Press "Enter" to skip to content

भाजलेल्या त्वचेवर लगेच पीठ टाकले तर दाह कमी होतो आणि डागही राहत नाही? वाचा सत्य!

‘जर तुमचा हात भाजला आणि तुम्ही लगेच तो हात थेट पिठाच्या पिशवीत (Flour) टाकला तर काही वेळातच तुमच्या हाताचा दाह (Burns) कमी होतो आणि भाजल्याचा कसलाच डागही राहत नाही.’ अशा आशयाचे अनुभवकथन करणारे मेसेज सोशल मीडियात जोरदार व्हायरल होताहेत.

Advertisement

काय आहे व्हायरल मेसेज?

नेहमी स्वयंपाकघरात पिठाची पिशवी (आटा) ठेवा आणि ती कुठे आहे हे सर्वांना कळवा.
 * कृपया शेवटपर्यंत वाचल्याशिवाय हटवू नका*
 "हा स्वतःला जाळणाऱ्या स्त्रीचा खरा जीवन अनुभव आहे ...".
काही वेळापूर्वी, मी कॉर्न उकळत होते आणि कॉर्न तयार आहे की नाही हे पाहण्यासाठी उकळत्या पाण्यात थोडे थंड पाणी ओतले. चुकून मी माझा हात उकळत्या पाण्यात बुडवला .... !!
माझा एक मित्र जो व्हिएतनामी पशुवैद्यकीय डॉक्टर होता घरी आला होता. म्हणून मी वेदनेने ओरडत असताना त्याने मला विचारले की माझ्याकडे घरी (गव्हाच्या) पिठाची पिशवी आहे का?
मी थोडे ओतले आणि त्याने माझा हात मैद्यात टाकला आणि मला सुमारे 10 मिनिटे थांबायला सांगितले.
त्याने मला सांगितले की व्हिएतनाम मध्ये एक मुलगा होता जो एकदा जाळला होता. त्याच्यावर आग लागल्याने आणि घाबरून कोणीतरी आग विझवण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याच्या संपूर्ण शरीरावर पिठाची पोती ओतली. पण केवळ आगच विझवली गेली नाही तर मुलावर भाजल्याचा कोणताही मागमूस नव्हता !!!!
माझ्या स्वतःच्या बाबतीत, मी माझा हात पिठाच्या पिशवीत 10 मिनिटांसाठी ठेवला आणि नंतर काढला आणि त्यानंतर मला जळण्याच्या कोणत्याही लाल खुणाही दिसल्या नाहीत. शिवाय, पूर्णपणे वेदना नाही.
आज मी पिठाची पिशवी फ्रिजमध्ये ठेवते आणि प्रत्येक वेळी मी कुठे भाजल्यावर पीठ वापरते. वास्तविक थंड पीठ खोलीच्या तपमानापेक्षा खूप चांगले आहे.
मी पीठ वापरते आणि मला कधी जळाल्याचा मागमूसही नाही!
एकदा माझी जीभ जळली होती आणि त्यावर सुमारे 10 मिनिटे पीठ ठेवले होते .... वेदना थांबल्या.
त्यामुळे नेहमी तुमच्या रेफ्रिजरेटरमध्ये कमीत कमी पिठाचे पिशवी ठेवा.
👌😊😊😊👍😊😊😊✌
पीठात उष्णता शोषण्याची क्षमता असते आणि त्यात मजबूत अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. अशा प्रकारे, जळलेल्या रुग्णाला 15 मिनिटांच्या आत लागू केल्यास ते मदत करते.

 जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यासाठी फायदेशीर अशी एखादी गोष्ट शेअर करते, तेव्हा ती इतरांबरोबर शेअर करण्याची आपली नैतिक जबाबदारी आहे. म्हणून हे इतरांसोबत शेअर करा.

हे असे मेसेज व्हॉट्सऍपवर एवढ्या प्रमाणात व्हायरल होतायेत की व्हॉट्सऍपने त्यावर ‘Forwarded Many times’ असा टॅग लावलाय. याविषयी ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक गुरुप्रसाद पाटील यांनी पडताळणीची विनंती केली.

फेसबुकवर विविध ग्रुप्सवर आरोग्यविषयक टिप्स म्हणून हे मेसेज पोस्ट होताना दिसतायेत.

Flour heals burning skin viral posts on FB
Source: Facebook

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल मेसेज व्यवस्थित वाचला असता त्यातील मराठी काहीशी वेगळी वाटली. बऱ्याचदा गुगल ट्रान्सलेटरच्या मदतीने इंग्रजीचे मराठीत भाषांतर करतात तेव्हा अशाच प्रकारची वाक्यरचना आपल्याला पहायला मिळते.

या मेसेजशी संबंधित काही इंग्रजी शब्द कीवर्ड्स म्हणून वापरत गुगल सर्च केले असता ‘स्नोप्स‘ या आंतरराष्ट्रीय न्यूज वेबसाईटचा १ एप्रिल २०११ साली प्रकाशित झालेला लेख मिळाला. या लेखानुसार मार्च २०११ साली सोशल मीडियात एक मेसेज व्हायरल होतोय. हाच तो मेसेज, ज्याचे मराठी भाषांतर आपल्याकडे आता व्हायरल होत आहे.

English viral message to tell flour can heal skin burning
Source: Snopes

२०११ सालापासून हा मेसेज जगभर व्हायरल होतोय. याविषयी ‘रॉयटर्स‘ या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेनेही अनेक तज्ज्ञांकडे विचारणा केली होती. लॉस एंजेलिसच्या युएसजी मेडिकल सेंटरमधील बर्न सेंटरचे मेडिकल डिरेक्टर डॉ. जस्टीन गिलेनवॉटर (Dr Justin Gillenwater) यांनी व्हायरल दावे चुकीचे असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की,

“भाजलेल्या जखमेवर कधीच कुठल्याही प्रकारचे पीठ लावू नये, त्याने दाह कमी तर होणार नाहीच उलट जखमेत पीठ जाऊन इन्फेक्शनचा धोका वाढेल. एवढेच नव्हे तर त्यावर उपचार करताना जखमेवरील पीठ पुसून काढताना रुग्णाला खूप वेदना सहन कराव्या लागतील. यामुळे त्या जखमेची खोली आणि आकाराचा अंदाज लावणे डॉक्टर्ससाठी कठीण जाईल.”

– डॉ. जस्टीन गिलेनवॉटर ( मेडिकल डिरेक्टर, बर्न सेंटर, लॉस एंजेलिस)

‘रॉयटर्स’शी बोलताना वॉशिंगटन डीसीच्या मेडस्टार वॉशिंगटन हॉस्पिटलच्या बर्न सेंटरचे डिरेक्टर जेफ्री डब्यु शुप यांनीही डॉ. जस्टीन यांच्याप्रमाणेच भाजलेल्या त्वचेवर पीठ लावण्याच्या उपचारास चुकीचे आणि घातक सांगितले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने भाजलेल्या जागेवर नळाचे साधे थंड पाणी हळूवारपणे ओतण्याचा सल्ला दिलाय. याने दाह कमी होतो. त्यावर बर्फ किंवा फ्रीजचे थंड पाणी टाकू नये. भाजलेल्या जागी घट्ट कपडे किंवा अंगठी सारखे वगैरे दागिने असतील तर त्या जागी सूज येण्या अगोदरच काढून टाकायला हवेत. जर भाजण्याची तीव्रता अधिक असेल तर लवकरात लवकर रुग्णालयात धाव घ्यायला हवी.

एनडीटीव्ही‘च्या रिपोर्टनुसार त्वचा हलकीशी भाजली असेल तर त्यावर १५-२० मिनिटे नळाचे थंड पाणी सोडणे, त्यावर कोरफडीचा गर, मध, खोबरेल तेल किंवा विनेगार लाऊन दाह कमी होईल. परंतु हे घरगुती उपाय केवळ भाजण्याच्या कमी तिव्रतेस लागू होतात, जखमेचे प्रमाण जास्त असेल तर हे उपाय करण्या ऐवजी लवकरात लवकर तज्ज्ञ डॉक्टरकडे जाण्यातच शहाणपण आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की त्वचा भाजल्यानंतर (Burns) त्यावर गव्हाचे किंवा कुठल्याही धान्याचे पीठ (Flour) लावण्याचा सल्ला देणारे मेसेज चुकीचे आहेत. असे केल्याने दाह तर कमी होणार नाहीच उलट इन्फेक्शन वाढेल आणि रुग्णालयात जाऊनही डॉक्टरला त्यावर इलाज करणे त्रासदायक ठरेल.

आरोग्यविषयक सल्ला देणाऱ्या अशा सोशल मीडियातील मेसेज पोस्ट्सना प्रमाण मानण्याआधी आपल्या ओळखीच्या तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घ्यायला विसरू नका.

हेही वाचा: गोळ्यांच्या कॅप्सूलमध्ये खिळे? धक्कादायक व्हायरल व्हिडीओचे सत्य काय?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »

Be First to Comment

  Leave a Reply

  Your email address will not be published.

  × न्यूज अपडेट्स मिळवा