भारताचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ रविंद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) यांनी लिहिले आणि त्यास चाल देखील त्यांनीच लावली असे आपण शाळेत असल्यापासून अभ्यासत आलो आहोत. परंतु सोशल मीडियात असा दावा केला जातोय की ही धून किंवा हे राष्ट्रगीत नेताजी सुभाषचंद्र बोस (Subhash Chandra Bose) यांच्या ‘आझाद हिंद सेने’चे होते. टागोर यांनी नंतर ते कॉपी करून ‘पंचम जॉर्ज’ याची स्तुती करण्यासाठी वापरले, आज आपण तेच राष्ट्रगीत म्हणून गात आहोत.
हेच दावे फेसबुकवर आणि व्हॉट्सऍपवर देखील खूप मोठ्या प्रमाणत व्हायरल होतायेत.
अशाच प्रकारचे दावे २०१९ साली देखील व्हायरल झाले होते.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यातील एकेका मुद्द्याविषयी पडताळणी करून पाहिली. जे जे गवसलं ते पुढीलप्रमाणे:
१. रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रगीतासाठी धून ‘कॉपी’ केली?
- या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की महात्मा गांधी यांनी ज्यांना ‘गुरुदेव’ संबोधले त्या रवींद्रनाथ टागोर यांनी ‘जन गण मन’ या गीताचा पहिला ड्राफ्ट १९०८ साली लिहिला होता.
- ‘द हिंदू‘च्या रिपोर्टनुसार रवींद्रनाथ टागोर आंध्रप्रदेशातील मांडापल्ले येथे आयरिश कवी जेम्स कुजीन्स यांच्याकडे वास्तव्यास असताना त्यांची पत्नी मार्गारेट कुजीन्स यांनी ‘जन गण मन’च्या इंग्रजीत भाषांतरीत केलेल्या ‘मॉर्निंग सॉंग ऑफ इंडिया’ गीतास चाल लावली. याच चालीस टागोर यांनी संगीत म्हणून अधिक सुबक करत ‘जन गण मन’ची धून बनवली. ही घटना १९१९ सालची आहे.
२. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं राष्ट्रगीत सर्वात पहिलं?
- नाही, रवींद्रनाथ टागोर यांनी ‘जन गण मन’ बंगाली या त्यांच्या मातृभाषेत लिहिलं होतं. सुभाषचंद्र बोस देखील बंगालचे होते. त्यांना या गीताचे बोल खूप आवडले.
- त्यांनी आझाद हिंद फौजच्या रेडीओसाठी कार्यरत असणाऱ्या लेखिका मुमताज हुसेन आणि कॅप्टन अबीद अली यांच्याकडून हिंदीत भाषांतरीत करून घेतले. यास कौमी तराना (Qaumi Tarana) असेही म्हणतात.
- आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोस (Rash Behari Bose) यांनी १९४२ साली केली होती. पुढे संघटनेस मूर्त स्वरूप नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिले. याचाच अर्थ टागोर यांनी ‘जन गण मन’ संगीतबद्ध केल्यानंतर तब्बल २३ वर्षांनी आझाद हिंद सेनेची स्थापना झाली होती.
३. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी ‘पंचम जॉर्ज’साठी हे गीत लिहिलेलं?
- अनेक वर्षांपासून काही गटांत अशी चर्चा केली जाते की इंग्लंडचा राजा जॉर्ज पाचवा जेव्हा भारतात आला तेव्हा रवींद्रनाथ टागोर यांनी त्याच्या स्वागतासाठी त्याची स्तुती असणारं गीत लिहिलं होतं, तेच नंतर आपलं राष्ट्रगीत बनलं. असं बोललं जातं की ‘भारत भाग्य विधाता’ हे शब्द त्या राजासाठीच वापरले होते.
- परंतु हे असत्य आहे. १९११ साली पंचम जॉर्ज (Pancham George) भारतात आल्यावर बंगालची फाळणी रोखली म्हणून त्यांचे आभार मानण्यासाठी कॉंग्रेसने एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ‘ईशस्तवन’ म्हणजे कोणत्याही कार्यक्रमाआधी केलेली देवाची, निर्मिकाची पूजा म्हणून रविंद्रनाथ टागोर यांची ही कविता वाचली गेली होती. त्यानंतर पंचम जॉर्जची स्तुती करणारी पंडित रामभूज दत्त चौधरी यांची कविता वाचली गेली होती.
- रवींद्रनाथ टागोर यांनी १९३७ साली या चर्चांना उत्तर दिले होते,
एक ब्रिटिश ऑफिसर मेरा दोस्त था. उसने मुझसे कहा कि ब्रिटिश सम्राट का गुण-गान करते हुए एक कविता लिख मारो. इस बात पर मुझे बहुत गुस्सा आया. इसीलिए मैंने ‘जन गण मन’ में ‘भारत भाग्य विधाता’ के बारे में लिखा था कि ये देश आदि काल से अपना भाग्य खुद लिख रहा है. वो भाग्य विधाता जॉर्ज पंचम तो कतई नहीं हो सकते. वो ब्रिटिश अफसर मेरी बात समझ गया था.
– गुरुदेव रवींद्रनाथ टागोर
- १९३९ साली टागोर यांनी ‘जॉर्ज चौथा हो या पांचवां, मैं उसके बारे में क्यों लिखूंगा? इस बात का जवाब देना भी मेरा अपमान है.’ अशाच शब्दांत उत्तर दिले होते.
- रवींद्रनाथ टागोर यांना ब्रिटीश प्रशासनाने ‘नाईटहूड’ ही उपाधी दिली होती ज्यामुळे त्यांच्या नावापुढे ‘सर’ लावले जात असे. परंतु जालियानवाला बाग हत्याकांडात ब्रिटिशांनी जो संहार केला त्याने व्यथित होऊन टागोर यांनी ती पदवी माघारी देऊन टाकली. एवढ्या करारी व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीने पंचम जॉर्जची खुशामद करण्यासाठी कविता लिहिणे हेच अतार्किक आहे.
वस्तुस्थिती:
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी १९१९ साली ‘जन गण मन’ संगीतबद्ध केल्यानंतर तब्बल २३ वर्षांनी १९४२ साली ‘आझाद हिंद सेने’ची स्थापना झाली होती. त्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सेना गीताचे बोल किंवा धून ‘कॉपी’ करून टागोर यांनी ‘जन गण मन’ लिहिले हा दावा अगदीच निराधार आणि फेक असल्याचे सिद्ध होते. उलट सुभाषबाबूंनी टागोरांच्या गीतास भाषांतरीत करून आझाद हिंद सेनेचे गीत बनवले हे सत्य आहे.
पंचम जॉर्जच्या खुशामदीसाठी टागोर यांनी हे गीत लिहिले आणि त्यास ‘भारत भाग्य विधाता’ संबोधले या दाव्यांतही तसूभर तथ्य नाही हेच ‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत स्पष्ट झाले.
हेही वाचा: कॉंग्रेसने वर्षानुवर्षे शालेय पुस्तकात टीपू सुलतानचा चुकीचा फोटो छापलाय? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] हेही वाचा: भारताचे मूळ राष्ट्रगीत रवींद्रनाथ टा… […]
[…] हेही वाचा: भारताचे मूळ राष्ट्रगीत रवींद्रनाथ टा… […]