नव्या संप्रेषण नियमानुसार सरकारकडून आपल्या खाजगी कॉल्स, व्हॉट्सऍप मेसेज आणि सोशल मिडिया पोस्टवर लक्ष ठेवण्यात येत असून (govt monitoring social media) ते ओळखण्याच्या काही ट्रिक्ससुद्धा आहेत, असा दावा करणाऱ्या पोस्ट सध्या व्हायरल होताहेत.
याच पोस्ट्स मेसेजच्या स्वरुपात विविध ग्रुप्समधून सातत्याने व्हायरल होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक प्रशांत कारखानीस आणि दयानंद यांनी व्हॉट्सऍपवर हा मेसेज जोरदार व्हायरल होत असल्याचं निदर्शनास आणून दिलं आणि पडताळणीची विनंती केली.
सदर मेसेजचा काही भाग फेसबुकवर सुद्धा व्हायरल होतोय.
पडताळणी:
व्हायरल मेसेजमध्ये एकाचवेळी अनेक दावे केले आहेत. त्यामुळे एकेका दाव्याची पडताळणी करणे गरजेचे आहे.
१. कॉल ऐकले जातील आणि जतनही करून ठेवले जातील?
आम्ही दूरसंचार मंत्रालयाच्या वेबसाईटला आणि सोशल मीडिया हँडल्सला देखील भेट दिली. मात्र यापैकी कुठेही आम्हाला अशा प्रकारचा कुठलाही निर्णय झाला असल्याची माहिती मिळाली नाही. किंबहुना या दाव्यांविषयी सविस्तरपणे ‘चेकपोस्ट मराठी’ने या पडताळणी करून ते तथ्यहीन असल्याचे सांगितले होते. ते वाचण्यासाठी ‘येथे‘ क्लिक करा.
२. कोणत्याही राजकीय, धार्मिक विषयावर मेसेज किंवा पोस्ट पाठवणे गुन्हा?
राजकीय किंवा धार्मिक विषयावर मेसेज किंवा पोस्ट करणे हा गुन्हा असल्याचे कुठेही नोंद नाही. जर ते आक्षेपार्ह असेल, ठराविक समूहाच्या भावना दुखावणारं असेल किंवा समाजिक तेढ निर्माण होईल असं असेल तर कायद्याच्या कचाट्यात नक्की अडकाल. परंतु याचा व्हॉट्सऍप ग्रुप ऍडमिनशी काहीएक संबंध नाही. याबद्दल सुद्धा ‘चेकपोस्ट मराठीने सविस्तर रिपोर्ट सादर केला होता, तो आपण ‘येथे‘ वाचू शकता.
३. व्हॉट्सऍप मेसेज आणि ग्रुपवर शासनाची निगराणी?
किती टिक्स कशाचे? कोणत्या रंगाच्या टिकचा अर्थ काय? याविषयी व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आलेले दावे चुकीचे आहेत. मेसेज पाठवल्याचे एक काळे टिक, पोहचल्याचे २ काळे टिक आणि वाचल्याचे दोन निळे टिक एवढे तीन प्रकार वगळता कसलीही सुविधा व्हॉट्सऍप देत नाही. याविषयी स्वतः व्हॉट्सऍपने आपल्या अधिकृत वेबसाईटमधील FAQ सेक्शनमध्ये माहिती दिलेली आहे.
हेच जर आपण व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये मेसेज टाकला असेल तर सर्व सदस्यांना मेसेज पोहचल्यावर दोनदा काळे टिक येते आणि सर्वांनी वाचून झाल्यावर दोन निळे टिक होतात. असेही यात सांगितले आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे व्हॉट्सऍपवरील मेसेज एंड टू एंड इनक्रिप्टेड असतात. म्हणजेच पाठवणारा आणि ज्यास पाठविले आहे तेच दोन व्यक्ती तो मेसेज वाचू शकतात. तिसऱ्या कुठल्याही खाजगी अथवा शासकीय यंत्रणेला ते वाचता येऊ शकत नाहीत. जोवर दोघांपैकी एकाने त्याचे स्क्रीनशॉट काढून दाखवले नाहीत किंवा आपल्याविषयी अधिकृत कुणी तक्रार नोंदवली नसेल आणि आपल्याबद्दल कुठल्याही गुन्ह्य अंतर्गत चौकशी चालू नसेल तोवर पोलीस यंत्रणेला सुद्धा ते मेसेज परस्पर वाचण्याची मुभा नाही.
याविषयी शासनातर्फे PIBनेसुद्धा स्पष्टीकरण दिले आहे आणि व्हायरल मेसेजला फेक म्हंटले आहे.
४. ट्विटर-फेसबुक सारख्या सोशलमिडीयावर निगराणी?
आपल्या सोशल मिडिया पोस्टवर सरकार सतत लक्ष ठेऊन (govt monitoring social media) असल्याचे दावे सुद्धा चुकीचे आहेत. स्वतः शासनाची अधिकृत बाजू सांगणाऱ्या PIBने या अशा दाव्यांना मागेच मोडीत काढत त्यांना फेक म्हंटले आहे. परंतु सोशल मिडिया वापरताना समाजभान राखूनच वापरा हे सुद्धा त्यांनी सांगितले आहे.
वस्तुस्थिती:
व्हायरल मेसेजेस आणि पोस्ट फेक असून असे कुठलेही पाउल शासन यंत्रणेमार्फत उचलले गेले नाही. आपल्या सोशल मिडिया आणि व्हॉट्सऍपवर आपलाच अधिकार आहे. आपण हवं ते शेअर करू शकतो कारण त्यावर शासन लक्ष ठेवत नाहीये परंतु देशाचे सुजाण नागरिक म्हणून आपली काही कर्तव्ये आहेत. जर आपल्या अशा मेसेज किंवा पोस्टमुळे समाजिक वातावरण कलुषित झाले तर पोलीस प्रशासन आणि सायबर सेल नक्कीच आपल्यावर कारवाई करणार.
हेही वाचा: जुन्या टीव्ही-रेडीओमध्ये करोडोच्या भावात जाणारी ‘रेड मर्क्युरी’? जाणून घ्या सत्य की अफवा!
Be First to Comment