सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये एक महिला तांदूळ निवडताना दिसतेय. त्या तांदळातून खडे नव्हे तर वेगळ्या प्रकारचा, आकार आणि रंगाचा तांदूळ बाहेर काढला जातोय. हा प्लास्टिकचा तांदूळ (Plastic rice) असून शालेय मुलांसाठीच्या मध्यान्ह भोजनामध्ये (Mid-day meal) या तांदळाची भेसळ केली जात असल्याचा दावा केला जातोय.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक जिजाभाऊ मिसाळ यांनी सदर व्हिडीओ निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केल्यानंतर आम्ही याविषयी अधिक शोधाशोध केली. आम्हाला १३ जुलै २०२१ रोजीची लोकमतची बातमी बघायला मिळाली.
भाजप कार्यकर्त्यांना पालघरमध्ये शालेय पोषण आहारातील (Mid-day meal) तांदळात प्लास्टिकच्या तांदळाची (Plastic rice) भेसळ असल्याचे आढळून आल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी यासंदर्भातील व्हिडीओ ट्विट केला होता, असे लोकमतच्या बातमीत सांगण्यात आले आहे.
पडताळणी:
शालेय पोषण आहारात अशाप्रकारे प्लास्टिकच्या तांदळाची भेसळ म्हणजे अतिशय गंभीर बाब आहे. थेट लहानग्या जीवांशी हा खेळ आहे. या प्रकाराविषयी सखोल पडताळणी करत असताना आम्हाला ‘झी २४ तास’ची बातमी सापडली. यामध्ये त्यांनी ‘अन्न व औषध प्रशासन’ आणि ‘शिक्षण अधिकाऱ्यांशी’ संवाद साधून या प्लास्टिक तांदळाविषयी विचारपूस केलीय.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या तांदळास ‘फोर्टीफाईड राईस’ (Fortified Rice)म्हणतात. यात लोह, फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन बी १२ या तिन्ही तत्वांचे मिश्रण करून तांदळात टाकले जाते. त्यामुळे त्याचा रंग, आकार नेहमीच्या तांदळापेक्षा वेगळा दिसतो.
याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही गुगल सर्च केले असता ‘द इंडियन एक्स्प्रेस‘चा विस्तृत रिपोर्ट वाचायला मिळाला.
कसा बनतो ‘फोर्टीफाईड राईस’?
कोरड्या तांदळाच्या पिठात लोह, फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन बी १२ यांसारखी सूक्ष्मजीवनसत्वे असणारे प्रीमिक्स आणि पाणी मिसळले जाते. त्यातून होणाऱ्या एकजीव गोळ्यास तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तांदळाच्या आकाराप्रमाणे धान्य स्वरुपात तयार केले जाते. मग या छोट्या धान्यासारख्या गोळ्यांना वाळवून थंड करून मग पॅक केले जाते. हा फोर्टीफाईड राईस १२ महिने टिकतो.
‘फोर्टीफाईड राईस’ची गरज काय?
भारत कुपोषण आणि भूकबळीच्या (Malnutrition and starvation) बाबतीत अग्रेसर आहे. ही समस्या खूप मोठी आहे. देशातील महिला आणि मुले कुपोषणाचे शिकार आहेत. सर्व्हेक्षणानुसार देशातील प्रत्येक दुसरी स्त्री शरीरातील रक्ताच्या अभावाने त्रस्त आहे तर प्रत्येक तिसरे मुल कुपोषणाचे शिकार आहे.
‘जागतिक भूक निर्देशांकात’ १०७ देशांमध्ये भारताचा ९४ वा क्रमांक आहे. हीच समस्या दूर करण्यासाठी पोषण आहारात ‘फोर्टीफाईड राईस’ मिसळवला जात आहे जेणेकरून गरजेची जीवनसत्वे लवकरात लवकर शरीराला मिळतील.
‘प्लास्टिक राईस’ असू शकतो का?
तांदळात प्लास्टिकचा तांदूळ मिक्स केला जातो किंवा थेट प्लास्टिक तांदूळच विकला जात असल्याच्या अफवा आजच्या नाहीत. २०१७ सालापासून भारतात याविषयी अनेक दावे प्रतिदावे होत असतात.
या गोष्टीची सत्यता सत्यता समजून घेण्यासाठी आपणास आधी हे समजून घ्यावे लागेल की कुठल्याही पदार्थात भेसळ करण्यामागचा हेतू हा नफेखोरी असतो. महाग वस्तुत नकली स्वस्त वस्तू टाकून वजन वाढवणे आणि मूळ वस्तूची पुरेपूर रक्कम वसूल करणे हेच भेसळखोरांचे काम असते परंतु ‘नवभारत टाईम्स’च्या माहितीनुसार प्लास्टिकचा तांदूळ जर बनवला तर त्याची किंमत तब्बल २०० रुपये किलो होईल. ५० रुपये किलोच्या तांदळात २०० रुपये किलोच्या पदार्थाची भेसळ करणारा व्यक्ती मूर्खच म्हणावा लागेल.’अन्न व औषध’ प्रशासनाने या आधी अनेकदा हे दावे फेक असल्याचे सांगितले आहेत.
‘प्लास्टिक राईस’ असू शकतो का? नक्कीच असू शकतो परंतु तो भारतीय बाजारपेठेत भेसळ करून विकला गेल्याची घटना आजवर कधी समोर आली आहे, ना ही तांदळांच्या किमती पाहता ते मिसळवणे परवडण्यासारखे आहे. ‘द हिंदू‘ ने देखील याविषयी बातमी केली होती, त्यातही अशा प्रकारचा तांदूळ भारतात नसल्याचेच स्पष्ट होतेय.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की व्हायरल व्हिडीओजमध्ये दिसत असलेला तांदूळ हा प्लास्टिकचा तांदूळ नसून विविध जीवनसत्वे असणारा ‘फोर्टीफाईड राईस’ आहे. महिला आणि बालकांतील कुपोषण व अशक्तपणाच्या समस्यांवर उपाय म्हणून या तांदलांचे मिश्रण करण्यात आले आहे त्यामुळे व्हायरल भूलथापांवर विश्वास ठेऊन तो तांदूळ बाजूला काढून टाकू नये.
हेही वाचा: गोळ्यांच्या कॅप्सूलमध्ये खिळे? धक्कादायक व्हायरल व्हिडीओचे सत्य काय?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment