आंब्याच्या झाडावर आढळणारा हा किडा जीवघेणा (mango tree insect dangerous) असून हा माणसांच्या संपर्कात आल्यास पुढच्या चार तासात त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो, अशा आशयाचा मेसेज एका २६ सेकंदाच्या व्हिडिओसह व्हायरल केला जातोय.
काय आहे व्हायरल मेसेज
‘ज्यांचेकडे आंब्याचे झाड असेल त्यांनी काळजीपूर्वक बघा. पानावरचा हा किडा ओळखु येत नाही. हा चावला तर माणुस ४ तासात दगावतो. त्यामुळे काळजी घ्या.’
सदर व्हिडीओ याच दाव्यांसह व्हॉट्सऍपवरसुद्धा व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक किशोर सोनावणे आणि दिग्विजय डुबल कयानी निदर्शनास आणून दिले.
पडताळणी:
आंब्याच्या पानावर अशा अदृश्य पद्धतीने लपलेल्या या किड्याच्या दंशाने माणूस चार तासात मरतो असे मेसेज व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण आहे. म्हणूनच आम्ही या दाव्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला.
याविषयी अधिक पडताळणी करण्यासाठी आम्ही व्हायरल व्हिडीओचे काही की फ्रेम्स घेऊन त्या गूगल रिव्हर्स इमेज सर्च केल्या. तेव्हा अशाच दाव्यांसह हा व्हिडिओ ३ वर्षांपासून व्हायरल होत असल्याचे दिसून आले.
आम्हाला एप्रिल २०१८ साली ABP News ने यासंदर्भात केलेली एक बातमी मिळाली. तेव्हा देखील हा किडा चावल्याने माणूस चार तासात दगावत (mango tree insect dangerous) असल्याचे दावे होत होते. म्हणून ABP न्यूजच्या प्रतिनिधीने सत्य पडताळण्यासाठी दिल्ली जवळील यमुना जैवविविधता उद्यानातील वन्यजीव तज्ञ ‘फैयाज खुद्सर’ यांच्याशी संपर्क साधला होता.
खुदसर यांनी ABP शी बोलताना सांगितले की, व्हिडिओत दिसणारा जीव किडा नसून तो सुरवंट (caterpillar) आहे, त्याचे शास्त्रीय नाव Euthalia aconthea असे आहे. त्याला सामान्यतः Common Baron Caterpillar असेही म्हटले जाते.
Common Baron Caterpillar खरंच जीवघेणी असतात का?
एबीपी न्यूजच्या रिपोर्ट मध्ये खुदसर यांनीच यासंदर्भात खुलासा केला आहे. त्यांच्या म्हण्यानुसार हे सुरवंट धोकादायक नसून त्याने माणसाचा जीव जात नाही. केवळ याच्या स्पर्शाने काही काळ खाज सुटते. याव्यतरिक्त इतर कोणताही धोका नाही.
तसेच Common Baron Caterpillar विषयी माहिती देणारे काही लेख देखील आमच्या वाचण्यात आले. भारत आणि दक्षिणपूर्व आशियात हे सुरवंट सहज आढळून येतात. सहसा पानांच्या खालच्या बाजूला दिसून येणारी सुरवंट पानांसारखीच दिसत असल्याने अन्य परजीवींकडून त्यांना धोका होण्याची शक्यता कमी होते. टाईम्स ग्रुपच्या Banglore Mirror मध्ये प्रकाशित बातमीत देखील हे सुरवंट धोकादायक नसल्याचं सांगण्यात आलंय.
या सुरवंटाचे कोशात रुपांतर होते आणि कालांतराने त्यातून फुलपाखरू बाहेर निघते.
वस्तुस्थिती:
व्हायरल व्हिडिओत दाखवलेला जीव भारतात सहज आढळून येणारा ‘Common Baron Caterpillar’ आहे. अगदी साध्या सुरवंटासारखा तो सूरवंट आहे.
या सुरवंटापासून कोणताही धोका नसून केवळ त्याचा आपल्या उघड्या त्वचेशी संबंध आल्यास काही काळ खाज येते. त्यामुळे व्हायरल व्हिडीओसोबत या किड्याच्या दंशाने माणूस चार तासात मरतो असा जो दावा केला गेलाय तो चुकीचा आहे.
‘नॅशनल कॅपिटल पॉइजन सेंटर’च्या माहितीनुसार जर अशाप्रकारच्या कुठल्याही सुरवंटाचा त्वचेशी संपर्क आला तर त्यास हाताने बाजूला करू नका. इतर कुठल्या साधनाने त्यास बाजूला करून संपर्क झालेल्या जागेवर साधी चिकटपट्टी चिकटवून ती ओढून काढा. असे दोन तीन वेळा वेगवेगळ्या चिकटपट्टीने केल्यास त्या सुरवंटाचे काटे/केस बाजूला निघतील. त्यानंतर साबणाने ती जागा स्वच्छ धुवून घ्या. तरीही वेदना वगैरे होत असतील तर त्वचारोगतज्ज्ञास संपर्क साधा.
हेही वाचा: ‘शिवनाग’ वृक्षाचे मूळ कापल्यानंतर १५ दिवस हालचाल करते? जाणून घ्या सत्य!
Be First to Comment