माध्यमांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कानपूर येथील व्यावसायिक पियुष जैन (Piyush Jain) यांचे नाव चर्चेत आहे. त्यांच्या घरावरील आयकर विभागाच्या छाप्यात मोठ्या प्रमाणात रोकड आणि सोने जप्त करण्यात आले आहे.
सध्या सोशल मीडियावर एका ट्विटचा स्क्रीनशॉट व्हायरल होतोय. या स्क्रिनशॉटमध्ये ‘न्यूज 24’ या वृत्तवाहिनीच्या बुलेटिनचे ग्राफिक बघायला मिळतेय. ग्राफिकमध्ये पियुष जैन भाजपशी संबंधित असल्याचे सांगण्यात येतेय. शिवाय भाजपच्या सांगण्यावरून अखिलेश यादव यांची बदनामी केल्याबद्दल ‘न्यूज 24’ चॅनेलकडून अखिलेश यांची माफी मागण्यात आल्याचा दावा देखील केला जातोय.
पडताळणी:
व्हायरल दाव्याच्या पडताळणीसाठी आम्ही ‘News24’ च्या अधिकृत ट्विटर हँडलवर जाऊन ट्विटचा शोध घेतला, मात्र आम्हाला अशा प्रकारचे कुठलेही ट्विट बघायला मिळाले नाही. मात्र याच दरम्यान आम्हाला ‘News24’ चे एक ट्विट मिळाले ज्यात व्हायरल स्क्रिनशॉट फेक असल्याचे सांगण्यात आले आहे.
पियुष जैन कोण आहेत?
पियुष जैन उत्तर प्रदेशातील कन्नौजमधील अत्तराचे व्यापारी आहेत. केंद्रीय यंत्रणांनी कर चुकवेगिरीच्या आरोपाखाली जैन यांना अटक केली आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने त्यांच्या घरावरील छाप्यादरम्यान जैन यांच्याकडून आतापर्यंतची सर्वाधिक रोकड जप्त केली आहे.
पियुष जैन यांच्या नावावरून सध्या उत्तर प्रदेशातील राजकारण देखील तापलेले आहे. भाजपकडून पियुष जैन समाजवादी पक्षाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येतेय, तर समाजवादी पक्षाने त्यांचा संबंध भाजपशी जोडत भाजपने आपल्याच माणसाला अटक केली असल्याचा दावा केलाय.
पियुष जैन समाजवादी पक्षाचे की भाजपचे?
नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार पियुष जैन हे केवळ अत्तर व्यापारी आहेत. पियुष जैन यांचा कुठल्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांशी फारसा संबंध राहिलेला नाही. ते कधी कुठल्या पक्षाच्या बैठकीमध्ये किंवा राजकीय कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी होत नसत.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की भाजपच्या सांगण्यावरून बदनामी केल्याबद्दल ‘News24’ चॅनेलने समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांची माफी मागितली असल्याचे दावे चुकीचे आहेत. सोशल मीडियावरील व्हायरल ग्राफिक एडिटेड आहे. चॅनेलने उद्योगपती पियुष जैन यांचा भाजपशी संबंध असल्याची बातमी दिलेली नाही.
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment