अभिनेता सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली नसून ती आत्महत्याच असल्याचं एम्सच्या (AIIMS) अहवालातून समोर आलंय. त्यानंतर सोशल मीडियात ‘रिपब्लिक भारत’ या न्यूज चॅनेलचा एक स्क्रिनशॉट व्हायरल होतोय. त्यानुसार खुद्द देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन हेच आता सुशांत प्रकरणात तपास करणार (harsh vardhan sushant case) असल्याचा दावा केला जातोय.
ट्विटर युजर्स ‘रिपब्लिक भारत’च्या बातमीचा स्क्रिनशॉट शेअर करून डॉ. हर्ष वर्धन यांना धन्यवाद देताहेत.
पडताळणी:
सुशांत प्रकरणात खरंच अशी काही घडामोड घडलीये का हे तपासण्यासाठी आम्ही यासंबंधी गुगल सर्च केलं. आम्हाला कुठल्याही न्यूज चॅनेलकडून अशी बातमी चालवली गेल्याचे किंवा कुठल्याही न्यूज पेपरमध्ये यासंदर्भात बातमी प्रकाशित झाल्याचे आढळून आले नाही.
मग रिपब्लिकच्या या स्क्रिनशॉटची सत्यता पडताळण्यासाठी सर्च केलं असता, हा स्क्रिनशॉट एडिटेड किंवा छेडछाड करण्यात आलेला नसून ‘रिपब्लिक’ने खरंच अशी बातमी चालवली असल्याचे समोर आले. रिपब्लिकने आपल्या बुलेट १०० या बातमीपत्रात बातमी चालवलीये, ज्यात सुशांत प्रकरणाचा तपास खुद्द आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन करणार असल्याचा दावा करण्यात आलाय.
सुशांत केसमधील एम्सच्या रिपोर्टची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दखल घेण्यात आली असून आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन स्वतः या प्रकरणाचा तपास करणार (harsh vardhan sushant case) आहेत. एम्सकडून प्रकरणाची माहिती घेणार आहेत, असं रिपब्लिकने आपल्या बातमीत म्हंटलंय. रिपब्लिकच्या युट्यूब चॅनेलवर ही बातमी आपल्याला बघायला मिळू शकेल.
आरोग्यमंत्र्यांसंबंधीचा हा दावा मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायला लागल्यानंतर खुद्द डॉ. हर्ष वर्धन यांनाच यासंबंधीचा खुलासा केला. डॉ. हर्ष वर्धन यांना ट्विटच्या माध्यमातून स्पष्ट केलं की, “मी सुशांत प्रकरणाचा तपास करणार असल्याचा काही माध्यमांकडून करण्यात आलेला दावा चुकीचा आहे. ना मी या संदर्भात कोणाशी काही बोललोय, ना कुठल्याही प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं सांगितलंय. कृपया कुठल्याही वक्तव्याची खातरजमा केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवणे टाळा.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सुशांत प्रकरणी स्वतः देशाचे आरोयमंत्री डॉ. हर्ष वर्धन हे तपास करणार असल्याचा ‘रिपब्लिक भारत’ या न्यूज चॅनेलचा दावा निखालस खोटा आहे. खुद्द आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनीच तो खोडून काढला आहे.
हे ही वाचा- संतप्त जमावाकडून भाजप खासदार हर्षवर्धन यांना मारहाण करण्यात आलीये?
Be First to Comment