Press "Enter" to skip to content

सिप्ला कंपनी कोव्हीड१९ रुग्णास थेट हॉस्पिटलमध्ये ‘रेमेडीसिव्हीर’ इंजेक्शन पुरवतेय?

सिप्ला ही औषध निर्माण कंपनी आता कोव्हीड१९ रुग्णास थेट हॉस्पिटलमध्ये ‘रेमेडीसिव्हीर’ (cipla covid 19 remdesivir) इंजेक्शनचा पुरवठा करणार असल्याचे मेसेज सोशल मीडियात व्हायरल होताहेत.

‘सिप्ला कंपनीचा टोल फ्री नंबर आहे 8657311088 (24 Hrs). ज्या पेशंटला Rendemsivir ह्या इंजेक्शन ची गरज असेल त्या पेशंटला डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये पुरवठा केला जाईल . मध्ये कोणीही डीलर / डिस्ट्रिब्युटर / हॉस्पिटल असणार नाहीत . यामुळे काळाबाजार करणार्यांना चाप बसेल .जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहोचावा .’

Advertisement

अशा मजकुरासोबत काही नंबर्स लिहिलेली पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होतेय. ‘मराठी कामगार सेना’च्या फेसबुक पेजवरील या पोस्ट बातमी लिहीपर्यंत तब्बल २३२ लोकांनी शेअर केलीय.

सिप्ला कंपनीचा टोल फ्री नंबर आहे 8657311088 (24 Hrs). ज्या पेशंटला Rendemsivir ह्या इंजेक्शन ची गरज असेल त्या पेशंटला…

Posted by Marathi Kamgar Sena मराठी कामगार सेना on Tuesday, 22 September 2020

अर्काइव्ह लिंक

ट्विटरवरही नायट्रस ऑक्साईड या हँडलवरून असाच दावा केला गेलाय आणि त्यास जवळपास ६०० युजर्सने रीट्विट केले आहे.

अर्काईव्ह पोस्ट

हेच दावे व्हॉट्सऍपवरही याच जोमात व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक चंद्रकांत कांबळे आणि निसार अली यांनी 9172011480 या आमच्या अधिकृत व्हॉट्सऍप क्रमांकावर संपर्क साधून निदर्शनास आणून दिले.

पडताळणी:

चेकपोस्ट मराठीद्वारे व्हायरल दाव्याची पडताळणी करताना आम्ही कीवर्ड्सच्या आधारे गुगल सर्च केले. सोबतच व्हायरल पोस्टमधील हेल्पलाईन नंबर सुद्धा गुगल सर्चच्या माध्यमातून तपासून पाहिला. या दोन्ही पद्धतीने आम्ही ‘Cipla Global’च्या ट्विटर हँडलवर पोहचलो.

या हँडलवरून १५ जुलै २०२० रोजी केलेल्या ट्विटनुसार ‘सिप्ला कंपनीची महत्वाची उत्पादने कुठे उपलब्ध होतील या बद्दलची माहिती देणारे अधिकचे हेल्पलाईन नंबर्स कार्यान्वित झाले असून हे कोव्हीड१९ महामारीच्या कालखंडापुरतेच असेल.’

या हेल्पलाईन नंबर्समध्ये व्हायरल पोस्टमध्ये असणारा ‘86573 11088’ हाच नंबर आहे.

याच माहितीची पुन्हा एकदा शहानिशा करण्यासाठी आम्ही त्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून पाहिला. हा कुणा व्यक्तीचा नंबर नसून तो कस्टमर सर्विससारखा BPO चा नंबर आहे. यामध्ये डॉक्टर्ससाठी एक आणि रुग्ण अथवा त्यांचे काळजीवाहक यांच्यासाठी दुसरा असे दोन ऑप्शन आहेत. आम्ही दुसऱ्या ऑप्शनमार्गे पुढे गेलो असता बऱ्याच वेळेनंतर कॉल अटेंडंटने प्रतिसाद दिला.

सिप्ला कंपनीच्या हेल्पलाईनवरून काय माहिती मिळाली?

अटेंडंटने दिलेल्या माहितीनुसार सदर व्हायरल मेसेजेसचा कंपनीशी काहीएक संबंध नाही. त्यातील माहिती काहीशी चुकीची आहे. केवळ ‘रेमेडीसिव्हीर’ इंजेक्शन (cipla covid 19 remdesivir) नव्हे तर इतरही महत्वाच्या औषधांची येथे आपण चौकशी करू शकता, परंतु मागविण्यासाठी हा क्रमांक आपणास ते इंजेक्शन अथवा इतर औषधी ऑर्डर देण्यासाठी उपयोगी नसून आपण सांगितलेल्या पत्त्यानुसार आपल्या आसपास सिप्ला कंपनीचे अधिकृत डिस्ट्रिब्युटर कोण आहेत याची माहिती दिली जाते.

मग त्या डिस्ट्रिब्युटरशी संपर्क साधून रुग्णाचा कोव्हीड पॉझिटिव्ह रिपोर्ट, डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन आणि रुग्णाचे ओळखपत्र दाखवावे लागते त्यानंतर तो डिस्ट्रिब्युटर आपणास कंपनीने ठरवून दिलेल्या भावात ती औषधी आपणास देतो.

या प्रक्रियेमध्ये एजंट, डीलर आणि डॉक्टर्सचा तिळमात्र हस्तक्षेप नाही. इथे सिप्लाचे अधिकृत डिस्ट्रिब्युटर आणि गरजू रुग्ण यांचा थेट संपर्क होतो.

रेमेडीसिव्हीर’ इंजेक्शनची किंमत किती?

कोरोना व्हायरसचे संक्रमण संपूर्ण शरीरभर पसरू नये म्हणून अगदीच इमर्जन्सी म्हणून हे इंजेक्शन रुग्णास दिले जाते. याने श्वास घेण्यास खूप त्रास होणाऱ्या रुग्णास बराच फायदा होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळेच या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे.

DNAच्या बातमीनुसार भारतात तीनच कंपन्या हे इंजेक्शन तयार करतात. पैकी सिप्लाचे ‘सिप्रेमी’ हे जेनेरिक व्हर्जन ४००० रुपये किमतीचे आहे. हेटेरो हेल्थकेअरचे ‘कोव्हीफॉर’ ५४०० रुपये तर मिलानचे ‘रेमेडीसिव्हीर’ ४८०० रुपये किमतीचे आहे.

या झाल्या अधिकृत किमती. परंतु प्रचंड मागणीमुळे या इंजेक्शनचा काळाबाजार चालू आहे. ४ ते ६ हजारच्या दरम्यान असणाऱ्या इंजेक्शनच्या व्हाईल्स काळ्या बाजारात तब्बल ६० ते ७० हजार रुपयांपर्यंत विकले जाताहेत. या बद्दलची बातमी ‘द प्रिंट’ने पब्लिश केली होती. अशाच सात जणांच्या टोळीला अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून ताब्यात घेतल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. अशाच गोष्टींना आळा बसवण्यासाठी सिप्लाने हे पाऊल उचलले असावे.

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी‘च्या पडताळणीमध्ये व्हायरल मेसेज दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.

तो मेसेज किंवा त्यातील मजकूर सिप्ला कंपनीने पोस्ट केलेला नसून कुणा त्रयस्थ व्यक्तीने बनवला आहे. कंपनी स्वतः रुग्णाला हॉस्पिटलमध्ये ‘रेमेडीसिव्हीर’ इंजेक्शन (cipla covid 19 remdesivir) पोहचवणार नाही. पोस्टमधील हेल्पलाईन क्रमांक केवळ जवळच्या अधिकृत डिस्ट्रिब्युटरचा संपर्क क्रमांक देण्यापुरता मर्यादित आहे.

सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यास याचा फायदा हाच की इंजेक्शनच्या काळ्या बाजारास काहीसा आळा बसेल आणि एजंट, डीलर किंवा डॉक्टर या माध्यमातून औषध येण्याऐवजी थेट अधिकृत डिस्ट्रिब्युटरकडून रुग्णास मिळेल.

हेही वाचा: इटलीने ‘WHO’च्या नियमावली विरुद्ध ‘कोव्हीड१९’ मृताचे पोस्टमॉर्टम केल्याने समोर आले सत्य?

More from कोरोनाMore posts in कोरोना »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा