Press "Enter" to skip to content

मासिक पाळीच्या काळात कोरोनाची लस घेणं नुकसानकारक ठरू शकतं का?

मासिक पाळीच्या काळात कोरोनाची लस घेतल्यास (covid vaccine during menstruation) त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे पाळीच्या ५ दिवस आधी किंवा ५ दिवस नंतरच्या कालखंडात लस घेऊ नये,असे सल्ले देणारे मेसेज आणि ग्राफिक्स सोशल मीडियातून व्हायरल होताहेत.

Advertisement
Source: Whatsapp

* सर्व महिलांसाठी सूचना *

“१ मे पासून वयाच्या १८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना लसीकरण सुरु होत आहे. मुलींनी त्यांच्या मासिक पाळीचे दिवस लक्षात घेऊनच लसीकरण करून घ्यावे.

मासिक पाळीच्या ५ दिवस आधी आणि ५ दिवस नंतर लस घेऊ नये कारण त्या काळात शरीरातील प्रतिकारशक्ती फारच कमी असते.

लस पहिल्यांदा प्रतिकारशक्ती कमी करते आणि मग नंतर वाढते. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात लस घेणे आरोग्यासाठी धोकादायक आहे.

तुमच्या बहीण, मैत्रीण, गर्लफ्रेंड आणि कुटुंबियांसोबत ही माहिती शेअर करा.ट शिट्स

ही अशी माहिती असलेला दावा त्या ग्राफिक्समध्ये आहे. सदर व्हायरल दाव्याविषयी पडताळणी करण्याची विनंती ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक शिवम अग्रवाल यांनी केली आहे.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यांची पडताळणी करण्यासाठी विविध रिसर्च आर्टिकल्स, लस बनवणाऱ्या कंपनीजचे फॅक्ट शिट्स आणि तज्ज्ञ डॉक्टर्सची मते अभ्यासली.

भारतात प्रामुख्याने दोन कोरोना प्रतिबंधात्मक लशी दिल्या जात आहेत या दोन्हींच्या कंपनीजने जारी केलेल्या फॅक्ट शिट्सद्वारे आपणास हे समजते की या लस कुणी घेऊ नयेत.

ज्या लोकांना कुठल्या प्रकारच्या ऍलर्जी आहेत, अंगात ताप आहे, रक्तस्राव होणारा किंवा रक्त पातळ होण्यासाठी गोळ्या चालू असणारा काही आजार आहे अशांनी ही लस घेऊ नये किंवा तज्ज्ञ डॉक्टरच्या मार्गदर्शनाखालीच निर्णय घ्यावा.

ज्यांनी दुसऱ्या कंपनीची लस घेतली आहे अशांनी ही लस घेऊ नये. तसेच ज्यांना एड्स सारखे प्रतिकारशक्ती कमी असणारे आजार आहेत किंवा प्रतिकारशक्तीवर परिणाम करणारे काही औषधे चालू आहेत अशांनी ही लस घेऊ नये.

स्तनदा मातांनी किंवा गरोदर मातांनी सुद्धा ही लस घेऊ नये.

जर पहिल्या डोसमुळे काही ऍलर्जीक रिऍक्शन आली असेल किंवा लशीत वापरलेल्या एखाद्या रसायनामुळे पूर्वी कधी ऍलर्जीक रिऍक्शनचा अनुभव असेल तर ही लस घेऊ नये असे सांगण्यात आले आहे. तसेच स्तनदा मातांनी किंवा गरोदर मातांनी ही लस घेण्यासंबंधी तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घ्यावा.

  • मासिक पाळीच्या काळात रोग प्रतिकारशक्ती कमी होते का?

प्रतिकारशक्ती आणि मासिक पाळी यांविषयीच्या विविध रिसर्च आर्टिकल्समध्ये असे सांगितले आहे की साधारण २८ दिवसांचे हे मासिक पाळीचे चक्र विविध दिवसांत विविध पद्धतीने प्रतिकारशक्तीवर परिणाम दाखवतं.

रक्तस्त्राव चालू होण्याच्या दिवसापासून म्हणजे (menstrual cycle) चक्राच्या पहिल्या दिवसापासून ४ दिवसांपर्यंत प्रतिकारशक्ती काहीशी कमीच असते हे जरी खरं असलं तरी १४व्या दिवसाच्या आसपास म्हणजे गर्भधारणेसाठी योग्य असण्याच्या काळात पुरुषाच्या शुक्राणूना स्वतःच्या शरीरात स्थान देण्यासाठी शरीर प्रतिकारशक्ती कमी करून ठेवतं. याच काळात बाह्य विषाणूंना हल्ला करण्याची नामी संधी असते.

  • मासिक पाळीच्या काळात लस घ्यावी का?

‘हेल्थ’ नावाचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं पोर्टल आहे, जे सातत्याने आरोग्यविषयक नव्या घडामोडी, रीसर्चेस यांवर रिपोर्ट्स पब्लिश करत असतं. त्यावरीलच एका आर्टिकल मध्ये त्यांनी खालील वाक्य वापरलं आहे. यात ते म्हणतात.

‘ सर्वप्रथम हे समजून घ्या की, तुमची मासिक पाळी चालू आहे म्हणून तुम्ही कोरोना लसीकरणापासून वंचित रहावं (covid vaccine during menstruation) यास कुठलेच शास्त्रीय कारण नाही. सीडीसी (Centers for Disease Control and Prevention) आणि ACOG (American College of Obstetricians and Gynecologists) या दोन्हींच्या लस कुणी घेऊ नये या यादीमध्ये मासिक पाळी चालू असणाऱ्या स्त्रियांचा उल्लेख नाही.

Health screenshot stating vaccination is safe in periods
Source: Health
  • भारतीय स्त्रियांचा काय अनुभव आहे?

२०१६ सालापासून स्त्रियांच्या मासिक पाळी विषयक कार्य करणाऱ्या ‘समाजबंध’ संस्थेचे संस्थापक सचिन आशा सुभाष यांच्याशी आम्ही संवाद साधला असता त्यांनी सांगितले की आजतागायत ४५ वर्षे वयोगटाच्या वरील स्त्रियांचे लसीकरण झाले. या वयोगटातील स्त्रियांची साधारणपणे रजोनिवृत्ती झालेली असते. त्यामुळे आम्ही अशा महिला आणि मुलींशी बोललो ज्या अत्यावश्यक सेवा क्षेत्रात आहेत म्हणून त्यांना लसीकरण करण्यात आले आहे. त्यांच्या अनुभवानुसार मासिक पाळीच्या काळाचा लसीकरणाशी काहीएक संबंध नाही. त्या काळातही त्रास झाला नाही किंवा त्या नंतर सुद्धा पाळीमध्ये लसीकरणामुळे विशेष काही फरक पडल्याचे जाणवले.

‘समाजबंध’ संस्थेशी सलग्न असणाऱ्या १० डॉक्टर्स सोबत संवाद साधला असता त्यांनीही व्हायरल दावा तथ्यहीन असल्याचेच सांगितले असे सचिन म्हणाले. त्यांनी याविषयक जनजागृतीकरिता फेसबुक पोस्टसुद्धा लिहिली आहे.

  • लस घेतल्यानंतर प्रतिकारशक्ती कमी होते का?

लसीकरण झाल्यानंतर येणारा हलकासा ताप, डोकेदुखी, अंगदुखी ही लक्षणे प्रतिकारशक्ती कमी झाल्याची नव्हे तर प्रतिकारशक्तीचा लशीला मिळत असलेला प्रतिसाद असण्याची लक्षणे आहेत. यासाठी WHOने जारी केलेला हा व्हिडीओ पाहू शकता.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये मासिक पाळीच्या काळात कोरोनाची लस घेतल्यास (covid vaccine during menstruation) त्याचा विपरीत परिणाम होऊ शकत असल्याचे व्हायरल दावे चुकीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मासिक पाळीच्या काळात प्रतिकारशक्तीवर काहीसा परिणाम होतो हे जरी खरे असले तरीही ती एवढीही खालावत नाही की ज्याची तुलना एड्सग्रस्त व्यक्तीच्या पातळीएवढी होईल. कोरोना प्रतिबंधात्मक लशीकरणासाठी दिलेल्या नियमावलीतही असा विशिष्ठ उल्लेख आढळून येत नाही.

त्यामुळे व्हायरल दाव्यांना खरे मानून मासिक पाळी आली म्हणून कोरोना लशीकरण टाळू नये. लशीकरण, मास्क-सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग हेच कोव्हीड पासून वाचण्याचे प्रभावी उपाय आहेत.

हे ही वाचा: सिप्ला कंपनी कोव्हीड१९ रुग्णास थेट हॉस्पिटलमध्ये ‘रेमेडीसिव्हीर’ इंजेक्शन पुरवतेय?

More from कोरोनाMore posts in कोरोना »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा