‘बडी और कडक खबर’ असल्याचा दावा करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य वाचून बौध्द धर्म स्वीकारण्याच्या तयारीत (Donald trump buddhism) असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजसह एका पानावर बाबासाहेब तर दुसऱ्या पानावर ट्रम्प यांची सही असा एक फोटो देखील शेअर करण्यात येतोय.
व्हायरल मेसेज:
‘बडी और कड़क खबर अमेरिका के राष्ट्रपति पद के उम्मीदवार डोनाल्ड ट्रम्प ने बाबासाहब डॉ. भीम राव अम्बेडकर जी की किताबों से प्रभावित हो कर बौद्ध धम्म अपनाने की इच्छा जतायी है यह खबर सारे विश्व का माडया न बताया कवल भारतीय मनुवादी मीडिया ने हमें नहीं बतायी ताकि ईसका प्रभाव भारत के लोगों पर ना पड़ सकें विशेष तौर पर ट्रंप बाबा साहब के प्रसंशक है और उन्होने कहा कि उनके राष्ट्रपति बनने पर भारतके संविधान को अमेरिका के संविधान में पेस्ट कर देगे और पुरी दुनिया में बुद्ध धम्म का कार्य और प्रचार करेंगे लेकिन हमार देश की ये मनुवादीवादियों की गंदी सोच और ये बिकाऊ मीडिया इस को रोकने का हर प्रयास करेंगे परंतु आप सभी इस पोस्ट को ज्यादा से ज्यादा शेयर करे जय भीम नमो बोद्धाय जयजय बहूजन साथियों.’
व्हॉट्सऍपवर व्हायरल होणाऱ्या पोस्टबद्दल ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक लक्ष्मीकांत सोरटे यांनी माहिती दिली. फेसबुकवरसुद्धा हे असे दावे ओसंडून वाहतायेत.
पडताळणी:
व्हायरल मेसेजसह शेअर केला जाणारा फोटो पाहता क्षणीच संशयास्पद असल्याचे जाणवते. तसेच मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये देखील याविषयी कोणतीच बातमी नसल्याने ‘चेकपोस्ट मराठी’ने याविषयी पडताळणी करण्यास सुरुवात केली.
आम्ही सर्वप्रथम व्हायरल इमेज रिव्हर्स सर्च केली. तेव्हा व्हायरल होत असलेला एडिटेड फोटो ज्या फोटोवरून बनविण्यात आलाय तो मूळ फोटो आम्हाला आढळून आला. तसेच याचा व्हिडिओ देखील fortune.com या वेब पोर्टलवर मिळाला.
ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्याअगोदर भारतात आले होते त्यावेळी देखील सध्याचा मेसेज भारतीय सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला होता.
२३ जानेवारी २०१७ रोजी वॉशिंग्टन डीसी येथील व्हाइट हाउस मध्ये Trans Pacific Partnership हा करार रद्द करतांना ट्रम्प यांचा व्हायरल फोटो काढण्यात आला होता. त्या फोटोतील एका पानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो एडीट करून लावला गेलाय.
काय आहे TPP करार?
प्रशांत महासागराच्या सीमेवरील जगातील एकूण अर्थव्यवस्थेत ४०% टक्के वाटा असणाऱ्या बारा देशांचा या करारात समावेश आहे. ४ फेब्रुवारी २०१६ रोजी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी या करारावर स्वाक्षरी केली होती.
करारात सामील असणाऱ्या देशांमधील आर्थिक संबंध दृढ करणे, दर कमी करणे, वाढीस चालना देण्यासाठी व्यापार वाढवणे ही या TPP करारमागील मुख्य उद्दिष्टे होती.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी २३ जानेवारी २०१७ रोजी TPP करारातून अमेरिका माघार घेत असल्याचे जाहीर केले होते.
त्याच वेळी घेण्यात आलेला फोटो अनेकांनी आपापला अजेंडा रेटण्यासाठी किंवा गंमत म्हणून एडिट करत व्हायरल केलाय. गूगल वर trump’s executive order memes या की वर्ड ने सर्च केल्यास व्हायरल फोटो सारखेच इतर अनेक मिम्स तुम्हाला सहज सापडतील.
वस्तुस्थिती:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके वाचून प्रभावित झालेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बौध्द धर्म स्वीकारणार (Donald trump buddhism) असून भारताच्या संविधानातील तरतुदींचा अमेरिकेच्या संविधानात समावेश करणार असल्याचा दावा चेकपोस्ट मराठीने केलेल्या पडताळणी पूर्णतः खोटा ठरला आहे. तसेच या व्हायरल मेसेजसह शेअर करण्यात येणारा फोटो देखील एडिटेड असून २३ जानेवारी २०१७ रोजी मूळ फोटो काढण्यात आलाय.
हेही वाचा: टाळ्या-फुलांनी स्वागत होणारी व्हायरल व्हिडीओतील मुलगी ‘हाथरस’ पीडिता नाही!
[…] हेही वाचा: डोनाल्ड ट्रम्प बौद्ध धम्म स्वीकारणार… […]