हायरल!
Be First to Comment