Press "Enter" to skip to content

खरंच NDTV चे मालक प्रणॉय रॉय पाकिस्तानी आहेत का?

सोशल मीडियावर एक ग्राफिक व्हायरल होतंय. दावा केला जातोय की यामध्ये NDTV चे मालक प्रणॉय रॉय (Prannoy Roy) आणि त्यांच्या पत्नी राधिका रॉय (Radhika Roy) यांच्याविषयी अनेक उलटसुलट दावे करण्यात आले आहेत.  

काय आहेत हे दावे?

  • प्रणॉय रॉय यांचा जन्म कराची येथे झाला असून त्यांचे खरे नाव परवेज राजा आहे.
  • Advertisement
  • NDTV चे पूर्ण नाव अर्थात फुल फॉर्म नवाजूद दीन तौफिक वेंचर आहे, जे की प्रणॉय रॉय यांच्या वडिलांचे नाव आहे.
  • प्रणॉय रॉय यांच्या पत्नीचे खरे नाव ‘राहिला’ आहे.
  • सीबीआयच्या छाप्यामध्ये ही सर्व गुपित माहिती समोर आली असल्याचा दावा केला जातोय.
Viral Claim about Pranoy Roy_ Checkpost Marathi Fact
Source: Whatsapp

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक राजेंद्र काळे यांनी सदर व्हायरल ग्राफिक्स निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

NDTV आणि प्रणॉय रॉय यांच्यावरील ज्या छाप्यामध्ये ही सर्व गुपित माहिती समोर आल्याचा दावा केला जातोय, ती घटना आजची नसून २०१७ सालची आहे. सीबीआयने ५ जून २०१७ रोजी NDTV चे मालक प्रणय रॉय (Prannoy Roy) आणि राधिका रॉय (Radhika Roy) यांच्या दिल्ली आणि देहरादून येथील घरावर छापा टाकला होता.

बँकिंग गैरव्यवहाराचे हे प्रकरण होते. त्यातून काही गुप्त माहिती समोर आल्याची कसलीही माहिती उपलब्ध नाही. सरकारकडून जाणीवपूर्वकरित्या आपल्याला लक्ष्य बनवलं जात असल्याचं त्यावेळी NDTV कडून सांगण्यात आलं होतं.

व्हायरल दाव्यांची सत्य बाजू पुढीलप्रमाणे:

१. प्रणॉय रॉय यांच्या पासपोर्टनुसार त्यांचे पूर्ण नाव प्रणॉय लाल रॉय असून त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९४९ रोजी पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात झाला होता. त्यांच्या आई-वडिलांचे नाव प्रतिप लाल रॉय आणि जेन रॉय असे आहे. त्यांचे वडील बंगाली होते, तर आई आयरिश. प्रणॉय यांनी देहरादूनमधील दून स्कूल, लंडनमधील क्वीन्स मेरी विद्यापीठ आणि दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.

. राधिका रॉय यांच्या पासपोर्टनुसार त्यांचे नाव राधिका रॉय असेच असून त्यांचा देखील जन्म पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील आहे. त्यांच्या आई-वडिलांचे नाव कवाना दास आणि सुरज दास आहे. NDTV च्या स्थापनेपूर्वी राधिका रॉय यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ आणि ‘इंडिया टुडे’ यांसारख्या प्रतिष्ठित माध्यम संस्थांमध्ये काम केलेले आहे.

३. NDTV चे पूर्ण नाव अर्थात फुल फॉर्म आहे ‘नई दिल्ली टेलिव्हिजन’. NDTV ची सुरुवात १९८८ साली करण्यात आली. NDTV या ब्रॅण्डखाली NDTV 24×7 हे इंग्रजी न्यूज चॅनेल, NDTV इंडिया हे हिंदी न्यूज चॅनेल आणि NDTV Profit हे आर्थिक विषयांसंबंधीच्या बातम्या देणारे चॅनेल चालवले जातात.

४. व्हायरल ग्राफिक मधील इमेज:

सध्या व्हायरल होत असलेल्या ग्राफिकमध्ये NDTV, प्रणॉय रॉय आणि राधिका रॉय यांच्यासंदर्भातील तर्कहीन दाव्यांना पुष्टी देण्यासाठी ‘क्या NDTV का मालिक पाकिस्तानी है?’ अशा प्रश्नार्थक चिन्हासह प्रणॉय रॉय यांचा फोटो वापरण्यात आलाय. प्रणॉय रॉय यांचा हा फोटो ‘लल्लनटॉप’ या वेबपोर्टलच्या ‘फॅक्टचेक’ रिपोर्टच्या युट्यूब थंबनेलमधून घेण्यात आला आहे. २०१७ मध्ये ज्यावेळी प्रणॉय रॉय यांच्या घरी सीबीआयचे छापे पडले होते, त्याचवेळी  ‘लल्लनटॉप’ने सोशल मीडियावरील दावे खोडून काढले होते.

हा मेसेज नेमका लिहिलाय कुणी?

अल्ट न्यूजच्या रिपोर्टनुसार मेसेजची सुरुवात @RoflGandhi_या ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आलेल्या ट्विटच्या माध्यमातून झाली होती. सीबीआयच्या छाप्यानंतर ६ जून २०१७ रोजी या ट्विटर हॅण्डलवरून व्यंग म्हणून हा मेसेज पोस्ट करण्यात आला होता, जो NDTV सोशल मीडियावर खरा समजून व्हायरल झाला.

खुद्द @RoflGandhi_ या युजरनेच यासंदर्भात माहिती दिली होती.    

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर NDTV, प्रणॉय रॉय आणि राधिका रॉय यांच्यासंदर्भात केले जाणारे दावे चुकीचे आहेत. साधारणतः ४ वर्षांपूर्वी व्यंग म्हणून लिहिला गेलेला मेसेज सध्या खरा म्हणून व्हायरल होतोय.

हे ही वाचा- महाराणा प्रताप यांच्या शस्त्रांचे वजन ३०० किलो होते? जाणून घ्या सत्य!

More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा