सोशल मीडियात एका न्यूज पेपरचा स्क्रिनशॉट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. दावा केला जातोय की काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा जगभरातील १२ श्रीमंत राजकारण्यांच्या यादीत (sonia gandhi richest politician) समावेश असून सोनिया गांधी यांची संपत्ती २ अरब डॉलर अर्थात १ खरब रुपये एवढी आहे.
सोनिया गांधींनी हा पैसा देशाला लुटून कमावला असून, पंतप्रधान मोदींकडून १५ लाख रुपये मागण्यापेक्षा सोनिया गांधींकडून १-१ करोड रुपये वसूल करण्याचे सल्ले दिले जाताहेत.
पडताळणी :
गेल्या काही दिवसांमध्ये जगभरातील श्रीमंत राजकीय नेत्यांच्या यादीमध्ये सोनिया गांधी यांचा समावेश असल्याविषयीची कुठलीही बातमी वाचण्यात अगर ऐकण्यात आलेली नाही. त्यामुळे आम्ही पडताळणीस सुरुवात केली.
व्हायरल कात्रणात जी बातमी दिसतेय, ती हफिंग्टन पोस्ट वेबसाईटच्या दाव्याच्या आधारे देण्यात आल्याचे बातमीत म्हंटले आहे. त्यामुळे याच माहितीच्या आधारे आम्ही हफिंग्टन पोस्टने अशी काही बातमी दिली आहे का हे शोधण्याचा प्रयत्न केला.
आम्हाला हफिंग्टन पोस्टच्या वेबसाईटवर २९ सप्टेंबर २०१३ रोजी प्रकाशित लेख वाचायला मिळाला. या लेखात जगभरातील १८ श्रीमंत राजकीय नेत्यांची यादी देण्यात आलेली आहे. रशियाचे ब्लादिमीर पुतीन हे या यादीत पहिल्या क्रमांकावर असल्याचे बघायला मिळाले. मात्र यादीत कुठेही सोनिया गांधी यांचे नाव (sonia gandhi richest politician) आमच्या निदर्शनास आले नाही.
दरम्यान, यादीच्या सर्वात शेवटी एडिटर्स नोट मध्ये सोनिया गांधी आणि कतारचे हमीद बिन खलिफा यांचे नाव यादीतून हटविण्यात आल्याचे म्हंटले आहे. सोनिया गांधी यांचे नाव थर्ड पार्टी साईटकडून सामील करण्यात आले होते. मात्र त्यांच्या संपत्तीच्या आकड्यांची शहानिशा न होऊ शकल्याने यादीतून नाव वगळण्यात आले असल्याचे ‘हफिंग्टन पोस्ट’ने म्हंटले आहे.
आम्ही सोनिया गांधी यांच्या संपत्तीचा आकडा मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार सोनिया गांधी यांनी २००९ सालच्या निवडणुकीत आपली संपत्ती ९ कोटी रुपये असल्याचे घोषित केले होते, तर २००४ सालच्या निवडणुकीपूर्वी त्यांची संपत्ती १ कोटी इतकी होती.
वस्तुस्थिती :
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोनिया गांधी यांच्या संपत्तीविषयीचे व्हायरल ग्राफिक आणि त्या संदर्भाने केले जाणारे दावे फेक आहेत. ज्या ‘हफिंग्टन पोस्ट’ वेबसाईटच्या आधारे हे दावे केले जात आहेत, त्यांनीच श्रीमंतांच्या यादीतून सोनिया गांधींचं नाव वगळले आहे.
सोनिया गांधी यांच्या संपत्तीच्या आकड्यांची खातरजमा न होऊ शकल्याने हे नाव वगळण्यात आले होते. या प्रकारासाठी वेबसाईटने खेद देखील व्यक्त केलेला आहे. शिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे संबंधित बातमी आताची नसून २०१३ सालातील आहे.
हे ही वाचा- जेम्स बॉंडमधील अभिनेत्रीचे फोटोज सोनिया गांधींचे म्हणून व्हायरल !
Be First to Comment