स्मार्टफोनवर अति प्रमाणात गेम खेळल्याने डोळ्यात ‘पॅरासाईट’ नावाचा किडा (parasite in eye) तयार होतो अशा दाव्यांसह एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. डोळ्यातून पांढऱ्या रंगाचा लांबचक धाग्यासारखा कृमी बाहेर काढत असतानाचा ऑपरेशन रूम मधील तो व्हिडीओ आहे.
‘खुपवेळ मोबाईल फोनवर गेम खेळल्यामुळं डोळ्यामध्ये पैरासाईट नावाचा किडा तयार होतो, त्याला ऑपरेशन करून काढताना बघा?. कृपया हे सर्व ग्रुपवर पाठवा.
हे आपल्या मुलांना दाखवा त्यांना समजवा पुढे पाठवणाराला धन्यवाद.’
या अशा मजकुरासह तो ३.०८ मिनिटाचा व्हिडीओ शेअर केला जातोय.
व्हॉट्सऍपवर हे दावे एवढे जोरदार व्हायरल होत आहेत की त्यास व्हॉट्सऍपने ‘forwarded many times’ चा टॅग लावला आहे. ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक करण गायकवाड आणि दिग्विजय डुबल यांनी याविषयीची माहिती देत सत्यतेच्या पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
- व्हायरल दाव्यात किड्याचे नाव ‘पॅरासाईट’ असे लिहिले आहे. मुळात ‘पॅरासाईट’ नावाचा किडा वगैरे नसतो. ‘पॅरासाईट’ म्हणजे ‘परपोशी’.
- ‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओच्या ‘की फ्रेम्स रिव्हर्स’ सर्च करून पाहिल्या तसेच काही ‘ऍडव्हान्सड् की वर्ड्स’च्या आधारे गुगल सर्चही केले असता आम्हाला फेसबुकवर कर्नाटकमधील मणिपाल येथे असलेल्या ‘KMC’मध्ये कार्यरत असणाऱ्या डॉ. अश्लेय मुलामुट्टील यांचा व्हिडीओ मिळाला.
- १८ एप्रिल २०१३ रोजी त्यांनी पोस्ट केलेल्या त्या ११ मिनिटाच्या मूळ व्हिडीओतील केवळ ३ मिनिटाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
- डॉ. अश्लेय मुलामुट्टील यांनी स्वतः रुग्णाच्या डोळ्यावर ऑपरेशन केलेला तो व्हिडीओ आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी अशी माहिती दिली आहे की ही एकप्रकारची अळी आहे. तिला ‘लोआ लोआ वर्म’ असे म्हणतात.
- त्यांनी ऑपरेशन करून काढलेली ती अळी ८ इंच लांबीची होती. त्यांच्या दाव्यानुसार हा जगातील सर्वात लांब ‘लोआ लोआ वर्म’ आहे.
- असा हा वर्म मुख्यतः आफ्रिकेच्या पश्चिम भागात आढळतो. एका विशिष्ट प्रकारच्या माशीने मानवी त्वचेवर हल्ल्या केल्याने हा शरीरात तयार होत जातो. ती माशी सर्वात जास्त प्रमाणत डोळ्यावरच हल्ला करते.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत व्हायरल दावा फेक असल्याचे स्पष्ट झाले. स्मार्टफोनच्या अतिवापराने, सातत्याने गेम खेळल्याने नव्हे तर विशिष्ट माशीच्या चावण्याने हा असा ‘लोआ लोआ वर्म’ शरीरात तयार होतो.
मोबाईलच्या अतिवापराने , डोळ्यांचे कोरडेपण, चष्मा लागणे, डोळे लाल होणे यांसारखे दृष्टीदोष, डोकेदुखी आणि मानसिक त्रास होऊ शकतात.
हेही वाचा: मास्क गरम केल्यावर निघाले काळे जंतू? व्हायरल व्हिडीओचा दावा खरा?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] हेही वाचा: मोबाईलवर खुपवेळ गेम खेळल्याने डोळ्या… […]
[…] हेही वाचा: मोबाईलवर खुपवेळ गेम खेळल्याने डोळ्या… […]