Press "Enter" to skip to content

काँग्रेस नेत्यांनी तुरुंगात भगतसिंगांची भेट न घेतल्याच्या दाव्यात किती तथ्य?

सोशल मीडियावरून शहीद भगतसिंग (bhagat singh) यांच्या संदर्भाने अनेकवेळा स्वातंत्र्यपूर्व काळात भगतसिंग तुरुंगवासात असताना, कुठल्याच काँग्रेस नेत्याने जेलमध्ये जाऊन भगतसिंग यांची भेट घेतली नव्हती, असा दावा केला जातो.

खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच दोन वर्षांपूर्वी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान ९ मे २०१८ रोजी बिदर येथील रॅलीत हा प्रश्न उपस्थित केला होता.

Advertisement

अर्थात मोदींनी थेट अशा प्रकारचा दावा न करता, केवळ प्रश्न उपस्थित केला होता. मात्र एकूण प्रश्न विचारण्याची शैली ही दावा दाव्याप्रमाणेच होती आणि काँग्रेस नेते भगतसिंग, बटुकेश्वर दत्त आणि सावरकरांना भेटायला गेले नव्हते असाच काहीसा त्यांच्या म्हणण्याचा रोख होता. 

पडताळणी :

काँग्रेस नेत्यांच्या भगतसिंग (bhagat singh) यांच्या भेटीच्या संदर्भाने अनेक ऐतिहासिक तथ्ये उपलब्ध आहेत. एप्रिल १९२९ मध्ये दिल्लीतील केंद्रीय विधानसभेत बॉम्बस्फोट घडवून आणल्यानंतर भगतसिंग आणि बटूकेश्र्वर दत्त हे लाहोर तुरूंगात कैदेत होते.

भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव कैदेत असताना त्यांनी राजकीय कैद्यांना सन्मानजनक वागणूक देण्यासाठी जेल प्रशासनाच्या विरोधात उपोषणास सुरुवात केली होती. 

जेलमध्ये क्रांतिकारकांचं हे उपोषण सुरु असताना जवाहरलाल नेहरूंनी ८ ऑगस्ट १९२९ रोजी भगतसिंग यांची भेट घेतली होती. या भेटीविषयी जवाहरलाल नेहरूंनी आपल्या Toward Freedom: The Autobiography of Jawaharlal Nehru या आत्मचरित्रात लिहिले आहे.

पंडित नेहरू लिहितात, उपोषणाला सुरूवात होऊन एक महिना झाल्यानंतर मी लाहोर मध्येच होतो. यावेळी मला तुरूंगातील काही कैद्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. भगतसिंग, जतींद्रनाथ दास आणि इतरांना यावेळी मी पहिल्यांदाच पाहिले. ते सर्व फारच दुर्बल आणि अंथरुणावर झोपलेले होते. त्यावेळी त्यांच्याशी जास्त बोलणे शक्य नव्हते.

भगतसिंग (bhagat singh) यांच्या अतिशय आकर्षक अशा चेहऱ्यावर कमलीची शांतता होती. त्यात रागाचे कुठलेही भाव नव्हते. यावेळी त्यांनी सभ्यतेने पाहिले आणि संवाद साधला. मला मात्र जो कोणी महिनाभर उपवास करीत असेल तो आध्यात्मिक आणि सभ्य दिसेल असे वाटले.

भेटी दरम्यान जतिन दास मात्र एखाद्या तरूण मुलीप्रमाणे सौम्य, मऊ आणि कोमल दिसत होते. जेव्हा मी पाहिले तेव्हा त्यांना खूपच वेदना होत होती. परिणामी उपोषणाच्या साठव्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला.

पंडित जवाहरलाल नेहरूंनी लाहोर कारागृहातील बंदीवासात असलेल्या भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांची भेट घेतल्याची नोंद ‘दि ट्रीब्यून’ने 9 ऑगस्ट आणि १० ऑगस्ट १९२९ रोजीच्या आवृत्तीत घेतली होती. सदरील घटनेसंदर्भातील अहवाल Tribune Archives मध्ये देण्यात आलाय.

९ ऑगस्ट १९२९ च्या अहवालात म्हटले आहे की, डॉ. गोपीचंद, एम.एल.सी. यांच्यासह पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाहोर मध्यवर्ती आणि बोर्स्टल कारागृहांना भेट दिली आणि  लाहोर कट प्रकरणातील उपोषणकर्त्यांशी चर्चा केली.

नेहरू सर्वप्रथम मध्यवर्ती कारागृहात गेले. तेथे त्यांनी सरदार भगतसिंग आणि के. दत्त यांची भेट घेतली. या दोघांच्या भेटीनंतर नेहरू बोर्स्टल तुरुंगात गेले आणि तेथेच जतीन दास, अजय घोष आणि शिव वर्मा यांच्यासह इतर उपोषणकर्त्यांना भेटले, तर १० ऑगस्ट १९२९ रोजीच्या अहवालात नेहरूंनी उपोषणकर्त्यांच्या आरोग्याबद्दलचे मत आणि गंभीर चिंता व्यक्त केली.

जवाहरलाल नेहरू यांच्या व्यतिरिक्त नेहरूंचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल नेहरू आणि मदन मोहन मालवीय यांनी देखील लाहोर खटल्याच्या वेळी अनेकवेळा भगतसिंगांची  भेट घेतली होती. मोतीलाल नेहरूंनी आमरण उपोषण सुरू केलेल्या तुरुंगातील कैद्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ ब्रिटिश सरकारवर दबाव आणण्यासाठी समिती देखील स्थापन केली होती. भगतसिंगांचे वकील असफ अली हे देखील काँग्रेसचे नेते होते.

वस्तुस्थिती :

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की स्वातंत्र्यपूर्व काळात शहीद भगतसिंग जेलमध्ये असताना काँग्रेस नेत्यांनी त्यांची भेट घेतली नाही किंवा विचारपूस केली नाही, अशा प्रकारचे दावे निखालस खोटे आणि दुष्प्रचार करणारे आहेत. अशा प्रकारचे निराधार दावे हे ऐतिहासिक तथ्यांशी केलेली छेडछाड ठरतात.

हे ही वाचा- ‘महाविकास आघाडी’ सरकारवर निशाणा साधण्यासाठी ‘ऑपइंडिया’ने दिली चुकीची माहिती!

More from राजकारणMore posts in राजकारण »

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा