‘पूरी दुनिया में सिर्फ भारत में ही वैक्सीनेशन फ़्री हो रहा है!! मगर हमें तो पेट्रोल से तकलीफ़ है!!’ अशा दाव्यासह विविध कंपन्यांच्या लशींची किंमत असलेली यादी सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.
व्हायरल दावा:
सभी भारतीयों को अवश्य समझनी ही चाहिए:_
विश्व में तैयार कोरोना वैक्सीन की रेट लिस्ट(रुपए में )
1– फाइजर कंपनी ——- 2800/=
2– माडर्ना कंपनी ——– 2715/=
3– चीन की साइनोफार्म–5650/=
4– सिनोवाक ————- 1027/=
5– नोवावेकस ————-1114/=
6– स्पुतनिक वी ———- 1145/=
7– कोवीशील्ड ———— फ्री ( केवल भारत में )
8– को वैक्सीन ———— फ्री ( केवल भारत में )
पूरी दुनिया में सिर्फ भारत में ही वैक्सीनेशन फ़्री हो रहा है!!
मगर हमें तो पेट्रोल से तकलीफ़ है!!
पूरा विश्व यह सोचकर परेशान हैं कि भारत 135 करोड़ से ज्यादा लोगों को फ़्री टीकाकरण और 80 करोड़ लोगों को मुफ्त राशन कैसे दे पा रहा है! कुछ विपक्षी चमचे और तथाकथित सेकुलर बुद्धिजीवी फिर भी कोरोना को अफवाह ही मान रहे हैं!!🙉
जागो हिन्दुस्तानियों जागो!
या अशा मजकुराची ‘हिंदुवादी सुरजीत यादव’ यांची फेसबुक पोस्ट बातमी करेपर्यंत २२० जणांनी शेअर केली होती.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक प्रशांत यमजाल यांनी फेसबुक, ट्विटर प्रमाणेच व्हॉट्सऍपवरही हेच दावे ‘Forwarded may times’ या टॅगखाली जोरदार व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
व्हायरल पोस्टमध्ये दोन वेगवेगळे दावे आहेत. पहिला म्हणजे लशींच्या किमतीचा आणि दुसरा मोफत पुरवठ्याचा.
लशींची किंमत:
व्हायरल दावे मागच्या अनेक दिवसांपासून व्हायरल होत आहेत. त्यामुळे त्यात दिलेल्या लशींच्या किमती नेमक्या कोणत्या महिन्यास अनुसरून आहेत हे कळायला मार्ग नाही. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वेबसाईटवर १२ जानेवारी २०२१ रोजी जारी पत्रकातील किमती व्हायरल दाव्यातील किमतींपेक्षा जवळपास निम्म्या आहेत.
९ जून रोजी ‘इकॉनॉमिक टाईम्स’ने प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार फायजर लशीच्या एका डोसची किंमत अमेरिकेत १४२३ रुपये आणि युरोपात १६९५ रुपये एवढी होती.
मोफत लस पुरवणारा भारत हा एकमेव देश?
सुरुवातीच्या काळात भारतामध्ये केवळ ४५ वर्षांहून अधिकच्या नागरिकांना मोफत लस होती. त्यानंतर राज्यांच्या आरोप-प्रत्यारोपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ जून २०२१ रोजी १८ वर्षांवरील नागरिकांनाही लस मोफत मिळेल अशी घोषणा केली. ही मोहीम २१ जून रोजी सुरु झाली. परंतु यामध्येही खाजगी क्षेत्राला २५ टक्के लस पुरवठा करण्याची तरतूद ठेवली गेली.
आज घडीला खाजगी रुग्णालयांत कोव्हीशिल्डचा प्रती डोस ७८० रुपयांना, कोव्हॅक्सीन १४१० रुपयांना आणि स्पुटनिक ११४५ रुपयांना उपलब्ध आहे. अनेक नागरिकांनी असे आरोप केले की कोविन वेबसाईटवर स्लॉट बुक करताना मोफत लसीकरण सेंटर्सपेक्षा खाजगी सेंटर्स जास्त दिसतात. त्यामुळे अनेकांनी नाईलाजाने ‘पेड स्लॉट’ बुक करून लस घेतली.
राहिला प्रश्न केवळ भारतात मोफत लस आहे का? तर नाही. अमेरिकन संस्था सीडीसीनुसार करदात्यांच्या पैशात लस विकत घेऊन सर्व नागरिकांना निःशुल्क पुरवली जाईल. इंग्लंडमध्ये सार्वजनिक दवाखान्यांत सर्व नागरिकांसाठी लस मोफत आहे. ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’च्या बातमीनुसार मेक्सिको मध्येही नागरिकांसाठी लसीकरण मोफत आहे. ‘नॅशनल हेल्थ कमिशन’नुसार चीनमध्येही नागरिकांना लसीकरण निःशुल्क आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीनुसार हे स्पष्ट झाले की व्हायरल मेसेज फेक असून कोरोनाविरुद्ध नागरिकांना लस पुरवणारा भारत हा एकमेव देश नाही. तसेच व्हायरल मेसेजमध्ये दिलेल्या लशींच्या किमतीही चुकीच्या आहेत. या सर्व दाव्यांचा रोख पेट्रोल-डीझेलच्या वाढत्या किमतींविषयी सारवासारव करण्यासाठी आहे. असेच दावे केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली यांनीही केले होते. परंतु या सर्वात ‘पीएम केअर्स’मध्ये जमा झालेल्या निधीचे काय झाले? किती विनियोग झाला? किती बाकी आहे? याविषयीची कुठलीही माहिती उपलब्ध नाही.
हेही वाचा: इंधन दरवाढीचे खापर कॉंग्रेस काळातील ‘ऑईल बॉंड’वर फोडून निर्मला सीतारामन यांच्याकडून जनतेची दिशाभूल!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]