पाकिस्तानी विद्यार्थी त्यांच्या गाड्यांवर भारतीय तिरंगा लाऊन युक्रेनमधून बाहेर पडत असल्याचे अनेकांनी सांगितले तेव्हा पाकिस्तान संसदेत विरोधकांनी सत्ताधारी पक्षास घेराव घातला. इम्रान मुर्दाबाद, मोदी जिंदाबाद असे नारे लावत नरेंद्र मोदींचे आभार मानल्याचे दावे सोशल मीडियात व्हायरल होतायेत. यासाठी एक व्हिडीओ शेअर केला जातोय. (modi modi pakistan)
फेसबुक, ट्विटरप्रमाणेच व्हॉट्सऍपवरही हे दावे खूप जोरदार व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक डॉ. राहुल पाटील, रोहिदास सोनावणे, श्रीकांत साबळे, चंद्रकांत कापुरे, चंद्रकुमार श्रीवास्तव आणि संजय राजवाडकर यांनी निदर्शनास आणून देत पडताळणीची विंनती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओच्या अनुषंगाने शोधाशोध चालू केली असता असे लक्षात आले की हा व्हिडीओ भारतात तिसऱ्यांदा शेअर होतोय.
मोदींना पाकिस्तानचे पंतप्रधान बनविण्याची मागणी:
या आधी २०२१ साली सदर व्हिडीओ शेअर करत अनेक जणांनी हा दावा केला होता की नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानचे पंतप्रधान बनवा अशी मागणी या संसदेत होत होती म्हणून अध्यक्षांनी संसदेची कारवाई स्थगित केली.
पाकिस्तानी संसदेत मोदी-मोदी नारे दिल्याच्या भारतीय मिडियामध्ये बातम्या:
२०२० साली काही भारतीय माध्यमांनी या व्हिडीओच्या आधारे बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. ‘इंडिया टीव्ही’चे ‘एडिटर-इन-चीफ’ रजत शर्मा यांनी स्वतः ही बातमी दिली. पाकिस्तानच्या संसदेत नरेंद्र मोदींच्या संदर्भात जे दावे केले गेलेत, ते बघून आपणासही आश्चर्याचा धक्का बसला होता आणि तो दर्शकांनाही बसेल, असं रजत शर्मा म्हणाले. सुरुवातीला तर आपल्याला पाकिस्तानच्या संसदेत ‘मोदी-मोदी’चे नारे (modi modi pakistan) लावण्यात आल्याच्या गोष्टीवर विश्वासच बसला नाही, परंतु नंतर पाकिस्तानातील सूत्रांकडून या गोष्टीची खातरजमा करण्यात आल्याचा दावा देखील शर्मा करतात.
‘न्यूज नेशन टीव्ही’चे कन्सल्टिंग एडिटर दीपक चौरसिया यांनी देखील ‘इंडिया टीव्ही’च्या बातमीचा हा व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला होता. पोस्टच्या कॅप्शनमध्ये चौरसिया लिहितात, “लो भाई पाकिस्तान की संसद में लगे मोदी-मोदी के नारे। अभी तो यह झांकी है लाहौर कराची बाक़ी है”.
हिंदी न्यूज चॅनेल ‘टीव्ही ९ भारतवर्ष’ कडून देखील हाच दावा करण्यात आला.
या न्यूज चॅनेल्सशिवाय कर्नाटकातील भाजप खासदार शोभा करंदळजे, शहजाद पुनावाला, सिने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील हाच दावा केला होता.
खरेच पाकिस्तान संसदेत झाली मोदींची स्तुती?
‘इंडिया टीव्ही’कडून चालविण्यात आलेल्या व्हिडिओत पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह महमूद कुरैशी संसदेत बोलताना दिसताहेत. त्यामुळे आम्ही मूळ व्हिडीओ बघण्यासाठी “Shah Mahmood Qureshi’s Parliament speech” या किवर्ड सह गुगल सर्च केलं. आम्हाला ’92न्यूज एचडी’ या पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर कुरैशी यांच्या साधारणतः १० मिनिटांच्या भाषणाचा व्हिडीओ मिळाला.
युट्यूबमध्ये व्हिडीओच्या नॉर्मल स्पीड पेक्षा कमी किंवा जास्त स्पीडने तो बघण्याची देखील सुविधा आहे. याचाच उपयोग करून आम्ही व्हिडीओची स्पीड कमी करत संसदेत देण्यात येणाऱ्या घोषणा ऐकण्याचा प्रयत्न केला असता सभागृहात ‘वोटिंग, वोटिंग’ अशा घोषणा देण्यात येत असल्याचे लक्षात आले.
त्यावर उत्तर देताना सभापती “वोटिंग सबकुछ होगा… सबकुछ होगा सबर रखें आप”.असं म्हणताना देखील दिसताहेत.
चर्चेत बलुचिस्तानचा संदर्भ आल्यानंतर कुरैशी यांनी विरोधी पक्षातील खासदारांवर भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातचे बाहुले बनत चालल्याचा आरोप केला. त्यावेळी सत्ताधारी पक्षातील खासदारांकडून ‘मोदी का जो यार है, गद्दार है… गद्दार है’ तसेच “बिकने को जो तैयार है… गद्दार है… गद्दार है” अशी घोषणाबाजी केली असल्याचे देखील आपल्या लक्षात येईल.
पाकिस्तानातील महत्वाचे वृत्तपत्र ‘डॉन’ने यासंबंधी सविस्तर बातमी दिली आहे. या बातमीत संपूर्ण घटनाक्रमाची तपशिलात माहिती देण्यात आली आहे. त्यात देखील संसदेत ‘वोटिंग, वोटिंग’चेच नारे लगावले गेले असल्याचा उल्लेख मिळतो.
वस्तुस्थिती :
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की व्हायरल व्हिडीओ २०२० सालचा आहे. त्याचा अर्थातच आताच्या रशिया-युक्रेन युद्धाशी काही संबंध नाही. या व्हिडीओचा वापर करून मोदी समर्थकांनी, माध्यमांनी जे दावे केले होते ते सुद्धा खोटे आहेत. पाकिस्तानच्या संसदेत ‘मोदी-मोदी’चे नारे लावण्यात आले नव्हते. या उलट सत्ताधारी पक्ष मोदींचा यार आहे म्हणून देशाशी गद्दार आहे असे आरोप त्या संसदेत झाले होते.
हे ही वाचा- भारतीयांच्या सुरक्षेसाठी रशियाने ६ तास युद्ध थांबविल्याचे व्हायरल दावे फेक! वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] हे ही वाचा- पाकिस्तानच्या संसदेत लावण्यात आले ‘म… […]
[…] हे ही वाचा- पाकिस्तानच्या संसदेत लावण्यात आले ‘म… […]
[…] हे ही वाचा- पाकिस्तानच्या संसदेत लावण्यात आले ‘म… […]
[…] हे ही वाचा- पाकिस्तानच्या संसदेत लावण्यात आले ‘म… […]