ट्वीटरवर सध्या एक फोटो शेअर केला जातोय. फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी एका महिलेसमोर झुकून नमस्कार करताना दिसताहेत.
दावा करण्यात येतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांच्यासमोर झुकून नमस्कार करताना दिसताहेत, त्या उद्योगपती गौतम अदानी यांच्या पत्नी आहेत.
सध्या हा फोटो प्रचंड मोठ्या प्रमाणात नव्याने शेअर केला जातोय, पण यापूर्वी देखील अनेकवेळा याच दाव्यासह हा फोटो शेअर करण्यात आला आहे.
पडताळणी :
‘चेकपोस्ट मराठी’ने या फोटोची सत्यता पडताळून बघण्यासाठी ‘गुगल रिवर्स इमेज’च्या सहाय्याने पडताळणी केली.
गुगल रिव्हर्स इमेज सर्चमध्ये आम्हाला राहुल कौशिक यांचं २५ सप्टेबर २०१४ रोजीचं ट्वीट मिळालं. या ट्वीटच्या कॅप्शननुसार हा फोटो कर्नाटकातील तुमकुर येथील आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तुमकुर येथे आगमन झाल्यानंतर त्यांच्या स्वागताला आलेल्या तुमकुरच्या तत्कालीन महापौर गीता रुद्रेश यांचं अभिवादन नरेंद्र मोदी यांनी स्वीकारलं त्यावेळचा हा फोटो आहे.
हीच माहिती देणारं अजून एक ट्वीट आम्हाला सापडलं. त्यात देखील फोटोबद्दल हीच माहिती सांगण्यात आली आहे. ट्वीटमध्ये स्थानिक वृत्तपत्रातील बातमीचं कात्रण जोडलेलं आहे.
या माहितीची खातरजमा करण्यासाठी आम्ही काही कीवर्डसह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या २०१४ सालच्या तुमकुर दौऱ्याविषयीच्या बातम्या शोधल्या. त्यावेळी आम्हाला संबंधित फोटो असणारा २५ सप्टेबर २०१४ रोजीचाच ‘विजय कर्नाटक’चा एक रिपोर्ट मिळाला.
गुगल ट्रान्सलेटच्या मदतीने या रिपोर्टचे भाषांतर केले असता समजले की हा फोटो पंतप्रधानांच्या २०१४ सालच्या कर्नाटक दौऱ्यातील तुमकुर भेटीचाच आहे. या दौऱ्यात नरेंद्र मोदींनी कर्नाटकात मेगा फूड पार्कचं उद्घाटन केलं होतं.
त्यावेळी कर्नाटकात कॉंग्रेसचं सरकार होतं. त्यामुळे ह्या दौऱ्याच्या वेळी राजकीय वातावरण ताणलेलं होतं, मात्र हा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याचं देखील रिपोर्टवरून समजलं. तुमकुरच्या तत्कालीन महापौर गीता रुद्रेश देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या असा उल्लेख या रिपोर्टमध्ये मिळतो.
या संपूर्ण रिपोर्टमध्ये कुठेही उद्योगपती गौतम अदानी किंवा त्यांच्या पत्नीचा कसलाही उल्लेख करण्यात आलेला नाही.
वस्तुस्थिती :
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोत दिसणारी महिला उद्योगपती गौतम अदानी यांच्या पत्नी नाहीत.
फोटो २०१४ सालचा असून फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांच्यासमोर झुकून नमस्कार करताहेत, त्या तुमकुरच्या तत्कालीन महापौर गीता रुद्रेश आहेत.
याच फोटोचा वापर करून गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना झुकून नमस्कार करत असल्याचे व्हायरल होत होते. ‘चेकपोस्ट मराठी’ने त्यावेळी सुद्धा पडताळणी केली होती. काय होतं ते प्रकरण ‘येथे’ वाचा.
हे ही वाचा- काँग्रेस सरकार विरोधात ‘टीम अण्णा’ आणि भाजप नेत्यांमधील गुप्त मिटिंगचा फोटो लीक?
Be First to Comment