Press "Enter" to skip to content

‘सरकारी कीट’वर टाकलेल्या नळाच्या पाण्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येत असल्याच्या दाव्यात कितपत तथ्य?

कोव्हीड १९ टेस्ट करणाऱ्या कीटवर साधे नळाचे पाणी टाकूनही कोरोना पॉझिटिव्ह (tap water tests positive for corona) रिझल्ट येत आहे. सरकारी यंत्रणा तुम्हाला जिवंतपणीच मारणार. अशा आशयाच्या मेसेजसह एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय.

Advertisement

‘PCR कीट बघा नळाचे पाणी पण पॉझिटिव्ह दाखवतेय, चपलेनी मारा हरामखोरांना. जागे व्हा तुमचे स्वास्थ्य चांगले असेल, यंत्रणा तुम्हाला जिवंतपणे मारणार.’

‘पाण्याच्या नळाने सुद्धा सरकारी कोरोन टेस्ट कीट पॉझिटिव्ह दाखवत आहे मग काय म्हणून कोरोनाची संख्या वाढणार नाही? आताच वेळ आहे सर्व जनतेने आवाज उठवायची वेळ आली आहे.’

‘जास्त टेन्शन घेऊ नका, फक्त काळजी घ्या नळाचे पाणी पण पॉझिटिव्ह दाखवते.’

‘यदि आप स्वस्थ्य हैं तो किसी के बहकावे में मत आइए सरकारी PCR किट तो नल के पानी को भी पॉजीटिव बता रही इन्हें जूते मारकर भगाइए अभी नहीं जागे तो सरकार आपको जीते जी मार देगी’

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सुनील जैन, वैभव झगडे, निलेश माळणी आणि दिपाली धनवडे यांनी नळाच्या पाण्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह (tap water tests positive for corona) येत असल्याचे अनेक दावे व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि पडताळणीची विनंती केली.

Viral videos of positive corona test of water checkpost marathi fact
Source: Whatsapp

PCR किट बघा नळाचे पाणी पण पाॅझिटिव्ह दाखवतेय*जागे व्हा* तुमचे स्वास्थ चांगले असेल, यंत्रणा तुम्हाला जिवंत पणे मारणार.

Posted by Vaibhav Gare on Monday, 26 April 2021

अर्काईव्ह लिंक

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओ आणि त्यासोबतचे दावे अभ्यासले आणि पडताळणी केली असता जे जे समोर आलं ते खालीलप्रमाणे-

१. ती PCR टेस्ट नाही

व्हायरल व्हिडिओत दिसत असलेले कीट कोव्हीड१९ चे रॅपिड अँटीजन टेस्ट कीट आहे, ही PCR टेस्ट नव्हे.

Polymerase Chain Reaction म्हणजे PCR. या टेस्ट मध्ये रुग्णाचा स्वॅब लॅबमध्ये पाठवून त्यावर extraction प्रोसेस करून त्यातील जेनेटीक मटेरिअल वेगळे करतात व त्याला PCR मशीन द्वारे thermal cycler प्रोसेसमधून पास करतात. या प्रोसेसमध्ये त्या जीन्सचे सूक्ष्म भाग होतात. जर त्यात SARS CoV 2 म्हणजेच कोरोना व्हायरस असेल तर PCR मशीन फ्ल्युरोसंट लाईट दाखवते.

२. रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याची पद्धत

नाकातील स्वॅब घेऊन त्यास विशिष्ट द्रावणात मिक्स केले जाते. त्याचे केवळ ५ थेंब कीटवर टाकून १५ मिनिटे (ना कमी ना जास्त) वाट पाहिल्यानंतर त्यात येणारे रीडिंग म्हणजे रॅपिड अँटीजन टेस्ट आहे.

या टेस्ट साठीची योग्य पद्धत दर्शवणारा व्हिडीओ:

३. व्हायरल व्हिडीओतील टेस्टची विश्वासार्हता

व्हिडीओत दर्शवल्याप्रमाणे कुठलीच प्रोसेस व्हायरल दाव्याच्या व्हिडीओमध्ये पाळली गेली नाहीये. सँपलचे केवळ पाच थेंब टाकणे गरजेचे आहेत तिथे त्यांनी थेट पाण्याची धार चालू करून दिली.

तसेच रीडिंग साठी बरोबर १५ मिनिटे देणे गरजेचे होते, ते २ मिनिटातच दाखवून मोकळे झाले. त्यातूनही समोर आलेले रीडिंग अस्पष्ट आहे. C समोरील रेषा स्पष्ट दिसत आहे परंतु T समोरील रेषा अर्धवट आणि अस्पष्ट आहे.

Tap water antigen test

म्हणजेच गाईडलाईन्स नुसार C समोरील रेषा स्पष्ट दिसणे म्हणजे टेस्टचा रिझल्ट निगेटिव्ह आहे.

४. जरी तो रिझल्ट पॉझिटिव्ह मानला तरी

हा निकाल पॉझिटिव्ह मानला तरीही आपणास हे जाणून घ्यायला हवे की स्वतः अमेरिकेचे अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA हे स्पष्ट करते की एखादा रुग्ण कोव्हीड पॉझिटिव्ह असल्याचे ठोसपणे ठरवण्यासाठी RT-PCR टेस्ट हीच विशासार्ह आहे.

रॅपिड अँटीजन टेस्टचा निकाल लवकर येत असला, तरीही त्या टेस्टचे रिझल्ट हे टेस्ट करण्याची करण्याची पद्धत, किट्स स्टोअर करण्याची पद्धत आणि कीट तयार करणारी कंपनी या सारख्या विविध गोष्टींवर अवलंबून आहे.

रॅपिड अँटीजन टेस्ट टेस्ट ‘फॉल्स पॉझिटिव्ह’ किंवा ‘फॉल्स निगेटिव्ह’ रिझल्ट देऊ शकते. ICMR (Indian Council of Medical Research) ने देखील रॅपिड अँटीजन टेस्टपेक्षा RT-PCR हीच विश्वासार्ह आणि अचूक असल्याचे म्हंटले आहे.

५. कंपनीचे व्हायरल दाव्यांना उत्तर

व्हायरल व्हिडीओ केवळ भारतीयांनीच शेअर केलाय असे नव्हे तर पाश्चात्य देशातील लोकांच्याही सोशल अकाऊंटवरून हाच व्हिडीओ शेअर झालाय. विशेष म्हणजे त्यातीलच तीन ट्विट्सवर ज्या कंपनीचे कीट त्यात दिसते आहे त्या Abbotच्या ऑफिशियल अकाऊंटवरून रिप्लाय दिला गेलाय. तिन्ही रिप्लाय खालीलप्रमाणे:

ट्विट १: ”Panbio Ag’ हे कीट पाणी किंवा इतर अन्न पदार्थ अथवा कुठल्याही द्रव पदार्थास तपासण्यासाठी नाही.

ट्विट २: हे कीट नाक किंवा नाकाच्या वरच्या भागातून कलेक्ट केलेल्या सँपलला तपासण्यासाठीच आहे.

ट्विट ३: जेव्हा हेतुतः वापरले जाते, तेव्हा ही एक अत्यंत अचूक चाचणी आहे जी जगभरातील कोविड -१९ शोधण्यात मदत करते आणि ते नियंत्रित करण्याच्या प्रयत्नांमध्ये लक्षणीय सुधारणा करू शकते

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट होतेय की व्हायरल व्हिडीओसोबत असलेल्या मजकुरात केलेल्या दाव्याप्रमाणे ती PCR टेस्ट नाही. PCR टेस्टच्या निकालास किमान २४ तास लागतात. ती जास्त विश्वासार्ह टेस्ट आहे.

व्हिडीओत दर्शवलेल्या रॅपिड अँटीजन टेस्टचा वापर आपल्या देशात होत असला तरीही ती करण्याची व हाताळण्याची पद्धती अतिशय शिस्तबद्ध आणि वैज्ञानिक आहे. टेस्ट करताना झालेल्या छोट्याश्या चुकीमुळे टेस्टचा रिझल्ट बदलू शकतो.

सर्वात महत्वाचे म्हणजे टेस्टचा निकाल निगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह, रुग्णाच्या लक्षणांवर आणि त्यांच्या तीव्रतेवर उपचार पद्धती अवलंबून आहे. जिथे दवाखाने खच्चून भरले आहेत, बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटीलेटरची प्रचंड चणचण आहे तिथे धडधाकड व्यक्तीस विनाकारण दवाखान्यात कोण भरती करेल? या अशा व्हायरल दाव्यांवर विश्वास न ठेवता लक्षणे आढळल्यास लवकरात लवकर टेस्ट करून इलाज चालू करण्यातच शहाणपण आहे.

हे ही वाचा: मास्क गरम केल्यावर निघाले काळे जंतू? व्हायरल व्हिडीओचा दावा खरा?

More from कोरोनाMore posts in कोरोना »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा