Press "Enter" to skip to content

‘एस.टी’ने ज्येष्ठ नागरिकांसाठी ४००० किमी मोफत प्रवासाची योजना सुरु केली आहे?

‘ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर’ असल्याचे सांगत ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्डच्या सहाय्याने ‘एस. टी.’ महामंडळाचा तब्बल ४००० किमी मोफत प्रवासाची योजना (msrtc smart card for senior citizens) सुरु करण्यात आल्याचे दावे करणारे ग्राफिक्स सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत.

Advertisement
Source: Facebook

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यांची पडताळणी करण्यासाठी ऍडव्हान्स कीवर्ड्सच्या आधारे शोधाशोध केली असता असे लक्षात आले की असे दावे करणाऱ्या पोस्ट २०१९ सालापासूनच व्हायरल होत आहेत.

एस टी महामंडळाची अशी काही योजना आहे का?

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर ‘स्मार्ट कार्ड’ विषयी (msrtc smart card for senior citizens) जाणून घेतले असता त्यामध्ये हे केवळ ‘ज्येष्ठ नागरिकांसाठीच आहे असा कुठेही उल्लेख नाही. या उलट दैनिक सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रांच्या बातम्यांनुसार ही ‘स्मार्ट कार्ड’ सुविधा विद्यार्थी, स्वातंत्र्य सैनिक इत्यादी गटांसह सर्वच सवलतीधारकांसाठी गरजेचे असल्याचे सांगितले आहे.

आजवर आधार कार्ड सारख्या ओळखपत्रास वयाचा पुरावा म्हणून सादर केले जात होते, त्यात अनेकांनी खोट्या तारखा लाऊन घेतल्याचे निदर्शनास आल्याने महामंडळाने हे पाउल उचलले असून हे एकप्रकारे ओळखपत्र तर आहेच परंतु त्यात रिचार्ज केल्यास ते डेबिट कार्ड प्रमाणे इतर छोट्या मोठ्या खरेदीसाठी सुद्धा वापरता येईल.

ज्येष्ठ नागरिकांना ४००० किमी मोफत प्रवास?

महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर सर्च केले असता आम्हाला तिकीट सवलती मिळणाऱ्या घटकांचा आणि त्याविषयीच्या तरतुदींचा तक्ताच सापडला. यानुसार ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना साधी,निमआराम,शिवशाही (आसनी व शयनयान) या सर्वच बसेसच्या एकत्रित ४००० किमी पर्यंतच्या प्रवासात सवलत मिळेल.

यातील साधी आणि निमआराम बस साठी ५० टक्के, आसनी शिवशाही साठी ४५ टक्के आणि शयनयान म्हणजेच स्लीपर कोच शिवशाहीसाठी ३० टक्के सवलत मिळेल. असे नमूद केले आहे. याचाच अर्थ मोफत प्रवास वगैरे दाव्यांत अजिबात तथ्य नाही.

स्मार्ट कार्ड काढणे अनिवार्य आहे का?

आपण जर कोणत्या न कोणत्या नियमानुसार एस टी महामंडळाच्या तिकिटात सवलत घेत असाल तर येथून पुढे आधार कार्ड नव्हे तर स्मार्ट कार्ड हेच ओळखपत्र म्हणून दाखवावे लागेल. या नियमात एस.टी. ने मुदतवाढ दिली असून त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या पत्रकानुसार ही मुदत ३१ मार्च २०२१ केली आहे. तोपर्यंत आपले आधार कार्ड ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाईल. म्हणूनच जवळच्या आगारात जाऊन लवकरात लवकर स्मार्ट काढून घेणे आवश्यक आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीनुसार व्हायरल पोस्ट चुकीची असल्याचे निष्पन्न झाले. स्मार्ट कार्ड केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी नसून सर्वच सवलतीधारकांसाठी आहे.

ज्येष्ठ नागरिकांना ४००० किमीचा प्रवास मोफत नसून बसच्या प्रकारानुसार ५०, ४५ आणि ३० टक्के सवलतीत आहे, मुळात हा नियम आताचा नसून जुनाच आहे. याचा स्मार्टकार्डशी केवळ ओळखपत्र दाखवण्यापुरताच संबंध आहे.

हेही वाचा: योगविद्येच्या सहाय्याने तमिळनाडूतील तरुण आकाशात उडाल्याचे व्हायरल दावे फेक!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या ‘9172011480‘ या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा